অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राणायामचे प्रकार

उज्जायी

उद् + जय यापासून ‘उज्जायी’ हा शब्द तयार झाला. उद् म्हणजे ‘जोराने’ व ‘जय’ म्हणजे यश. ही क्रिया करताना कंठातून शिट्टीसारखा आवाज निघतो. या प्राणायामच्या सरावाने शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हा आपण हिवाळ्यात करावा.

क्रिया

मांडी घालून अथवा पद्मासनात बसावं. तोंड बंद ठेवा. आता हनुवटी गळपट्टीच्या हाडामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू द्या. मानेला जास्त ताण देऊ नये. डोळे बंद करा आणि दोन्ही नाकातून हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या. फुप्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्या. त्यावेळी ‘सस्’ असा आवाज होणे आवश्यक आहे. आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा तळ्याला आतल्या बाजूस लावून शक्य जितक्या वेळ रोखता येईल तेवढा वेळ रोखावे याला कुंभक म्हणतात. नंतर डोळे वर करा. व हळुवारपणे श्वास बाहेर सोडावे. यावेळी उजव्या हाताने उजवे नाक बंद करून डाव्या नाकाद्वारे छाती फुगवत श्वास बाहेर सोडावा. श्वास बाहेर जाताना घर्षणयुक्त आवाज येतो. हा आवाज एकसारखा असला पाहिजे.

फायदे

या प्राणायामामुळे डोक्यातील उष्णता कमी होते तसेच दमा, क्षय व फुप्फुसाचे रोग बरे होतात. या प्राणायामाच्या नित्य सरावाने जठराग्नी प्रदीप्त होते. त्यामुळे पचनक्रिया श्वसनक्रिया आणि ज्ञानक्रिया कार्यक्षम बनतात.

सीत्कारी

या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक होतो. तहान लागली असताना हा प्राणायाम केल्यास तहान भागल्याचं समाधान मिळतं.

क्रिया

प्रथम पद्मासनात किंवा मांडी घालून बसावं. आता दात एकमेकांवर दाबून ठेवा, जीभ दातांना लावा. जिभेचं टोक टाळ्याला लावा. ओठ किंचित विलग ठेवा आणि ‘सी.. सी..सी’ असा आवाज करून तोंडाने पूरक करा म्हणजेच श्वास आत घ्या. श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा व शक्य होईल तितका वेळ कुंभक करा व त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.

फायदे

या प्राणायामच्या सरावाने भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात. डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत, प्लीहा कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.

शीतली

या प्राणायाममुळे देखील शरीरात थंडावा निर्माण होतो. हा प्राणायाम वसंत आणि ग्रीष्म ष्टद्धr(7०)तूत केल्यास जास्त फायदा होतो. पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत या प्राणायामचा सराव करावा.

क्रिया

पद्मासन किंवा वज्रासन या आसनात बसून, तोंड उघडून जीभ बाहेर काढा आणि पक्षाच्या चोचीप्रमाणे जिभेची नळी करून ‘सी..सी..सी’ असा आवाज करीत तोंडाने जिभेवरून श्वास आत खेचा (पूरक करा). पूरक पूर्ण होताच तोंड बंद करा. थोडा श्वास रोखून ठेवा व दोन्ही नाकाद्वारे हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. म्हणजेच रेचक करा.

फायदे

या प्राणायाममुळे रक्तात असणारे विषारी घटक बाहेर फेकले जातात, त्यामुळे रक्तशुद्धी होते. या प्राणायामच्या सरावाने प्लीहा, त्वचारोग, ताप, अजीर्ण होणे व बद्धकोष्ठता यांसारखे रोग बरे होतात. रागट व क्रोधी व्यक्तीसाठी हा प्राणायाम खूप लाभदायी आहे, कारण या प्राणायाममुळे डोके शांत राहते.

भस्त्रिका

या प्राणायामात लोहाराच्या भात्याप्रमाणे जोरात हवा आत घेतली जाते व बाहेर फेकली जाते म्हणून या प्राणायामास ‘भस्त्रिका’ असं म्हणतात. लोहार ज्याप्रमाणे त्याचा भाता जोरजोराने चालवतो त्याचप्रमाणे श्वास हा झपाटय़ाने घेतला जातो. कपालभाती व उज्जायी प्राणायामाचं मिश्रण यात दिसून येतं. कुंभकाच्या सर्व प्रकारांत भस्त्रिका अधिक लाभदायी आहे.

क्रिया

पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. पाठ, मान डोके ताठ ठेवावेत. हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. तोंड बंद ठेवा. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद व जोराने श्वास घ्या व तितक्याच जोराने श्वास सोडा. तसेच फुप्फुसाचे आकुंचन करा आणि नंतर फुलवा. हा प्राणायाम करताना मगरीच्या आवाजासारखा फस, फस.. फस.. असा आवाज येईल. श्वास घेताना झपाटय़ाने व जलद आत घ्यावा, व तसेच सोडावा म्हणजेच पूरक व रेचक याने भस्त्रिकाचे एक पूर्ण आवर्तन होईल.

हे आवर्तन पूर्ण होईल तेव्हा दीर्घ श्वास घ्यावा. जमेल तेवढय़ा वेळ श्वास रोखून ठेवावा. त्यानंतर संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा. प्रत्येक आवर्तनानंतर थोडा वेळ आराम करावा व सामान्य श्वासोच्छ्वास करावा. यामुळे फुप्फुसांना थोडा आराम मिळतो. शक्यतो प्रथम एकच आवर्तन करावे.थंडीमध्ये हा प्राणायाम सकाळ-संध्याकाळ करावा. उन्हाळय़ात फक्त सकाळच्या थंड वेळीच हा प्राणायाम करावा.

फायदे

या प्राणायाममुळे गळय़ाची सूज कमी येते. कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. तसेच दम व क्षय यासारखे आजार बरे होतात. या प्राणायामुळे कफ, पित्त व वायूने होणारा त्रास नाहीसा होतो.

शरीराला उष्णतेची आवश्यकता असल्यास हा प्राणायाम करावा. शरीरात त्वरित उष्णता निर्माण होते.

भ्रामरी

‘भ्रामरी’ हा शब्द ‘भ्रमर’ या शब्दावरून आला आहे. हा प्राणायाम ‘ॐकार’ने केला जातो. हा आवाज भुंग्याच्या आवाजासारखा असल्याने या प्राणायामास ‘भ्रामरी’ असं नाव पडलं.

क्रिया

पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. दोन्ही नाकातून जोराने श्वास आत खेचा आणि बाहेर काढा. घाम येईपर्यंत ही क्रिया करावी. शेवटी नाकाद्वारे शक्य तितका दीर्घ श्वास घ्या आणि जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वास बाहेर सोडा. सुरुवातीला जसजसा तुम्ही जोराने श्वास घ्याल तशीच तुमच्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढत जाते. परंतु शेवटी घाम सुटल्यावर शरीर थंड पडते.

 

 

फायदे

या प्राणायामामुळे मन व चित्त प्रसन्न राहते.

विशेष नोंद : अनुलोम प्राणायामचा सराव केल्याशिवाय या प्राणायामापासून फारसा फायदा होणार नाही.

मूच्र्छा

या प्राणायामात साधकाची स्थिती ही मूच्र्छेप्रमाणे होते. तो भानरहित होतो. म्हणून यास ‘मूच्र्छा’ असं म्हणतात.

क्रिया

मांडी घालून बसावं अथवा पद्मासनात बसावं. नाकाद्वारे पूरक करा. नंतर जालंधरबंध करून कुंभक करा (श्वास रोखून ठेवा) व मूच्र्छा येईपर्यंत कुंभक चालू ठेवा. नंतर दोन्ही नाकाद्वारे रेचक करा.

फायदे

या प्राणायाममुळे मन भानरहित होते. त्यामुळे हा प्राणायाम करण्यास आनंद प्राप्त होतो. हा प्राणायाम केल्याने मनातील संकल्प-विकल्प नाहीसे होतात. काही काळ तरी मन परमात्मस्वरूप बनून जाते.

प्लाविनी

प्लाविनी हा शब्द संस्कृतमधील ‘फ्लु’ (पोहणे) म्हणजेच पोहायला लावणारी. हा प्राणायाम करणाऱ्यास पाण्यावर पोहण्याची क्षमता प्राप्त होते. हा प्राणायाम करण्यासाठी कुशलतेची गरज असते.

क्रिया

सुरुवातीस वज्रासन या आसनात बसावं. अंतर दोन्ही नाकांद्वारे पूरक करून कुंभक करावं. नंतर जालंधरबंध करावं. यामुळे श्वास आतडयात साठवला जातो व त्यांना फुलवलं जातं. शेवटी दोन्ही नाकांद्वारे रेचक करा व गरज वाटल्यास ढेकर देऊन हवा बाहेर काढता येते.

फायदे

हा प्राणायाम करणारी व्यक्ती अनेक दिवसांपर्यंत अन्नाशिवाय म्हणजेच हवेवर राहू शकतो. या प्राणायाममुळे रक्ताभिसरणाची क्रिया अत्यंत वेगाने होते. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.

विशेष नोंद : हा प्राणायाम अत्यंत हळुवारपणे क्रमश: व नियमितपणे करावा. या प्राणायामचा अभ्यास ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

हे प्राणायाम करताना घ्यायची काळजी

  • प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
  • प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा.
  • हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुस-या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुस-या नाकपुडीनेही करावे.
  • प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावं.
  • प्राणायाम करताना घाई करू नये.
  • फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किंवा त्याच्या साहाय्याने त्यांच्या समोर
    करावा.
  • थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये.
  • प्राणायाम करताना श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश करावा असे पतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत होते.
  • प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी.
  • प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अध्र्या तासानंतर करावे.

 

स्त्रोत : प्रहार

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate