भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 वर्षे) व 1/3 लोकसंख्या ही 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे. एवढी मोठ्या संख्येतील किशोरवयीन व युवा देशाचा सामाजिक व आर्थिक विकास घडवू शकतात. या युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी त्यांच्यापुढे अनेक प्रश्नही आहेत. किशोरावस्थेत शारीरिक वाढ, मानसिक अवस्था व संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे या अवस्थेतील मुलामुलींना अनेक प्रश्न, शंका असतात. त्यांची उत्तरे शाळा महाविद्यालयात मिळत नाहीत. अशावेळी हे लोक जी माहिती गोळा करतात त्यात त्यांना चुकीची माहिती मिळाली तर त्यांचा प्रवास वेगळ्या वाटेवर घेवून जावू शकतो व त्याला आळा घालणे कठीण होऊन बसते. म्हणून त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रश्नांची सोडवणूक वेळेत व अचूक करणे गरजेचे ठरते. या सर्व बाबींचा विचार करुन केंद्र शासनाने राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम हाती घेतला असून किशोरवयीनांकरिता हेल्पलाईन याबरोबरच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत आहे. या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे हे प्रथम समजून घेऊया.
किशोरवयीन आरोग्यअंतर्गत विविध आरोग्यसेवा देण्यात येतात. या आरोग्यसेवा किशोरवयीन आरोग्य क्लिनिक, शाळा, कॉलेज व कार्यक्षेत्रामध्ये बाह्य संपर्क कार्यक्रम आयोजित करुन दिले जातात. किशोरवयीन आरोग्य क्लिनिक हे राज्यात निवडलेल्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहेत. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक कार्यरत आहेत. प्रत्येक क्लिनिकमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका/स्टाफ नर्स आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये किशोरवयीन आरोग्य समुपदेशक कार्यरत आहेत. ते किशोरवयीनांना मार्गदर्शन व समुपदेशन करतात.
सन 2014-15 मध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड व गडचिरोली हे ते जिल्हे आहेत.
किशोरवयीन आरोग्य क्लिनिकमधून किशोरवयीनांना मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. त्वचेच विकार, मासिक पाळीविषयक समस्या, प्रजनन मार्गाचे आजार, गर्भनिरोधक साधनांविषयक माहिती, व्यसनाधिनता, हिंसा, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येच्या प्रवृत्ती इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाते. समुपदेशकामार्फत शाळा व कॉलेजमध्ये बाह्य संपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणे करुन जास्तीत जास्त किशोरवयीनांना माहिती दिली जाईल.
- आकाश जगधने,
सहाय्यक संचालक (मा)
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/19/2020
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवाव...
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास रक्तस...
वयात येताना किंवा वयात आल्यानंतरही चेहऱ्यावर मुरूम...
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक...