औरंगाबादचे राज्य शासकीय कर्करोग रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरत आहे. याचा लाभ खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील गोरगरीब जनतेसाठी होणार आहे. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. ज्यांना मुंबईला जाणं, राहणं शक्य नाही; त्यांच्यासाठी राज्य शासकीय कर्करोग रुग्णालय येथील सुविधा थक्क करणाऱ्याच आहेत. तशाच फलदायीही.
कर्करोग रुग्णालयाने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादेतच झालेल्या 2016 च्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत या रुग्णालयाला राज्याचा दर्जा बहाल केला. त्यामुळे राज्यस्तरीय कर्करोग रुग्णालय महाराष्ट्रात पहिल्यांदाच औरंगाबाद शहरातून सुरु झाले. त्याचप्रकारे आशियातील ‘टाटा मेमोरियल, मुंबई’ या पहिल्यांदा स्थापित रुग्णालयाशी संलग्न देखील. म्हणून कर्करोग रुग्णांवर मुंबईत ज्याप्रकारे उपचार होतो, अगदी तशाचप्रकारे राज्य शासकीय कर्करोग रूग्णालयात. अद्ययावत यंत्रसामुग्री, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य.
मराठवाड्यातील ‘रुग्ण सेवेचे केंद्र’ घाटी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) सर्वांना परिचित आहे. घाटीच्या श्रेणी वर्धनांतर्गत राज्यातील पहिले, मराठवाड्यातील एकमेव अशा शासकीय कर्करोग रुग्णालयाची निर्मिती पाच वर्षांपूर्वी (दि. 21 सप्टेंबर 2012) झाली. सन 2008-2009 च्या विशेष आर्थिक तरतुदीत 100 खाटा, 10 अतिदक्षता विभागासाठी खाटा, 08 शस्त्रक्रियागृहे, बाह्य रुग्ण विभाग, किरणोपचार विभागात अत्याधुनिक अशा लिनीयर ॲक्सलेलेटर, सिटी सिम्युलेटर, ब्रेकीथेरपी यंत्रे कार्यान्वित झाली. त्यामुळे स्थापनेपासून ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत दोन लाख 21 हजार 673 रुग्णांचा उपचार सुकर, बचतीचा, आवाक्याचा झाला. दीड लाखांहून अधिक बाह्यरुग्ण तपासण्यात आले. खासगी रुग्णालयातील सेवा सामान्यांना परवडणारी नसते. त्या तुलनेत अगदी मोफत, माफक दरात राज्य शासकीय कर्करोग रुग्णालयात उपचार होतो. दररोज शेकडो रुग्ण या सेवेचा लाभ घेतात.
सन 2013 ते ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत 28 हजार 458 कर्करुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ शासनाने दिला आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना उपचाराचा खर्च लागत नसल्याने अगदी मोफत उपचार याठिकाणी केला जातो. या योजनेत पात्र न ठरलेल्या रुग्णाला मात्र केवळ कमाल पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येणे अपेक्षित असते. तोच खर्च खासगी रुग्णालयात प्रती रुग्ण किमान रुपये सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत असू शकतो. यावरूनच सामान्यांच्या आरोग्याचा विचार शासन करते, हे यावरुन दिसून येते. आकडेवारीवरून या रुग्णालयाचा जनतेला झालेला लाभही लक्षात येतो. नुसताच लाभ नव्हे तर रुग्णालयातील आपुलकीचे वातावरण रुग्णांना पुढील जीवनासाठी उपयोगी ठरते.
अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर यांच्याकडून अहोरात्र मिळणाऱ्या रुग्ण सेवेमुळे परदेशातील रुग्णही राज्य शासकीय रुग्णालयाला पसंती दर्शवतात. उपचार घेतात. एकाच छताखाली लिनीयर ॲक्सिलेटर (लीनॅक), कोबाल्ट, ब्रेकी थेरपी, डे केअर केमोथेरपी, विविध अत्यावश्यक तपासण्या आता भारतीय बनावटीचे भाभाट्रॉन, लीनॅक उपकरणांची सेवाही याठिकाणी उपलब्ध होते आहे.
मराठवाड्याच्या विकासाला अधिक गतिमान करणा-या औरंगाबादच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सन 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री रामदास कदम यांच्या विशेष प्रयत्नांतून कर्करोग रुग्णालयाला ‘राज्य कर्करोग संस्था’ म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे राज्यातील सद्यस्थितीतील एकमेव अशी कर्करोग रुग्णालय संस्था औरंगाबादेत आहे, ही भूषणावह बाब आहे. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्याने रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणात, सोयीसुविधेत मोलाची भर पडणार आहे.
संस्थेनेही यासाठी केंद्र शासनाच्या कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्रालयाकडून 97 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पाठपुरावा केला. त्यात त्यांना यशही आले. केंद्राने त्यापैकी 43 कोटी 51 लाख 50 हजार रुपये मंजूरही केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनेही तत्काळ पूर्वीच्या मूळ प्रस्तावाच्या तुलनेत 48 कोटी रुपयांचा वाटा उचलला.
या निधीतून प्रत्येक विभागाचे अद्ययावतीकरण, आवश्यक उपकरणे, इमारत विस्तारीकरणाकरीता होणार आहे. त्यामुळे या पुढील काळात रुग्णाला उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या लिनीयर ॲक्सिलेटर, सिटी सिम्युलेटर, ब्रेकी थेरपी, सिटीस्कॅन, एमआरआय, डिजीटल मॅमोग्रॅफी, अद्यावत पॅथॉलॉजी आदी उपकरणाचा नव्याने समावेश होणार आहे. रुग्णांच्या 165 खाटांमध्ये भर पडणार असल्याने एकूण 265 खाटांची रुग्णांसाठी व्यवस्था होणार आहे.
भाभाट्रॉन, लीनॅक उपचार पद्धतीचे दोन बंकरही उभारले जाणार आहेत. लवकरच ते पूर्णत्वास येतील. इमारत विस्तारीकरण व बंकरच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम मागील वर्षीच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते झाला. प्रगतीपथावरील हे काम लवकरच पूर्ण होऊन यामुळे रुग्णांच्या सुविधेत वाढच होईल.
महान उद्योजक जे.आर.डी.टाटा यांनी कर्करोगींसाठी आशिया खंडातील पहिले ‘टाटा मेमोरिअल’ मुंबईत उभारले. या टाटा संस्थेशी राज्य कर्करोग रुग्णालय संलग्न आहे. ही बाब राज्यातील जनतेसाठी, औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची आहे. टाटा संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉ.कैलाश शर्मा यामध्ये विशेष लक्ष ठेऊन आहेत. टाटा संस्थेचे तज्ज्ञ देखील वेळोवळी येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतात. त्यामुळे ‘टाटा’ मध्ये मिळणारा उपचार शासकीय कर्करोग रुग्णालयात जनतेला औरंबादेतच मिळतो आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.प्रवीण शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड, कर्करोगींवर योग्य वेळेत उपचार, नातेवाईकांना दिलासा, विश्वास, आपुलकी आणि संस्थेचा विस्तार याला प्राधान्य देतात. अग्रक्रम ठरवतात. त्यातून रुग्णसेवेचे व्रत नेटाने पाळतात. त्याचाच परिणाम म्हणून संस्थेला अल्पावधीतच लाखो रुग्णांवर उपचार करता आले. त्यातून संस्थेचा नावलौकिक वाढला. त्यात अजून भर पडली.
रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचे उत्तम, परिपूर्ण, आदर्शवत असे मॉडेल राज्य शासकीय कर्करोग रुग्णालय ही संस्था असेल, असा विश्वास डॉ.गायकवाड यांना आहे. त्यासाठी त्यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून असणारी धडपड, तळमळ वाखणण्याजोगी आहे. तसेच राज्यासाठी देखील कल्याणकारी.
लेखक - श्याम टरके, औरंगाबाद
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 3/26/2020