निरोगी माणसामध्ये क्विनाईन हिवतापसदृश लक्षणे निर्माण करू शकते म्हणून हानेमान यांच्या मते हिवताप क्विनाईनने बरा होतो. अशा प्रकारे विचार करून रुग्णांना औषधयोजना सुरू केली. त्यामध्ये त्यांना अतोनात यश मिळाले. अर्थातच त्याकरता क्विनाईननंतर इतर अनेक औषधांच्या निरोगी माणसांवर होणा-या परिणामांचा त्यांना अभ्यास करावा लागला. हे सर्व पदार्थ अर्थातच विषारी होते. नक्स व्होमिका (कुचला), आर्सेनिक, ऍकोनाईट, (बचनाग), स्ट्रॅमोनिअम (धोत्रा) आणि अशा अनेक विषारी वनस्पती त्यांनी वापरल्या. त्यांच्यामुळे निर्माण होणा-या लक्षणांच्या याद्याच त्यांनी तयार केल्या. त्यांचे अनेक सहकारी, कुटुंबीय, नातलग, इत्यादी त्यांच्या प्रयोगात सामील झाले. या लोकांनी स्वतविर विषारी द्रव्यांचे प्रयोग करून बघितले. त्यानुसार औषधांची विशिष्ट लक्षणे समजावून घेतली. यालाच औषधे 'सिध्द करणे' म्हणतात. यामध्ये औषधांचे मानवी शरीरावर निश्चितपणे कोणते परिणाम केव्हा, कशा क्रमाने, किती तीव्रतेने जाणवतात हे नोंदवून ठेवले. त्यामध्ये असेही जाणवले, की अतिसूक्ष्म औषधाचा एक डोस निरोगी माणसावर दिवस-दिवसच काय, अनेक महिने सुध्दा परिणाम करू शकतो. याचा परिणाम असा झाला, की डॉ. हानेमान यांच्याकडे येत असलेल्या रोग्यांमध्ये जेव्हा सिध्द केलेल्या औषधांपैकी एखाद्यासारखी लक्षणे दिसत तेव्हा त्याला तेच औषध दिले जाई. यामुळे तो माणूस आश्चर्यकारकपणे बरा होत असे.
रुग्णाला तपासताना नुसती लक्षणेच नव्हे, तर लक्षणांच्या चढ-उतार होण्याच्या वेळा, हवामानाचा त्यांवरील परिणाम अशा सगळयांची नोंद हानेमान घेऊ लागले. प्रत्येक आजाराप्रमाणे व्यक्तीव्यक्तीच्या प्रकृतीचाही अभ्यास पाहिजे. म्हणजेच प्रत्येक रुग्ण हा इतरांपेक्षा वेगळा कसा आहे, त्याच्या लक्षणांची विशेषता काय आहे हे लक्षात घेऊनच औषधोपचार ठरवले जायला हवेत. नुसते नाक चोंदते म्हणून नोंदवणे पुरेसे नाही. 'थंड मोकळया हवेत गेल्यावर माझे नाक सुटते' हे एखादा रुग्ण सांगत असता ते होमिओपथी उपचार करणा-याने लक्षात घ्यायला हवे. अंगात ताप असताना काही रुग्णांस पाणी प्यावे असे अजिबात वाटत नाही ही गोष्ट या शास्त्रात महत्त्वाची असते.
आग होणारी वेदना शेकल्याने कमी होते असेही कधीकधी रुग्ण सांगतो. असे तपशील (लक्षणे)जमेस धरून त्यावर उपचार करता आले पाहिजेत. त्या काळी पटकी (कॉलरा) हा रोग म्हणजे साक्षात कर्दनकाळच समजला जाई. हा रोग आशिया खंडातून युरोपात जाणा-या बोटींतून तेथे पोचला. या रोगाची लक्षणे जेव्हा हानेमानच्या कानी गेली तेव्हा त्यांनी लक्षणांच्या समानतेवरून चार औषधे सुचवली. आर्सेनिक, कॅम्फर (कापूर), व्हेराट्रम आलबम आणि क्युप्रम (तांबे) ही ती औषधे होत. त्या काळी पटकी बरी होणे हा म्हणजे एक चमत्कारच होता.
हा चमत्कार घडला होमिओपथीच्या साहाय्याने. अनेक रुग्ण बरे झाले, म्हणून होमिओपथीला राजमान्यता मिळाली. याच वेळी हानेमान यांनी पटकीच्या अभ्यासावरून असे अनुमान काढले, की या रोगप्रसारास एखादा डोळयास न दिसण्यासारखा असणारा जीव कारणीभूत असला पाहिजे. सूक्ष्मदर्शकाखाली जंतू प्रत्यक्ष दिसण्याआधीच अशा रीतीने हानेमान यांनी जंतूच्या अस्तित्त्वाचे निदान केले होते. होमिओपथीच्या तत्त्वाप्रमाणे कोणताही पदार्थ 'औषध' होऊ शकतो. मात्र तो या पदाला पोचवण्याचे काम आधी व्हावे लागते. म्हणजे निरोगी माणसावर या द्रव्याचे काय परिणाम होतात हे माहीत असावे लागते. सोने, किडे, विष्ठा, विषे किंवा रेडियमसारखे पदार्थ किंवा रोग्यांचे स्त्राव हे औषध म्हणून वापरले जाऊ शकतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/2/2020
औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न...
सामान्यत: होमिओपथीची औषधे सर्व मोठया शहरांत सहज उप...
आवळ्याचा उपयोग सर्व आयुर्वेद औषधात करतात. आवळ्यापा...
औषध म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो. रोगावरच्या उपच...