অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार- समता व समानता दृष्टिकोन

आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार- समता व समानता दृष्टिकोन

  1. उद्देश
  2. कोणता दृष्टिकोन विकसित होईल
  3. सध्याची सामाजिक व आर्थिक स्थिती
    1. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट बघूयात...
  4. समाजातील विविध घटकातील विषमता व त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
    1. शिक्षणामधील विषमता आणि आरोग्य
    2. शहरी आणि ग्रामीण भागातील विषमता
    3. जाती विषमता आणि आरोग्य
  5. आरोग्य विषमतेची व्याख्या
    1. मार्गारेट व्हाईटह (Margaret Whitehard)-
    2. पाउलो ब्रॅवमेन (Paula Braveman)-
    3. थोडक्यात विषमता म्हणजे काय?
  6. समता व समानतेची व्याख्या
    1. मार्गारेट व्हाईटहर्ड (Margaret Whitehard)-
    2. स्टारफिल्ड (Starfield)-
  7. समानता आणि समता या दोन संकल्पनांमधील फरक
  8. आरोग्यसेवांमध्ये धोरणात्मक बदलांसाठी शिफारशी
    1. खासगी आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण
  9. विकासाच्या प्रारूपाचा पुनर्विचार
  10. थोडक्यात पण महत्त्वाचे

उद्देश

सध्याची सामाजिक व आर्थिक स्थिती, आरोग्य विषमता, समता व समानता म्हणजे काय? या विषयी आपण या प्रकरणात माहिती करून घेणार आहोत.

कोणता दृष्टिकोन विकसित होईल

आरोग्य विषमता, समता व समानता याबद्दल सखोल व व्यापक दृष्टिकोन विकसित होईल.

सध्याची सामाजिक व आर्थिक स्थिती

आरोग्य विषमता, समता व समानता या संकल्पना समजून घेण्याआधी आपण काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संदर्भांवर एक दृष्टीक्षेप टाकू या. जगातील 10 टक्के श्रीमंत व्यक्ती हे जगातील एकूण 85 टक्के संपत्तीचे मालक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत (20 टक्के) लोक हे सर्वात गरीब (20 टक्के) लोकांपेक्षा दीडशेपट अधिक संसाधनांचा वापर करतात (युनायटेड नेशन्सचा मानव विकास अहवाल 1999). जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही दरी अधिकच वेगाने वाढत आहे.

या सामाजिक, आर्थिक विषमतांचा परिणाम अर्थातच लोकांच्या आरोग्यावर होत असतो. परिणामतः जगातील बहुतांश देशात आरोग्य स्थिती व आरोग्यसेवांची उपलब्धता यात वर्ग, जात, लिंग, धर्म यावर आधारित विषमता आढळते. महागड्या खासगी आरोग्यसेवा केवळ श्रीमंत वर्गातील लोकच घेऊ शकतात तर गरिबांना मात्र आवश्यक सेवा देखील नीट मिळत नसल्याचे चित्र आपल्या देशात दिसते. याचाच अर्थ आरोग्यसेवांपर्यंतची पोहोच ही व्यक्तीच्या आरोग्यसेवेच्या गरजेवर अवलंबून नसून तिच्या आर्थिक कुवतीवर अवलंबून आहे.

हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट बघूयात...

गोष्ट आहे रामपूर गावाची! हे गाव वसलं आहे डोंगर दर्‍यांमध्ये! गावच्या रस्त्याला भरपूर खड्डे. आणि त्यात दोनदाच गावात एस.टी. येते. अशा या रामपूरमधल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मोलमजुरी. शेती कोरडवाहू, त्यात गावातल्या काही लोकांकडे भरपूर जमीन. तर बहुतांश लोकांकडे अगदी थोड्या जमिनी. काहींना तर जमीनच नाही. त्यामुळे जास्त लोक मजुरीवरच जगतात. पाऊस पडला की शेती करायची. चार महिन्यात जेवढं जमेल तेवढं पिकवायचं बाकीचे आठ महिने दुसर्‍यांच्या शेतात मजुरी असं इथलं जीवन. एकूणच काही समाजातल्या लोकांचं हातावरचं पोट.

सखुबाई आणि तिचा नवरा गंगाराम- यांना तशा पाच मुली, तीन मुलींची लग्न झालेली आणि अजून दोन- त्यातली मोठी सगुणा आणि तान्ही पिंकी. या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय मोलमजुरी. सखुबाई आणि गंगाराम गरिबीने बेजार झालेले, कारण होती ती जमीन विकली तीन पोरींच्या लग्नासाठी. आता दुसर्‍याच्या शेतावर जाऊन रोजावर मजुरी करणं. त्यातही सखुबाईची तब्येेत तशी नाजूकच कारण सलग पाच बाळंतपणं आणि पोरगा (वंशाचा दिवा) पाहिजे म्हणून दोन वेळा गर्भपात केल्यामुळे सखुबाई पार गळून गेलेली. तरीपण सखुबाई घरातलं, बाहेरचं आणि पोरासोरांचं असं सगळं काम करते. न करून सांगणार कोणाला? नवराही कर्जात बुडालेला होता. लई टेन्शन होतं म्हणून दारू प्यायचा! त्यात सगळ्या परिस्थितीचा राग/चीड सखुबाईला मारझोड करून काढायचा.

रखमाबाई- गंगारामची म्हातारी आई. वय 75 वर्षाच्या जवळपास. मोतीबिंदूमुळं धड दिसेना. तरुणपणात खूप कष्ट केल्यामुळं शरीरपण साथ देईना. नुसतं घरात एका ठिकाणी पडून राह्यचं आणि मिळंल ते खायचं.

सगुणा- सखुबाईची 10 - 12 वर्षाची चौथी पोरगी. अभ्यासात हुशार पोरगी पण चौथीतच शाळा सोडून आता आईला घरकामाला हातभार लावते. शिवाय छोट्या पिंकीला सांभाळायची जबाबदारीही सगुणानेच उचललेली. एवढीशी पोरं घरातली सगळी कामं तिच्या कुवती बाहेर जाऊन करते.

पिंकी- खरं तर या तान्ह्या पोरीला घरामध्ये सगळे ‘नकोशी’ म्हणायचे. कारण ती कोणालाच नको होती. प्रत्येक खेपेप्रमाणे या खेपेला वंशाचा दिवा होईल म्हणून खूप अंगारे धुपारे, नवस पण पदरात पडली ही ‘नकोशी.

एक दिवस काय झालं, सखुबाईने लवकर उठून घरातलं सगळं आवरलं आणि शेताला गेली. गंगारामची रात्रीची उतरली नव्हती, तरीही तो शेताला गेला. घरात होते फक्त सगुणा आणि तान्ही पिंकी व म्हातारी रखमाबाई.

सगुणा- आजी, पिंकीला जुलाब झाला. अगं लहान पोराला होतं असं, जा चुलीतला अंगारा लाव. म्हंजे बर वाटलं तिला.

पण जुलाब काही थांबले नाहीत. नंतर परत पिंकीने मोठा जुलाब केला.

सगुणा- आजे, परत मोठा जुलाब आता काय करायचं गं. बघ ना कशी घळटून गेलीया ती. मला तर लई काळजी वाटतेया पिंकीची.

रखमाबाई- अगं, तिला उलिसा भात घाल खायला.

सगुणा- आजी, पिंकीला उलट्या पन व्हायला लागल्यात.

हे सगळं तिन्हीसांजेपर्यंत चालूच राहीलं. शेवटी सगुणा पिंकीला कडेवर घेऊन दारात आईची वाट बघत उभी राहिली. तिला विश्वास होता की यावर आईच काहीतरी करूशकेल.

संध्याकाळच्या सुमारास सखुबाई दमून भागून घरी आली. सगुणाने लगेचच झालेला प्रकार सांगितला. कामानं पार गळून गेलेल्या सखुबाईनं पिंकीला बघितलं.

सगुणा- आये, आपल्या नकोशीला सकाळंपासनं जुलाब अन उलट्या झाल्यात. काय खात बी नाय. बघ ना जरा तिला.

सखुबाई- हो गं, सगुणे जा त्या रामोशी भगताकडं अन अंगारा घेऊन ये. त्या आधी आपल्या पार वर राहणार्‍या नर्सबाईंकडून गोळीपण घेऊन ये. मी घरातलं बघते. तुझा बाप येईलच आता दारू ढोसून. त्याला आल्या आल्या पहिलं गिळायला लागतं. नाहीतर परत मलाच मार खावा लागलं.

सगुणा 10-12 वर्षाची पोरं पळतच सुटली. नर्सबाईंकडं गेली तर त्या नव्हत्या. तालुक्याला मीटिंगला गेल्या होत्या. मग सगुणानं भगताकडून आणलेला अंगारा पिकींला लावला. पर पिंकीला काहीच सुधारत नव्हतं. सखुबाईनं पण कसाबसा स्वैपाक केला. तोपर्यत गंगाराम नेहमीप्रमाणे टाईट होऊन घरी आला. दोन घास पोटात ढकलून झोपून गेला. त्याला घरात काय चाललंय याचा पत्ताही नव्हता.

सखुबाई- सासूबाई, नकोशी बघा ना कसं करतीया. काय करावं मला समजंना आता.

रखमाबाई- मी तरी काय सांगू बाई, त्या मुडद्याला सांगितलं तरी त्यानं काय ऐकलं नाय. मला पण काय दिसत नाय का हलता येत नाय. आनं तू एकटी कुठं जानार एवढ्या रातची. जरा दम काढ. सकाळी बघू काय करायचं. तू पन जरा आराम कर. दिसभर सगळंच बघावं लागतं तुला.

पिंकीचे जुलाब काही कमी होईनात. मध्यरात्री पिंकीला जास्तच त्रास व्हायला लागला. पिंकीनं डोळे पांढरे केले आणि जोरजोरात धापा टाकायला लागली. सखुबाई चांगलीच घाबरली. तिनं तिच्या नवर्‍याला उठवलं आणि सगळं सांगितलं.

गंगाराम- (मारझोड करत) मला आधी का नाही सांगितलं? आता या नकोशीच्या दवापान्यासाठी मी कुठून पैसा आणू, आधीच आपन कर्जबाजारी. ही पोरगी आन तू मला जगू द्यायची नाय. मला काय माहीत नाय. तू तुझं बघ. असे सांगून परत झोपला. आता सखुबाईनं रडत रडत म्हातारीला उठवलं, पोरीचं काही तरी केलं पाहिजे म्हणून.

रखमाबाई- चलं पोरी आताच आपल्याला कायतरी करावं लागलं. म्या येते तुज्याबरोबर.

त्या दोघी रात्रीच्या अंधारात कसंबसं करत गावातल्या नर्सबाईंकडं गेल्या. नशिबाने नर्सबाई होत्या पण त्यांच्याकडच्या जुलाबाच्या गोळ्या संपल्या होत्या.

नर्सबाई- बाई तुझ्या पोरीला लगेच दवाखान्यात नेलं पायजे. माज्याकडून काय होनार नाय. माझ्याकडं पन औषधं नाहीत. मी आज तालुक्याच्या दवाखान्यातून औषधच आणायला गेले होते. पण आमच्या साहेबांनी वरतूनच औषधं आली नाहीत असं सांगितलं. माझ्याकडं एखादं दुसरी गोळी असलं ती मी देते.

पिंकीला गोळी दिली पण तिला उलटी झाली. जुलाब तर चालू होतेच.

सखुबाई- पर बाई त्यो दवाखाना तर लय लांब हाय. एवढ्या रात्री कसं करनार. जायचं पन काय साधन नाय. गाडी करावी तर त्यासाठी लय पैका लागलं. माझ्याकडं हाय तेवढा पैका त्यातच जाईल मग औषधपान्याचं काय करू. चालत जावं तर रस्ता असा अन म्हतारीला पन नीट दिसना का चालवना. बाई तुमीच सांगा मी काय करू. सखुबाईला काय करावं हेच समजत नव्हतं.

नर्सबाई- बाई, मी तरी काय सांगू. पर आपल्या गावाच्या सरपंचांकडं गाडी आहे. माणूस चांगला हाय. बघ त्याची गाडी मिळाली तर.

मग त्या दोघी पिंकीला घेऊन सरपंचाच्या घरी गेल्या. परिस्थितीचं गांभीर्य बघून सरपंचानं गाडी काढली. रात्रीच्या वेळी त्या डोंगर-दर्‍याच्या रस्त्यावरून 10 किलोमाटर जायला दीड-दोन तास लागले.

सखुबाई- अरं देवा, काय ओ सरपंच भाऊ, आता काय करायचं. पोरीची तब्येत पण खराब होत चाललीया. आता हुंकारपन द्यायचं बंद झालाय. एवढ्या लांब आल्यावर हे काय हा दवाखाना बंद हाय. गावात गोळ्या नायत अन इथं दवाखान्यात कुनीच नाय. आता दिस पार वर आला तरी हा उघडला नाय.

सरपंच- बाई असं रडू नको. तूच जर धीर सोडला तर कसं व्हायचं. आपनं असीच गाडी पुढं नेऊ. पुढच्या गावात प्रायव्हेट डाक्टर हाय. त्याच्याकडं दाखवू. पैशाची काळजी करू नकोस. पोरगीच्या तब्येतीचं

पिंकीच्या गोष्टीतल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघितली तर आपल्याला आर्थिक विषमता समजू शकेल. म्हणजेच गंगाराम आणि सखुबाईचं हातावरचं पोट. त्याच्याकडे असलेल्या कोरडवाहू जमिनीचा तुकडा. त्याचं कर्जबाजारी असणं. शेती कोरडवाहू, त्यात गावातल्या काही लोकांकडे भरपूर जमीन. तर बहुतांश लोकांकडे अगदी थोड्या जमिनी. काहींना तर जमीनच नाही. त्यामुळे जास्त लोक मजुरीवरच जगतात. पाऊस पडला की शेती करायची. चार महिन्यात जेवढं जमेल तेवढं पिकवायचं बाकीचे आठ महिने दुसर्‍यांच्या शेतात मजुरी. या सगळ्या परिस्थितीमुळे गंगाराम आणि सखुबाईला मिळणारा रोजगार आणि कुटुंबाला जगवण्यासाठी येणारा खर्च याचं व्यस्तप्रमाणं. आर्थिक विषमतेचं एक मुख्य कारण म्हणजे समाजातल्या काही ठराविक घटकांकडे असलेला भरपूर पैसा आणि सत्ता; तर त्याच समाजातल्या काही घटकांकडे अगदी उलट परिस्थिती. म्हणजे पैसा आणि सत्ता दोन्हीही नाही. यामुळे श्रीमंत हा अधिक श्रीमंत आणि सत्ताधीश होत जातो आणि गरीब हा तसाच राहतो किंवा अजून गरीब होत राहतो. आरोग्याचा आणि आर्थिक विषमतेचा काय संबंध? आपल्याला जगण्यासाठी काही प्राथमिक गरजा असतात. त्या गरजा भागवण्यासाठी पैसा लागतो. पैसा कमावण्यासाठी आपली तब्येत चांगली हवी कारण जेवढे कष्ट करू तेवढा पैसा मिळणार. जर आरोग्य चांगलं नसेल तर काम/कष्ट कमी करू शकणार, त्यामुळे त्याचा मोबदला कमी मिळणार, त्यामुळे जगण्यासाठी लागणार्‍या गरजा भागवता नाही येणार, त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होणार पुन्हा तेच सगळं चक्र.

समाजातील विविध घटकातील विषमता व त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम

आपला समाज हा विभिन्न घटक मिळून बनलेला आहे. समाजातील व्यक्ती या भिन्न भिन्न विचारसरणीच्या, जाती धर्माच्या असतात. तसेच वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, तसेच समाजात इतरही वेगवेगळे मतप्रवाह असतात. समाजातील हे वेगळेपण आपल्याला नैसर्गिकच वाटत. तसं ते असतेही. कारण वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळेपणा हा असणारच मग हा वेगळेपणा म्हणजेच विषमता का? हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया.

शिक्षणामधील विषमता आणि आरोग्य

महाराष्ट्रात स्त्रिया व पुरुषांमधील शिक्षणाच्या प्रमाणात 14 टक्क्याचा फरक आहे. ग्रामीण भागात हा फरक 19 टक्के तर शहरी भागात 8 टक्के आहे. म्हणजेच ग्रामीण भागात दर 100 पुरुषांमागे केवळ 77 स्त्रिया शिकलेल्या आहेत. महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत विभागवार विषमता देखील आढळून येतात (जनगणना, 2011).

शिक्षणातल्या विषमतेचा संबंध जात, लिंग आणि वर्ग या संदर्भातील सर्व विषमतांशी आहे. आपण असा विचार करूयात की कोणत्या जातीच्या लोकांना शिक्षण सहजरित्या उपलब्ध असतं? शिक्षण घेण्यासाठी काही जातींना  किती प्रयास करावे लागतात? आपल्याला वाटत असेल परिस्थिती बदललेली आहे, पण ती काही प्रमाणात शहरी भागात. कारण ग्रामीण भागात ‘सर्व शिक्षण अभियान’ अंतर्गत मोफत शिक्षण देण्याचं धोरण सरकारनं अवलंबलं असलं तरी ते कागदावरच राबवलेलं दिसतं. शिक्षकांची उपलब्धता, शिक्षणाचा दर्जा ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात विषमता दिसून येते. यामधला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिंग विषमता.

आपल्या पिकींच्या गोष्टीतच बघा ना की पिंकीला सांभाळणार्‍या सगुणाच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे. सगुणा शाळेत गेली असती तरी तिला जुलाब झाल्यावर काय करायचं असतं इतकी तरी नक्कीच माहिती मिळाली असती. आणि त्याचा उपयोग पिंकीचा जीव वाचण्यामध्ये नक्कीच झाला असता. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जर मुलगा असता तर त्याला शिक्षण मिळण्यामध्ये काही अडचण आली असती का? मग पिंकीला सांभाळण्याचं काम आणि घरातली कामं त्या मुलाला करायला लावली असती का? मुलीला शिकून काय करायचंय? ती काय परक्याचंच धन होणार आहे. पोरगा म्हणजे वंशाचा दिवा... अजूनही मुलीला मासिक पाळी सुरू झाली की तिचं शिक्षण बंद केलं जातं. पण कुणी असं नाही म्हणत, की आपण सगळे मिळून तिला संरक्षण देऊ. अशी घटना घडणार नाही याची काळजी आपण सगळे मिळून घेऊ. पण होतं उलटच त्या मुलीचं शिक्षणच बंद करणं हा त्यातल्या त्यात सोपा उपाय. कोण घेणार तिची काळजी आणि त्याहुनही तिच्या शिक्षणाची जबाबदारी?

शहरी आणि ग्रामीण भागातील विषमता

शहरी भागात वेगळी विषमता दिसून येते. ज्याच्याकडे जास्त पैसा आणि सत्ता त्याला ‘चांगलं’’शिक्षण. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यासाठी जिल्हा परिषदचं शिक्षण. ज्याबद्दल बरेच प्रश्न आणि समस्या आहेत. साधारणपणे शहरातल्या शाळांमध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तर वर्षाला कमीत कमी 6000/- रुपये पासून ते 40,000/- रुपयापर्यंत फी भरावी लागते. उच्च शिक्षणाचा तर विचारच करायला नको. त्यासाठी भरमसाठ फी तरी भरायची नाहीतर तगडा वशिला आणायचा. या दोन्ही गोष्टी आपल्या वंचित, मागासवर्गीय, आदिवासी, दारिद्र्यरेषेखालच्या समाजाकडं कुठून येणार. त्यामुळे शिक्षणातल्या विषमतेचा प्रश्न शिक्षण हा नुसता मूलभूत हक्क आणि सर्वांसाठी शिक्षण असं धोरण जाहीर करून सुटणार नाही.

थोडक्यात काय तर शिक्षणामुळे आपले जीवनमान सुधारण्याच्या शक्यता वाढत जातात. जास्त शिक्षण म्हणजे जास्त माहिती, जास्त माहिती म्हणजे चांगलं-वाईट यातला फरक समजण्याची क्षमता वाढणे. शिक्षणाचा आणि नोकरी किंवा आर्थिक स्थितीचा जसा संबंध आहे तसाच आरोग्याचा ही आहे. आतापर्यंत राष्ट्रीय तसेच वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसते की, कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित वर्गामध्ये आजारांचं प्रमाण हे शिक्षित किंवा उच्चशिक्षित वर्गापेक्षा जास्त असतं. याचं कारण म्हणजे आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी असलेल्या माहितीचा अभाव असं आपल्याला म्हणता येईल. तसेच आजारी झाल्यानंतर त्यासाठी लागणार्‍या औषधोपचार वेळेवर घेण्याचे प्रमाण हेही शिक्षणानुसार बदलत जाते. म्हणजेच थोडक्यात योग्य शिक्षणामुळे आपल्या आरोग्याचे संवर्धन होण्याची शक्यता अधिक असते.

आपण काय करू शकतो?

शैक्षणिक विषमतेमुळे उद्भवणार्‍या आरोग्य प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला आपआपल्या कार्यक्षेत्रातील अशा घटकांची माहिती मिळवावी लागेल. त्यांचे प्रश्न शोधावे लागतील. तसेच त्यांना सोडवण्यासाठी काही विशेष उपाययोजना कराव्या लागतील. जसे अशिक्षित किंवा कमी शिक्षित वर्गामध्ये आजाराविषयी तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये मिळणार्‍या सेवा, सुविधा यांची माहिती नसते किंवा कमी असते. हे जाणून घेऊन आपण अशा घटकांसाठी जनजागृती कार्यक्रम राबवू शकतो. ज्यात त्यांना आजारांची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधक उपाय व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतून त्यासाठी मिळणार्‍या सेवा यांची माहिती करून देऊ शकतो.

जाती विषमता आणि आरोग्य

जाती विषमता समजून घ्यायला आपण एका सत्य घटनेबद्दल जाणून घेऊया.

ही गोष्ट आहे मध्यप्रदेश राज्यातल्या बडवानी जिल्ह्यातल्या एका आदिवासी महिलेची. बायडा बाईची (नाव बदलेलं आहे). साधारण 20 वर्षीय गरोदर बायडा बाईच्या पोटात एक दिवस पहाटे 4 च्या दरम्यान जोरदार दुखायला लागलं. ती राहते त्या भागात दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी गाडीची सोय नाही म्हणून तिला झोळीत आणावं लागलं. नंतर बसचा प्रवास करून तिला ग्रामीण रुग्णालयात पोचायला दुपारचे 12 वाजले. तिथं डॉक्टर नव्हते. त्या रुग्णालयातल्या एका नर्सने तिला तपासून जिल्हा रुग्णालयात सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पाठवून दिले. आता तिला खूप त्रास व्हायला लागला होता. नीट बसता सुध्दा येतं नव्हतं. अशातच मोठ्यानं का रडतेस असं म्हणून रुग्णालयातल्या नर्सने तिला मारहाण केली. शेवटी पूर्ण इलाज न करता फक्त एक इंजेक्शन देऊन बायडा बाईला तिथल्याच प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये किंवा इंदोरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले. पण नातेवाईकांनी पैसा नाही असे सांगितल्यावर जर तुम्ही इथून नाही गेलात तर आम्ही तुमच्या विरूध्द पोलिस तक्रार करू अशी धमकीच दिली. शेवटी बायडा बाई कशीबशी त्या ट्रस्ट हॉस्पिटलला संध्याकाळी 7 वाजता पोचली. तिथं डॉक्टरांनी तिला गाडीतच तपासून पोटातलं बाळ दगावलं आहे असं सांगितलं. आईला धोका होऊ नये म्हणून ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे आणि त्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली गेली. पण कसबसं हाता-पाया पडून 10,000/- रुपयावर हे ऑपरेशन झाले. आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून बायडा बाई परत आपल्या गावी आली असता त्याच रात्री तिचे पोट फुगून दुखायला लागलं. परत दवाखान्यात जाणं भाग पडलं पण त्यांनी ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये खूप खर्च झाला म्हणून सरकारी जिल्हा रुग्णालयातच बायडा बाईला दाखल केलं. तिथं तिला चार दिवस अ‍ॅडमिट राहावं लागलं. या रुग्णालयात तिला अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यामध्ये तिथल्या कर्मचार्‍याकडून अतिशय गलिच्छ बोलणं इत्यादी. एकदा तर तिच्या पोटावर गरम पाणी टाकण्यात आलं. अशी सगळी परिस्थिती असतांना एक दिवस डॉक्टरांनी तिचं अर्ध शरीर अधू (अधार्ंग वायू) झालं आहे असं सांगून इंदोरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितलं. इंदोरला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून शेवटी बायडा बाई परत आपल्या गावी आली.

गोष्टीतील या घटनेमधून देखील खूप मुद्दे पुढे येतात. पण इथं मुद्दा मांडायचा आहे तो आरोग्यसेवा देताना दिली जाणारी वागणूक, रुग्णांशी बोलतांना वापरली जाणारी भाषा, दिल्या जाणार्‍या एकूणच सेवेचा दर्जा आणि या सगळ्याचा संबंध आहे जातीशी. एका आदिवासी/वंचित समाजातल्या, खालच्या जातीच्या, पैसा नसलेल्या महिलेला अशी वागणूक दिली जाते. पण या जागी एका उच्च/वरच्या जातीच्या, पैशावाल्या, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या (बायको, मुलगी, आई, मावशी, सासू, आत्या इ.) नातेवाईकाला अशीच वागणूक मिळाली असती का? तर नाही. कारण त्यांंची उच्च जात आहे, पैसा आणि त्यामुळे येणारी सत्ता आहे. गावात आरोग्य कर्मचारी सेवा द्यायला येतो तेव्हा तो कुणाच्या घरी जातो? गावातल्या कोणत्या जातीच्या लोकांच्या आळीत/गल्लीत जातो? सरकारी दवाखान्यात उच्च जातीच्या व्यक्तीला शिव्या, मारहाण केले जात नाहीत. याउलट काही आदिवासी भागात आदिवासींना अजूनही हात लावून तपासलं जात नाही. रुग्ण दवाखान्यात आला की लांबून काय होतयं असं विचारून, या गोळ्या घ्या असं सांगितलं जातं. एकूणच काय तर जे कनिष्ठ जातीचे आहेत त्यांना ना बोलण्याचा, ना राहण्याचा, ना जगण्याचा अधिकार.

आधीची पिंकीची गोष्ट असो किंवा बायडा बाईची एकूण मिळणार्‍या आरोग्यसेवांबद्दलची विषमता आपल्याला दिसून येते. त्यामध्ये औषधांचा तुटवडा, डॉक्टर्स आणि कर्मचारी वेळेवर आणि जागेवर न सापडणं, त्यांची मानसिकता, बाहेरून औषधं मागवणं असेल, जास्तीचे पैसे मागणं असेल, आरोग्यसेवांवर सरकारची तुटपुंजी तरतूद, सरकारी आणि खाजगी डॉक्टरांच्या प्रमाणातली विषमता, सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये आणि खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णाला मिळणार्‍या वागणुकीत फरक, खाजगीमध्ये रुग्णांकडून उकळला जाणारा अवाजवी पैसा, एकूणच खाजगी सेवांवर सरकारचे नियंत्रण नसणं हे सगळे मुद्दे आपल्याला विचारात घेतले पाहिजे.

आरोग्य विषमतेची व्याख्या

आतापर्यंत आपण समाजातील विविध विषमता व त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम थोडक्यात बघितला. आता आपण आरोग्य विषमतेची व्याख्या बघूयात-

मार्गारेट व्हाईटह (Margaret Whitehard)-

‘आरोग्य विषमता’ म्हणजे कोणत्याही दोन सामाजिक गटांच्या आरोग्याची स्थिती व आरोग्यसेवांची उपलब्धता यामधील अन्यायकारक व दूर करता येण्याजोगे फरक होय.

पाउलो ब्रॅवमेन (Paula Braveman)-

आरोग्य विषमता म्हणजे, कोणत्याही समाज गटांमधील कोणताही फरक नव्हे तर जात, धर्म, लिंग आणि आर्थिक वर्गनिहाय सामाजिक फरक होय.

  • आरोग्य विषमता ही संकल्पना केवळ आरोग्यसेवांच्या असमान वाटपाशीच संबंधित नसून सामाजिक न्याय्य तत्त्वांशी निगडित आहे. जात, सामाजिक, आर्थिक, वर्ग, लिंग यावर आधारित समाज घटकामधील विषमता आरोग्य स्थितीमधील अन्याय्यकारक फरकांना जबाबदार असते.
  • विषमतेच्या संकल्पनेचा आणखी खोलात जाऊन विचार केला असता आरोग्य विषमता आरोग्यावर परिणाम करणार्‍या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक घटकांमधील फरकांवर अवलंबून असल्याचे दिसून येते. हे फरक समाज व्यवस्थेत रुजलेले आहेत. समाज व्यवस्थेचा भाग आहेत.
  • भारतात प्रामुख्याने जात व लिंग यावर आधारित सामाजिक स्तर आढळून येतात. हे सामाजिक स्तर तसेच समाजातील विविध आर्थिक वर्गांमधील विषमताही आरोग्य स्थितीतील विषमतेस कारणीभूत आहे.

थोडक्यात विषमता म्हणजे काय?

तर समाजातील वेगवेगळ्या घटकांच्यामुळे भिन्नतेचा लोकांच्या जीवनावर होणारा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम. समाजातील काही विशिष्ट वर्गातील लोक कमी काम करून प्रचंड पैसा कमवतात. त्यामुळे ते आपले जीवनमान सुधारू  शकतात. तसेच आरोग्य सांभाळू शकतात. या उलट काही व्यक्ती रात्रंदिवस काम करूनही त्यांना फार कमी मोबदला मिळतो, जो त्यांच्या मूलभूत गरजाही भागवू शकत नाही. याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पुन्हा त्यांनी आर्थिक स्थिती खालावत जाते आणि हे चक्र सुरुच राहते.

समता व समानतेची व्याख्या

मार्गारेट व्हाईटहर्ड (Margaret Whitehard)-

‘‘समान गरजांसाठी समान उपलब्ध सेवा, समान गरजांसाठी समान वापर व सर्वांसाठी समान दर्जाच्या सेवा म्हणजे समता होय’’.

समता ही केवळ एक तांत्रिक संकल्पना नसून मानवी हक्क, नैतिक मूल्यांची बांधिलकी आणि सर्वांना सेवांची आणि संधींची समान उपलब्धता यासारख्या तत्त्वांवर आधारित आहे.

स्टारफिल्ड (Starfield)-

आरोग्य समानता म्हणजे, सामाजिक, भौगोलिक किंवा जनसांख्यिकीच्या आधारे ठरवलेल्या समाजाच्या व समाज गटांच्या आरोग्य स्थितीतील यंत्रणात्मक असमानतेचा अभाव होय’’.

समानता आणि समता या दोन संकल्पनांमधील फरक

समानता आणि समता या दोन संकल्पनांमध्ये बराच फरक आहे. हा फरक आता आपण समजावून घेऊ. समानता म्हणजे सारखेपणा तर समता म्हणजे योग्य व न्याय्यपूर्ण विभागणी. याचं एक साधं उदाहरण घेऊया. एक भाकरी जर आठ लोकांमध्ये वाटून घ्यायची असेल तर त्याचे आठ समान तुकडे करणे म्हणजे समान वाटप. अर्थातच समानता. परंतु, जर हे वाटप करताना ज्या लोकांना वाटप करायचे आहे त्यांची भूक/अन्नाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाटप केले तर ते वाटप समतेवर आधारित, समन्यायी ठरते. जसे आठपैकी जर दोन जण कुपोषित असतील तर अर्थातच त्यांना जास्त भाकरीची गरज असेल. त्यांची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे भाकरीचे वाटप केल्यास भाकरीची विभागणी समतेच्या आधारावर झाली असे म्हणता येईल. प्रत्यक्षात समता म्हणजे गरजांनुसार संसाधनाचे पुनर्वाटप, पुनर्विचार, आरोग्य विषयक गरजा व उपलब्ध सुविधा, त्यांचा दर्जा व संसाधनांची उपलब्धता यातील समतोल होय.

आरोग्यसेवांमध्ये धोरणात्मक बदलांसाठी शिफारशी

आरोग्यसेवांमधील विषमता कमी करण्यासाठी सेवांच्या बाबतीत एक मूलभूत तत्त्व पाळणे आवश्यक आहे. या विषमता कमी करण्यामध्ये सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आरोग्यसेवा ह्या व्यक्तीच्या खर्च करण्याच्या क्षमतेनुसार पुरवल्या न जाता त्याच्या गरजेनुसार पुरवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी आरोग्यसेवांवरील खर्चाच्या बाबतीत खालील धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे.

आत्ताच्या परिस्थितीतील आरोग्यसेवा अधिक समता आधारित होऊन समाजातील सर्व घटकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी खालील शिफारशी देता येतील.

  • आरोग्यसेवांसाठी असलेल्या आर्थिक तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे (राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या किमान 5%).
  • आरोग्यसेवांच्या उपलब्धतेसोबत त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यावरही भर देणे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्यसेवांची रचना करणे, आरोग्य सेवकांच्या वर्तणुकीत बदल घडवणे व आवश्यक तेथे लोकसहभागातून आरोग्य योजनांची आखणी करणे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या तरतुदी आहेत त्यानुसार राज्यातील सरकारी दवाखान्यांचे बळकटीकरण करणे, आवश्यक ती साधनसामुग्री व औषधे यांचा नियमित पुरवठा करणे गरजेचे आहे.
  • ज्या घटकांना विशेष आरोग्यविषयक गरजा आहेत, त्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे अतिरिक्त आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. उदा. आदिवासी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा प्राप्त करण्यामध्ये ज्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व भौगोलिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांचा विचार करून अतिरिक्त€तरतूद करणे.
  • विशेष आर्थिक तरतूद करणे ज्या गटांसाठी आवश्यक आहे असे गट पुढीलप्रमाणे आहेत-मानसिक आरोग्याशी संबंधित त्रास असणारे लोक, एच्आयव्ही बाधित व एड्स झालेले रुग्ण, अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष उपाययोजना करणे/उपक्रम राबविणे.
  • राज्यात आरोग्य समानता कृती गटाची स्थापना केली पाहिजे. या गटाने राज्यातील आरोग्यसेवा व त्यावरील आर्थिक तरतूद यांचा समतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यानुसार धोरणात्मक शिफारशी दिल्या पाहिजेत.
  • या सर्व तरतुदींबरोबरच आरोग्य विषमता कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पंचायत सदस्य, धोरणकर्ते तसेच समाजाच्या विविध घटकांची (स्त्रिया, दलित, आदिवासी) वेळोवेळी एकत्र बैठक घेणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर खासगी आरोग्यसेवेवर सरकारने नियंत्रण आणणे व त्यांचे नियमन करणे आवश्यक आहे

खासगी आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण

सरकारी आरोग्यव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबरच खासगी आरोग्य व्यवस्थेमधील गुणवत्ता व दर यासाठी सर्वसमावेशक असा कायदा करणे अत्यावश्यक आहे. त्याबरोबरच खासगी व्यवसायातील अनावश्यक तपासण्या उपचार यावर निर्बंध घालण्यासाठी उपचारांसाठी मानके ठरविण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे ट्रस्ट रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे व रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नापैकी 2 टक्के उत्पन्न या रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. त्याचप्रमाणे काही विशिष्ट कार्यक्रमांमध्ये (टी.बी., मलेरिया यांवर नियंत्रण इ.) खासगी डॉक्टरांना सामील करणे व त्यांच्या संसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे. हे सर्व करण्यासाठी सार्वत्रिक आरोग्यसेवा उपलब्धतेची यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.

विकासाच्या प्रारूपाचा पुनर्विचार

  • अन्न सुरक्षा, पोषण, शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता या सर्व घटकांचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची उपलब्धता व समतापूर्ण वाटप हे सर्वांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • कुपोषण ही महाराष्ट्रातील एक मुख्य समस्या आहे. याचा संबंध खाद्यान्न असुरक्षा व गरिबी यांच्याशी आहे. कारण राज्यातील जवळ जवळ 70 टक्के जनतेला पुरेसा आहार प्राप्त होत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी रेशनिंगची व्यवस्था सुधारणे अत्यावश्यक आहे. रेशनिंगची व्यवस्था सर्वांसाठी खुली ठेवण्यात यावी. अन्नसुरक्षा वाढवण्याबरोबरच रोजगार निर्माण करणे सुद्धा आवश्यक आहे.
  • ज्या घरात स्त्री घरप्रमुख आहे अशी कुटुंबे, एक एकर पेक्षा कमी जमीन असणारे (अल्प भूधारक) शेतकरी, असंघटित क्षेत्रातले कामगार, फुटपाथवर राहणारे लोक यांना कुठलीही शहानिशा न करता बीपीएलचा दर्जा देण्यात यावा.
  • शेती क्षेत्रातील संकटांचा सर्वांगीण अभ्यास करून ते दूर करण्याच्या दिशेने ताबडतोब पाऊले उचलायला हवीत. शेतीविषयक धोरणांचा सामान्य शेतकर्‍यांवर होणारा परिणाम तपासून त्यात आवश्यक ते बदल करायला हवेत. पाण्याचे होणारे खाजगीकरण ताबडतोब थांबवले गेले पाहिजे. खाजगी सावकारांचा पाश दूर करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकार तर्फे अर्थपुरवठा केला जावा. खाजगी दवाखान्यात उपचारांवर होणारा खर्च न परवडल्यामुळे शेतकर्‍यांवर खूप मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा पडतो. त्यामुळे सर्वांना उपलब्ध होऊ शकतील अशा चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविणारी सरकारी व्यवस्था सर्वत्र उपलब्ध असावी.
  • विषबाधेवरील तातडीच्या उपचारांची सोय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असावी तसेच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व (समुपदेशक) पुरवल्या जाव्यात.
  • औद्योगिक वाढीचा विचार करत असताना त्यात कुशल तसेच अकुशल कामगार दोहोंसाठी रोजगार निर्माण होईल याचा विचार व्हावा.
  • मोठ्या प्रमाणात जमिनींवर कब्जा करत असताना ती गावकर्‍यांच्या अनुमतीविना तसेच पर्यायी रोजगाराची व्यवस्था निर्माण केल्याशिवाय केली जाऊ नये.

म्हणूनच वरील चौकटींचा परिणाम हा स्त्रियांच्या आरोग्यावरही दिसून येतो. खालावलेल्या आरोग्यासाठी फक्त लिंगभावाला जबाबदार न मानता आर्थिक परिस्थिती, कमी शिक्षण, अपुर्‍या आरोग्यसेवा, संसाधनांवर असमान नियंत्रण या मुद्यांकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. गरिबी, बेरोजगारी, रस्ते, वीज, पाणी आरोग्यसेवांचा अभाव, आरोग्यसेवांची संवेदनहीनता या सगळ्या घटकांचा स्त्रियांच्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो हे आपण पिंकीच्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रसंगांमधून पाहिलं आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे

  • ‘समता’ हे एक मूलतत्त्व आहे त्यामुळे त्याचा विचार केवळ आरोग्याच्या संबंधी न करता एकूणच विकासाचा विचार करताना केला जावा.
  • थोडक्यात विकासाच्या नवीन नीतिचा अवलंब करत असताना केवळ विकास दराचा विचार न करता समाजाच्या विविध घटकांच्या गरजांचा देखील विचार केला जावा.
  • एकूणच सगळीकडे उदारीकरण व खाजगीकरणाचा रेटा दिसत आहे. त्यात स्पष्ट दिसते की खाजगी क्षेत्र कधीही स्वत:चे नियमन स्वत: करत नाही. त्यामुळे त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे. एकूणच समतोल विकासासाठी सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
  • महाराष्ट्र सरकारने अवलंबलेल्या खासगीकरण व उदारीकरणाच्या धोरणामुळे ज्या सामाजिक आर्थिक विषमता निर्माण झाल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एकूणच विकासाच्या नीतिचा पुनर्विचार करणे गरजेेचे आहे.
  • सामाजिक विषमता दूर केल्याखेरीज आर्थिक प्रगतीही फार काळ टिकवून ठेवता येणार नाही. एकूणच सामान्य माणसाचे हित केंद्रस्थानी ठेवून सार्वजनिक व्यवस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे.
  • वरील मुद्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून यासाठी लोकप्रतिनिधी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.

 

माहिती स्रोत:   sathicehat.org (साथी, पुणे)

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate