शासकीय सार्वजनिक सेवांच्या अंमलबजावणी आधी त्या-त्या सार्वजनिक विभागांमार्फत आजपर्यंत एक ठोस नियोजन म्हणजे पी.आय.पी. (कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा) दरवर्षी होतच आले आहेत. त्यात, सार्वजनिक शिक्षण, अन्न सुरक्षा, रोजगार, वाहतूक, सार्वजनिक आरोग्यसेवा इत्यादींचा समावेश असतो. आजपर्यंत सर्वसाधारणपणे शासकीय कामाचे स्वरूप हे ‘वरून-खाली’ व संस्थाकेंद्रित आहे. या आधारावरच नियोजन, अंमलबजावणी आणि योजनाही आखल्या जातात. जर सेवा/योजना लोकांसाठी असतील तर त्यामध्ये स्थानिक लोकसहभाग हा अत्यंत आवश्यक आहे.
आपल्याला आरोग्यसेवांचे नियोजन करायचे असेल तर गावापासून ते जिल्ह्यांपर्यंत सध्या कोणत्या सेवा दिल्या जातात? त्या खर्या अर्थाने जनतेपर्यंत पोहचतात का? अस्तित्वात असलेल्या सेवांमध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत? हे प्रश्न लक्षात घ्यायला हवेत, परिस्थितीनुसार सेवा बदलण्याची गरज किंवा सेवेत बदल करायचे असल्यास लोकांकडून घेतलेल्या माहितीचा नक्कीच योग्य वापर करता येईल. याच उद्देशाने ’विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजन’ ही संकल्पना पुढे आली. लोकसहभागी नियोजन करताना लोकसहभागातून माहिती गोळा करणे व स्थानिक पातळीवरील सेवांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचा योग्य तो वापर करणे आवश्यक वाटते. विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजनासाठी असलेल्या अनेक मार्गदर्शिकेप्रमाणेच यामध्ये माहितीचे प्रकार, गरज, महत्त्व, स्रोत, विश्लेषण, वापर याविषयी सविस्तर लिहिले आहे. सोबतच, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात केलेले आरोग्यसेवांचे प्रत्यक्ष विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजन केल्याचे उदाहरण देखील नमूद केलेले आहे.
केंद्रित नियोजन व विकेंद्रीत आणि लोकसहभागातून केलेले नियोजन यातील फरक मार्गदर्शिकेत नमूद केला आहे. सार्वजनिक नियोजनामध्ये माहितीची गरज, माहितीचे अनेक पैलू, हवी ती माहिती कशी मिळवायची? माहिती गोळा करताना काय काळजी घ्यायची? सरकारी यंत्रणा व त्यांच्याकडून मिळणारी माहिती, प्राथमिक/स्थानिक स्तरावर असलेल्या शासकीय यंत्रणेचा सहभाग मागण्यांवर आधारित बजेट करण्यासाठी कसा करून घेता येईल? इत्यादी गोष्टींची उकल या मार्गदर्शिकेत करण्यात आली आहे.
अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, आपण आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक वेळी नियोजन करत असतो. संसार चालवण्यासाठी कमाई कशी करायची? आपल्याकडे आलेला पैसा कसा वापरायचा? हे आपण ठरवत असतो. नोकरदार व्यक्ती दर महिन्याला मिळणार्या पगाराचं नियोजन करते. म्हणजेच आपल्या पगारातली काही रक्कम वेगवेगळी बिलं भरण्यासाठी, किराणा माल/रेशन व उपयुक्त जिन्नस, दवाखाना, घरपट्टी इत्यादींसाठी काढून ठेवत असतो. यालाच आपण एक प्रकारचे ‘नियोजन’ म्हणू शकतो.
ज्या कामांमध्ये नियोजन नसते ते काम पूर्ण होण्यामध्ये एकतर खूप अडचणी येतात किंवा ते पूर्णच होत नाही. आपल्याला मिळणारी मिळकत / पगार महिन्याभरात ते कसे वापरायचे याचे नियोजन आपण केले नाही आणि कसेही पैसे खर्च केले तर महिना संपायच्या आत पूर्ण पैसे खर्च होतील. यात आपण कुठल्याही नोंदी किंवा रेकॉर्ड ठेवत नाही. कारण ते खूप मर्यादित आहे व वैयक्तिक पातळीवर लक्षात ठेवणे सहज शक्य आहे.
पैशाच्या नियोजनाबरोबर आपण बाकीच्या गोष्टींचं पण नियोजन करत असतो. त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे नियोजन करत असतो. उदा. घरामध्ये जर कोणाला चपाती/भाकरी करायच्या असतील तर त्यासाठी गहू/ज्वारी आणण्यापासून तयारी करावी लागते. गरम गरम चपाती/भाकरी खाण्यासाठी खूप गोष्टींचे नियोजन करावे लागते. आणि प्रत्येक गोष्टी वेळेत, प्रमाणानुसार आणि योग्य क्षमतेच्या व्यक्तीकडून झाली तरच त्याला चांगले नियोजन म्हणता येते. त्यामुळे नियोजनामध्ये अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. जसे की, चपाती/भाकरीसाठी लागणारे सगळे सामान तयार असेल पण चपाती/भाकरी करणारी व्यक्तीच नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी असून सुद्धा फारसा उपयोग होत नाही. एकूणच काय तर नियोजन हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय आपण कोणतेच काम योग्य पद्धतीने, वेळेत आणि अर्थपूर्ण करू शकत नाही.
वैयक्तिक आयुष्याबरोबर समाजामध्ये सांघिक नियोजनाला तितकेच महत्त्व आहे. समाजात कोणतेही सांघिक काम (दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती मिळून केलेले काम) उभे करण्यासाठी अनेक गोष्टींचे नियोजन करावे लागते. याची अनेक उदाहरणे देता येतील. जसे की, एखादी शाळा चालवणे, रुग्णालय चालवणे, नवीन धरण बांधणे, रस्ता बांधणे; सामाजिक उपक्रम/कार्यक्रम घेणे- उदा. रक्तदान शिबिर आयोजित करणे, गणपती/दहीहंडी उत्सव साजरा करणे इत्यादी.
समाजातला एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे म्हणजे सरकार आणि सरकार चालवण्यासाठी लागणार्या नियोजनामध्ये आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि शासनातील अधिकारी-कर्मचारी यांची गरज असते. सरकारच्या पातळीवरील नियोजन कशाप्रकारे केले जाते ते पुढीलप्रमाणे-
सरकार राज्याचे आर्थिक नियोजन दरवर्षी करत असते. हे नियोजन करताना ’सरकारचं नियोजन’ या तक्त्यानुसार वेगवेगळ्या करांमधून गोळा होणारा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो. एकूण गोळा झालेल्या करातला काही टक्के पैसा राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवते. उरलेला निधी राज्य सरकार आपल्याजवळ ठेवते.
केंद्र सरकार राज्याकडून आलेला पैसा राज्य सरकारला वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत परत देत असते. त्यामुळे राज्य सरकार केंद्राकडून योजनांमार्फत येणारा निधी आणि राज्याच्या तिजोरीत गोळा झालेला कर स्वरूपातील पैसा याचे मिळून नियोजन करते. त्यामध्ये प्रामुख्याने उपलब्ध पैसा वेगवेगळ्या विभागांना वितरित केला जातो. कोणत्या खात्याला/विभागाला किती निधी द्यायचा? हे राज्याचे मंत्रिमंडळ ठरवत असते.
अशाप्रकारे उपलब्ध पैशाच्या आधारे अशाच पद्धतीने गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सरकारकडून चालवल्या जाणार्या सर्व योजना आणि कामांचे आर्थिक नियोजन दरवर्षी होते. त्यासाठी लागणारा निधी, अंदाजित खर्चाचा बजेट तयार केला जातो. उदाहरणार्थ, सार्वजनिक शिक्षण संस्था, सार्वजनिक आरोग्य सेवा, अन्न सुरक्षा, रोजगार, वाहतूक, शेती इत्यादींसाठी दरवर्षी पैसे नियोजित केले जातात त्याला आपण ‘बजेट’ असे म्हणतो.
आर्थिक नियोजन व्यतिरिक्त शासनाच्या पातळीवर राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे/योजनांचे नियोजन केले जाते. त्यामध्ये उपलब्ध निधी, मनुष्यबळ, साधनसामुग्री, वेळ इत्यादी गोष्टी नियोजनात करताना महत्त्वाच्या असतात. ज्यांच्यासाठी कार्यक्रम/योजना राबविल्या जातात त्यांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.
आतापर्यंतच्या अनुभवावरून एकूणच नियोजन प्रक्रियेत खाली दिलेल्या प्रश्नांचा आवर्जून विचार करायला हवा. विशेष करून शासनाच्या पातळीवर नियोजनामध्ये तर या गोष्टींचा विचार होणे खूपच गरजेचे आहे.
समज-गैरसमज |
प्रत्यक्ष कृती करतांना घ्यावयाची काळजी आणि लक्षात ठेवायचे मुद्दे |
|
१. |
फक्त पैशाचे नियोजन केले की सगळे नियोजन झाले. |
|
२. |
नियोजनामध्ये तांत्रिक गोष्टी जास्त असतात त्यामुळे लोकांचा सहभाग कमी असतो. |
|
३. |
सार्वजनिक सेवांचे सगळे नियोजन वरच्या पातळीवर ठरलेले असते. |
|
४. |
स्थानिक पातळीवर समित्यांना नियोजनाचे प्रशिक्षण दिले की नियोजन झाले. |
|
५ |
नियोजनाची मुख्य जबाबदारी ही शासनाची असते. |
|
नियोजन करत असताना काही मूठभर त्रयस्थ लोकांनी लोकांसाठी नियोजन न करता लोकसहभागातून लोकांच्या गरजा समजावून घेणे, त्या गरजांनुसार आरोग्य सेवांचे नियोजन करणे व त्या सेवांवर लोकसहभागामधून देखरेख ठेवणे या प्रक्रियेला विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजन प्रक्रिया असे म्हणतात.
सध्यातरी विकेंद्रीकरणाचा प्राथमिक संबंध सत्ता आणि सत्तेच्या विभागणीशी आहे. एका ठिकाणी जमा झालेली सत्ता/अधिकार आपल्या खाली असलेल्या घटकांना देणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. प्रशासनातील व व्यवस्थापनातील तज्ज्ञ व्यक्तींनी / घटकांनी आपले अधिकार / सत्ता आपल्यापेक्षा अधिकाराने कमी असलेल्या व्यक्तींना / घटकांना देणे.
अर्थकारणाचे उदारीकरण व मुक्त व्यापाराचे धोरण यामुळे अधिकारांचे विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात चालू झाले. सध्याच्या घडामोडींकडे पाहता विकेंद्रीकरण फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता ते व्यवस्थापन, अर्थकारण व प्रशासन या घटकांमध्ये देखील आहे. अधिक ठोस बोलायचे झाल्यास विकेंद्रीकरण म्हणजे नियोजनाचे हक्क स्वामित्त्व, निर्णय घेण्याचा अथवा नियोजन व व्यवस्थापन करण्याचा अधिकार केंद्रशासन व त्यांच्या विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायतराज संस्था, शासनाच्या खालच्या दर्जाचे विभाग, निमशासकीय मंडळ, विभागीय मंडळ किंवा स्वयंसेवी संस्था यांना दिले जाणे.
‘अल्मा-आटा जाहीरनाम्यात’ सन 2000 पर्यंत ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना मान्य करण्यात आली होती. त्या आधारावरच भारताने आपल्या पंचवार्षिक योजनेत लोकसहभाग व पंचायतराज यांना अधिक अधिकार दिले. तसेच शासनाने नियुक्त केलेल्या विविध कमिट्यानी देखील पंचायतराज स्तराला विशेष अधिकार देण्याची मागणी केली. पंचायतराज व्यवस्थेला जर सक्षम केले तर लोकांचा सहभाग, आरोग्य यंत्रणेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
केंद्रित नियोजनविकेंद्रीत नियोजन |
|
प्रशासनच केंद्रस्थानी असते. |
लोक केंद्रस्थानी असतात. |
नियोजनातील महत्त्वाचे निर्णय वरून म्हणजेच राज्य किंवा केंद्र पातळीवर ठरतात आणि स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करायचे आदेश पाठवले जातात. |
नियोजनाची रूपरेषा फक्त वरच्या पातळीवरून स्थानिक पातळीवर पाठवली जाते. मुख्य निर्णय लोकसहभागातून घेतले जातात. स्थानिक पातळीवर झालेले निर्णय वरच्या पातळीवर अंमलबजावणीसाठी पाठवले जातात. |
एकाच अधिकारी/व्यक्तीच्या हातात अधिकार शिवाय जबाबदारी. |
जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदार्या देता येतात व अधिकार कोणाला असतील हे ठरवता येते. |
अधिकारी आणि कर्मचारी लोकांच्या वतीने निर्णय घेतात. |
लोक स्वत: निर्णय घेतात. यामध्ये लोकांना निर्णय घेण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांना फक्त मदत करण्याची जबाबदारी दिली असते. |
निर्णय प्रक्रियेत फक्त शासन यंत्रणा असल्यामुळे एककल्ली विचार होण्याची शक्यता जास्त असते. |
निर्णयप्रक्रियेत समाजातील वेगवेगळे घटक सहभागी असल्यामुळेे सर्व बाजूंनी विचार होण्याची शक्यता असते. |
या पद्धतीतून लोकांची क्षमताबांधणी खूप कमी होते. |
या पद्धतीतून लोकांची क्षमताबांधणी व्हायला खूप वाव असतो. |
साधारण खालील पद्धतीने भारत सरकार आरोग्य क्षेत्रात विविध योजना व कार्यक्रमांचे नियोजन करते. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करायची गरज आहे; त्यासाठी किती पैशांची व इतर साधनसामुग्रीची गरज आहे. ही गरज कशी भागवायची; आरोग्यसेवांसाठी उपलब्ध असलेला निधी व साधनसामुग्री कशी वापरायची याचे सरकार नियोजन करते.
आपण कर स्वरूपात जो पैसा भरतो तो सरकारच्या तिजोरीत जमा होतो. करामधून मिळालेला पैसा इतर साधनसामुग्री, मनुष्यबळ या सगळ्यांच्या आधारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नियोजन करत असते. त्यासाठी सरकारला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. सध्या सरकार सर्वात जास्त पैसा संरक्षण क्षेत्रात गुंतवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विकेंद्रीत नियोजन बरेच वेळा केंद्रित पद्धतीने केले जाते असे लक्षात येते.
विकेंद्रीत नियोजनाचा गाभा म्हणजे लोकसहभाग. पण ‘लोकांचा सहभाग’ प्रत्यक्षात आणायचा असल्यास सर्वात पहिले समाजातल्या नक्की कोणत्या घटकांतल्या लोकांचा सहभाग घ्यायला हवा. कारण समाजात त्यामध्ये देखील विषमता दिसून येते. म्हणून निर्णयप्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रमाने समाजातील वंचित, दलित समुदाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय घटकांतील लोकांचा सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या वंचित घटकामध्ये महिला, जाणकार मुले, मुली, वयोवृद्ध व्यक्ती यांना देखील प्राधान्य देण्यात यायला हवे. तसेच आपल्या भारतात प्रतिनिधिक लोकशाही असल्यामुळे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्याकडे लोकांच्या वतीने निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणून नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे महत्त्वाचे असते. तसेच शासकीय यंत्रणेमध्ये देखील एक प्रकारची उतरंड दिसून येते, ज्यामध्ये स्थानिक पातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार खूपच कमी असतात. त्यांची जबाबदारी जास्त करून अंमलबजावणीची असल्याने नियोजनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
महाराष्ट्रात कोणत्याही सार्वजनिक सेवेचे उदा. आरोग्य, शिक्षण, रोजगार इत्यादींचे नियोजन विकेंद्रीत व लोकसहभागी करणे शक्य आहे. नियोजनाच्या दृष्टीने प्रत्येक सार्वजनिक सेवेत वेगवेगळ्या तरतुदी आणि जागा आहेत.
गावपातळीवर |
तालुका पातळीवर |
जिल्हा पातळीवर |
|
पंचायत समिती आमसभा |
जिल्हा नियोजन व विकास समिती |
राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये फ्रेमवर्क फॉर इम्प्लीमेंटेशन (framework for implementation) या केंद्रशासनाच्या स्तरावर काढलेल्या पुस्तिकेमध्ये विकेंद्रीत नियोजनासंदर्भात मांडणी केली आहे. मुख्यत्वे त्यामध्ये खालील आकृतीत दाखवलेल्या मुद्यावर भर दिला आहे. ज्यामध्ये आपल्याला विकेंद्रीत लोकसहभागी नियोजन करता येऊ शकते.
राज्य पातळीवर तयार होणार्या नियोजन कृती आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना येतात. त्या सूचनांनुसार राज्य सरकार आरोग्यसेवांचे नियोजन करते. त्यानुसार राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला नियोजनाचा आराखडा पाठवते. नियोजनाच्या आराखड्यांमध्ये वेगवेगळे विभाग असतात. त्यामध्ये सरकारने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची यादी असते. हे सर्व कार्यक्रम घेण्यासाठी लागणारा निधी, मनुष्यबळ, संसाधनाची गरज यानुसार आराखड्यातून जिल्हावार सरकारला सांगितले जाते. त्यानुसार संपूर्ण राज्याचे नियोजन होत असते. गावपातळीवर हे आराखडे भरण्यासाठी एक साखळी आहे. ज्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी सहभागी असतात. त्यात लोकसहभाग कसा करून घ्यायचा याच्याही सूचना असतात.
गावातील लोकसंख्येनुसार प्रत्येक गावात अबंधित निधी येतो. हा निधी खर्चाच्या नियोजनात सर्व समिती सदस्य आणि लोकांचा सहभाग करावा/असावा हे बंधनकारक आहे. निधीच्या नियोजनात गावातील गरजू आणि निराधार रुग्णांसाठी अबंधित निधीतून काही प्रमाणात खर्च, तत्काळ संदर्भ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी, अंगणवाडीतील तीव्र कुपोषित मुलांसाठी औषधे आणि पोषण आहार इत्यादी गोष्टींचे नियोजन हे लोकसहभागी विकेंद्रीत पद्धतीने नक्कीच होऊ शकेल.
2005 सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत ग्रामीण भागात आरोग्यसेवांमध्ये भरीव सुधारणा व्हाव्यात या उद्देशाने महाराष्ट्रात 3101 आरोग्य केंद्रांमध्ये वाढीव निधी दिला जात आहे. त्यामध्ये रुग्ण कल्याण समिती निधी 1,00,000/- (एक लाख) ज्याच्या खर्चाचे नियोजन पूर्ण समिती सदस्यांना ठरवून करायचे असतात. समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था-संघटना प्रतिनिधी आणि आरोग्य केंद्राचे अधिकारी असतात. जेणेकरून सर्वांगाने रुग्णहिताचे निर्णय घेतले जातील. समितीच्या नावाने वार्षिक देखभाल आणि अबंधित असे दोन प्रकारचे निधी प्रत्येक आरोग्य केंद्रात येतात. हा निधी आरोग्य केंद्राच्या सेवा आणि संस्था बळकटीकरणासाठी वापरता येतो. मात्र निधीचे काय नियोजन करायचे हे समितीच्या हातातच असते.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये एकूणच नियोजनाची परिस्थिती पाहता विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजन प्रक्रिया कशी राबवता येईल, स्थानिक लोकांकडून आलेल्या त्यांच्या मागण्यांचे बजेटमध्ये रूपांतर कसे करता येईल? त्यासाठीचे महत्त्वाचे घटक कोणते याची सविस्तर माहिती प्रकरण 3 मध्ये नमूद करण्यात आली आहे.
क्र. |
आरोग्य संस्थेचा प्रकार |
रुग्ण कल्याण समिती निधी |
वार्षिक देखभाल निधी |
अबंधित निधी |
एकूण |
मार्गदर्शक सूचनांनुसार बँक खाते कोणाच्या नावावर असते? |
1. |
प्राथमिक आरोग्य केंद्र |
1 लाख |
50 हजार |
25 हजार |
1 लाख 75 हजार |
तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी |
2. |
ग्रामीण रुग्णालय |
1 लाख |
1 लाख |
50 हजार |
2 लाख 50 हजार |
अधिक्षक, ग्रामीण रु. व त्या रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी |
3. |
उपजिल्हा रुग्णालय |
1 लाख |
1 लाख |
50 हजार |
2 लाख 50 हजार |
अधिक्षक, उपजिल्हा रु. व त्या रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी |
विकेंद्रीत लोकसहभागी नियोजन प्रकिया राबवण्याआधी आपल्या जवळ असणारी साधनसामुग्री, मनुष्यबळ, पैसा याचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर नागरिकांच्या मागण्या शोधणं, त्या मागण्यांचा प्राधान्यक्रम लावणे, कोणती मागणी सर्वात महत्त्वाची आहे हे बघणं, आलेली मागणी कुठल्या बजेटहेडमध्ये बसते हे पाहणे, मागणी सोडवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो का हाही विचार करणे. इत्यादी गोष्टी जरी एकाच वेळी कराव्या लागत असल्या तरी त्यांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांकडे देणे अपेक्षित आहे. म्हणून विकेंद्रीत लोकसहभागी नियोजन प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने राबवली तर त्यात वेगवेगळे लोक आपली भूमिका योग्य त्यावेळी पार पडतात.
मुख्यत्वे चार महत्त्वाच्या टप्यात विकेंद्रीत आणि लोकाधारित नियोजन आपण करू शकतो ते खालीलप्रमाणे-
पहिला टप्पा- लोकसहभागी पद्धतीने सार्वजनिक सेवां-बद्दलच्या लोकांच्या मागण्या एकत्र करणे.
गावातील लोकांच्या मागण्यांची माहिती गोळा करण्याआधी ग्रामपंचायत स्तरावर गाव बैठकीबाबत चर्चा करून आपण कोणत्या प्रकारे माहिती घेत आहोत याची कल्पना देणे. जेणेकरून गावस्तरावरील सर्व समित्यांना औपचारिकरीत्या माहिती पोहचेल आणि गाव बैठकीत त्याचा सहभाग देखील निश्चित होईल. (गाव आरोग्य, पाणी पुरवठा पोषण आणि स्वच्छता समिती, दक्षता समिती, शिक्षण समिती, पाणी समिती इत्यादी)
प्रत्यक्ष बैठकीत गावातील सर्व लोकांचा सहभाग करून बैठकांमध्ये विकेंद्रीत नियोजन म्हणजे काय?, त्याचे महत्त्व काय?, पीआयपी म्हणजे काय?, तो कसा तयार होतो?, पीआयपी तयार करण्यामध्ये आपला सहभाग का महत्त्वाचा आहे? या मुद्यांवर आधी चर्चा व्हावी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बैठकांमध्ये लोकांच्या स्थानिक पातळीवरील मागण्या जाणून घेण्याच्या प्रयत्न केला जावा. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक नागरिक / स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला तर लोकांकडून माहिती/मागण्या काढून घेण्यास मदत होते. शिवाय अस्तित्वात असलेल्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्यक्षात तसे घडत आहे का याचीही विचारणा व्हावी जेणेकरून त्या योजनेची पारदर्शकता लक्षात घेता येईल.
प्रत्येक गावात ग्रामसभा/गावबैठकी सारख्या दोन-दोन बैठका घेऊन, त्यात महिला-पुरुष यांचा जास्तीत-जास्त सहभाग नोंदवला गेला पाहिजे. गावामध्ये एक बैठक गाव आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता पोषण आहार समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व गावपातळीवरील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आणि दुसरी बैठक वंचित गटांसोबत व स्त्रियांसोबत घेण्यात यावी.
गावातील बैठकांमध्ये लोकांकडून गाव, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय या व्यवस्थेशी संबंधित काय असावे आणि काय नसावे, याबाबतीत पर्याय व सूचना इत्यादी मागण्या/गरजा पुढे येणे अपेक्षित आहे. आलेल्या माहितीची नोंद ठेवणे व पुढील घडामोडींसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवणे यासारखी जबाबदारीची कामे यंत्रणेतील कर्मचारी आणि गावातील एखादी समिती यांनी घेतले तर पाठपुरावा करणे अधिक सोपे जाईल.
दुसरा टप्पा - मागण्यांचे विश्लेषण आणि प्राथमिकता ठरवणे
लोकसहभागी पद्धतीने विविध सेवांबाबत आलेल्या सर्व मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी (क्कग्र्), जिल्हा पातळीवरील सर्व विभागांचे विभाग प्रमुख (क्तग्र्क़्) यांच्यासोबत आलेल्या मागण्यांची मांडणी होणे अपेक्षित आहे. त्यांच्यासमोर मांडण्यात आल्येल्या सार्वजनिक सेवांबाबत असलेल्या मागण्यांवर जिल्हास्तरावर सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एकत्रित चर्चा घडवावी. या चर्चेचा मुख्य उद्देश आहे की, ‘सार्वजनिक सेवांबद्दल आलेल्या मागण्यांची प्राथमिकता ठरवणे आणि येत्या आर्थिक वर्षात त्या कशा पूर्ण करता येतील याची खालीलप्रमाणे वर्गवारी करणे.
याप्रमाणे वर्गवारी आखली तर, ज्या मागण्या सोडवण्यासाठी निधीची गरज आहे, सध्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय साधून सुटणार्या मागण्या आणि अशा मागण्या ज्या लोक आणि आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये संवाद करून सोडवणे गरजेचे आहे यांची विभागणी करणे सोपे होईल.
नियोजन कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी बजेट/निधीची गरज असलेल्या मागण्यांबाबत त्या-त्या पातळीवरील अधिकार्यांसोबत चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवावा.
प्रस्ताव कसे तयार करावेत यासाठीचा आराखडा कसा असेल यासाठी परिशिष्ट 2.2 पाहावे.
तिसरा टप्पा - जिल्हा आणि स्थानिक पातळीवर लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धोरण/कृती आराखडा
चौथा टप्पा- आरोग्यसेवांच्या विकेंद्रीत नियोजन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेल्या निर्णयांचा पाठपुरावा करणे
विकेंद्रीत लोकसहभागी नियोजन प्रक्रिये अंतर्गत आलेल्या गरजा सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आणि जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्या-त्या पातळीवर असलेली देखरेख व नियोजन आणि रुग्ण कल्याण समित्यांची असेल.
2. सध्याच्या यंत्रणेमध्ये समन्वय साधून सुटू शकणार्या मागण्यांचा पाठपुरावा
थोडक्यात पण महत्त्वाचे...
लोक, ग्राम पंचायत, पंचायत समिती सदस्य यांची भूमिका मागण्यांसंदर्भात नियोजन, देखरेख व अंमलबजावणीसाठी खूप महत्त्वाची आहे. नुसत्या मागण्या मान्य होऊन त्याचे बजेट मंजूर होणे पुरेसे नसून मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या पातळीवर होत असलेली कार्यवाही वेळेवर पूर्ण होऊन त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी लोक, समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांची आहे. उदा. आरोग्य विभागात, उपकेंद्रासाठी स्वतंत्र प्रसूतिगृह बांधण्याची लोकांची मागणी असेल तर पुढील आर्थिक वर्षात बजेट मंजूर झाल्यावर प्रसूतीगृहाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू असताना त्यावर देखरेख ठेवायची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी, देखरेख व नियोजन समिती आणि रुग्ण कल्याण समिती सदस्य यांनी घ्यावी. प्रायोगिक तत्त्वावर कुठल्याही एका सार्वजनिक क्षेत्रात लोकसहभागी विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया राबवण्यात आलेल्या या प्रक्रियेचा सकारात्मक अनुभव लक्षात घेता, इतर सामाजिक सेवांमध्ये देखील विकेंद्रीत नियोजनाची प्रक्रिया राबवायला हवी. त्यासाठी सुरुवात म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारित येणार्या सामाजिक सेवांचे विकेंद्रीत नियोजन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करायला हवे. त्यामध्ये शिक्षण, रोजगार हमी योजना, अंगणवाडी सारख्या सामाजिक सेवा ज्या आरोग्याशी जोडलेल्या आहेत त्यांचा समावेश करून या प्रक्रियेसाठी नक्कीच उपयोगी होऊ शकेल.
एन.एच.एम. मधील ’विकेंद्रीत नियोजन’ या महत्त्वाच्या संकल्पनेला आणखी बळकट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असलेल्या ’आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिये’मधून केला जात आहे. त्यामध्ये गेली 4-5 वर्षे काही भागांमधून आरोग्यासंदर्भातील लोकांच्या मागण्यांचा पीआयपीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आरोग्यसेवांचे विकेंद्रीत नियोजन या प्रक्रियेतील नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीत पुढील कमतरता दिसून येत होत्या. त्यात आरोग्यसेवांच्या विकेंद्रीत नियोजन प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग एकूणच कमी, जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या क्षमता आणि गाव ते जिल्हा पातळीवरील अधिकारी यांच्यातील समन्वय कमी, स्थानिक पातळीवरील गरजा काय आहेत? या प्रत्यक्ष लोकसहभागातून न घेता आरोग्यसेवांवरील विकेंद्रीत नियोजन हे प्रशासकीय पातळीवर असलेल्या माहितीच्या (एच.एम.आय.एस.) आधारे करण्यात येतं, एच.एम.आय.एस. माहितीचे स्थानिक पातळीवरून कोणतेही मूल्यांकन न करता, अथवा तज्ज्ञ लोकांकडून अभिप्राय न घेता जिल्हास्तरावर एकत्रित प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार केले जातात. त्यानुसार, जिल्हा पातळीवरील खर्चाच्या अंदाजपत्रकात स्थानिक पातळीवरून आलेल्या प्रस्तावाचा समावेश क्वचितच झालेला दिसून येत होतं.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, ‘आरोग्यसेवांचे लोक-सहभागातून विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया’ प्रायोगिक तत्त्वावर गडचिरोली जिल्ह्यात 2015-16 या आर्थिक वर्षात तीन तालुक्यात आणि जिल्हा पातळीवर राबवली गेली. स्थानिक लोकांकडून आलेल्या आरोग्यसेवांच्या मागण्यांचे बजेटमध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया राबवणे हा विकेंद्रित नियोजन प्रक्रिया गडचिरोलीमध्ये राबविण्याचा मुख्य उद्देश होता. सदर प्रक्रिया राबविण्यासाठी श्रीमती संपदा मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा यांनी पुढाकार घेतला तर या प्रयत्नाला जिल्हा आरोग्य अधिकारी; जिल्हा शल्य चिकित्सक; अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी; माता व बाल आरोग्य अधिकारी आणि लोकाधारित देखरेख प्रक्रियेतील जिल्हा समन्वय संस्था आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा इत्यादींनी सहकार्य केले. तसेच राज्यपातळीवरून राज्य आरोग्य संसाधन केंद्र; साथी संस्था, राज्य समन्वय संस्था, लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया यांनी ही प्रक्रिया पुढे नेली.
क्र. |
प्रकार |
मागण्यांचे प्रकार |
1. |
निधी/बजेट |
अशा मागण्या ज्या सोडवण्यासाठी फक्त निधीची किंवा बजेटमध्ये प्रस्ताव पाठवण्याची गरज आहे. |
2. |
आरोग्य यंत्रणा |
अशा मागण्या ज्या सध्याच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सुटू शकणार्या आहेत ज्यासाठी फक्त आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वयाची गरज आहे. |
3. |
लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया |
अशा मागण्या ज्या स्थानिक पातळीवरील लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेमार्फत लोक आणि आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये संवाद करून सोडवता येतील. |
याप्रमाणे, विभागणी केली असता, 87 मागण्यांना निधीची गरज, 27 मागण्या आरोग्य यंत्रणेतील समन्वय आणि थोड्या प्रमाणात बदल केल्याने सुटू शकतील. आणि 30 मागण्या या लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेतून म्हणजे स्थानिक पातळीवरील समिती सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने पूर्ण होऊ शकतील हे चित्र समोर आले.
क्र. |
मागणी |
मागणी सोडवण्याचा प्रयत्न |
1. |
शौचालयामध्ये कमोडची सोय |
लोकांच्या मागणीनुसार आरोग्य केंद्रांमधील शौचालयामध्ये कमोडची सोय करावी अशा सूचना तसेच आदेशपत्र जिल्हा पातळीवरून तात्काळ काढण्यात आले. |
2. |
आरोग्य तपासणीसाठी गृहभेटी |
गावांमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी आणि गृहभेटींसाठी आरोग्य कर्मचार्यांच्या भेटी नियमित व्हाव्यात, अशी लोकांची मागणी होती. या मुद्यावर जिल्हास्तरीय बैठकीत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य कर्मचार्यांचे नियमित पर्यवेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. |
3. |
निधी व्यतिरिक्त लोकांच्या मागण्या |
स्थानिक पातळीवरील लोक आणि आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये संवाद साधून, कर्मचार्यांच्या गैरहजेरी, रुग्णांना वाईट वागणूक, आरोग्य सेवा देण्यासाठीचा आरोग्य कर्मचार्याकडून विलंब होणे, जननी सुरक्षा योजनेचे पैसे वेळेवर न देणे या प्रकारच्या मुद्दयांसाठी त्या-त्या आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधण्यात आला. उदा. आरोग्य केंद्रात नियमित वीजपुरवठा केला जावा यासाठी वीज पुरवठा केंद्रांमधील अधिकारी यांच्याशी लोकांनी संवाद करून स्वतंत्र डी.पी. बसवण्याची प्रक्रिया सुरू केली. |
क्र. |
मागणीचे स्वरूप |
आरोग्य संस्थेचे नाव |
1. |
उपकेंद्रांमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना जेवणाची व्यवस्था करणे. |
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या उपकेंद्रांमध्ये नियमित बाळंतपण होते अशी सर्व उपकेंद्रे. |
2. |
कमी संख्या असलेल्या ठिकाणी नवीन आशांची नियुक्ती करणे. |
कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव प्रा.आ.केंद्रातील नवरगाव उपकेंद्रातील गावे. |
3. |
उपकेंद्रात कंत्राटी एएनएमची नियुक्ती करणे. |
आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी प्रा.आ. केंद्रातील खडकी उपकेंद्र. |
क्र. |
मागणीचे स्वरूप |
आरोग्य संस्थेचे नाव |
1. |
उपकेंद्रांमध्ये स्वतंत्र प्रसूतिगृह बांधण्यात यावे. |
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा प्रा.आ. केंद्रातील येंगलखेडा व चिचेवाडा उपकेंद्र, देऊळगाव प्रा.आ. केंद्रातील बेलगाव उपकेंद्र, कोरची तालुक्यातील कोटगुल प्रा.आ. केंद्रातील नागपूर, देऊळभट्टी उपकेंद्र. |
2. |
प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची व्यवस्था करणे. |
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा प्रा.आ.केंद्र. |
3. |
बाळंतपणासाठी आलेल्या महिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी माहेरघर बांधणे. |
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा प्रा.आ.केंद्रातील येंगलखेडा, चिचेवाडा उपकेंद्र व कढोली प्रा.आ. केंद्रातील गंगोली, सोनेरंगी उपकेंद्र |
4. |
आरोग्य केंद्रांमधील शौचालयांची दुरुस्ती करणे. |
आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी प्रा.आ. केंद्रातील येन्गाडा उपकेंद्र. |
क्र. |
मागणीचे स्वरूप |
आरोग्य संस्थेचे नाव |
1. |
उपकेंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे. |
कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव प्रा.आ. केंद्रातील बेलगाव उपकेंद्र |
2. |
बाळंतपण करण्यासाठी लागणार्या टेबल्स्ची खरेदी करणे. |
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या केंद्रांमध्ये टेबल्स नाहीत अशी सर्व प्रा.आ. केंद्रे व उपकेंद्रे |
3. |
उपकेंद्राच्या खिडक्या दुरुस्त करणे. |
तालुका कोरची, कोटगुल प्रा.आ. केंद्रातील नागपूर, देऊळभट्टी उपकेंद्र. |
लेखन, संकलन, संपादन: हेमराज पाटील, डॉ. नितिन जाधव, श्वेता मराठे, दिपाली यक्कुंडी
माहिती स्रोत: साथी (SATHI- Support for Advocacy & Training to Health Initiatives)
अंतिम सुधारित : 8/9/2020
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक...
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक...
या विभागात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्या...
सध्या आरोग्य क्षेत्रात ढोबळमानाने दोन दृष्टिकोनातू...