अर्ध्यापेक्षा जास्त बालमृत्यू कुपोषणामुळे होतात. कारण कुपोषणाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गुणवत्तारहित आहार, वारंवार होणारे आजार आणि लहान मुलांची पुरेशी किंवा मुळीच काळजी न घेण्याने त्यांचे कुपोषण होते.
एखादी गर्भवती स्त्रीचे कुपोषण झाल्यास किंवा तिचे मूल वयाच्या पहिल्या दोन वर्षांच्या दरम्यान कुपोषित राहिल्यास अशा मुलाची शारीरिक तसेच मानसिक वाढ व विकास धिम्या गतीने होतो. ह्याची कोणती ही भरपाई मूल मोठे झाल्यावर करता येत नाही - असे मूल जन्मभर तसेच राहते.
वाढीच्या दिवसांत सुरक्षित व आपलेपणाचे वातावरण, पोषक आहार, रोगांपासून संरक्षण आणि वाढ व विकासास अनुकूल परिस्थिती मिळणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे.
बाळाच्या विकासाचे व एकंदर वाढीचे महत्वपूर्ण लक्षण म्हणजे त्याचे नियमितपणे वाढणारे वजन होय. आरोग्यकेंद्राला दिलेल्या प्रत्येक भेटीचे वेळी मुलाचे वजन केले पाहिजे.
पहिले सहा महिने फक्त आईच्या दुधावरच वाढलेल्या मुलांची प्रकृती सामान्यपणे चांगली दिसते. स्तनपान करविल्याने आजारांपासून मुलांचे संरक्षण होते तसेच त्यांची शारीरिक व मानसिक वाढ आणि विकास उत्तम रीतीने होतो. त्यांच्या तुलनेमध्ये आईचे दूध न मिळणारी मुले कमी वेगाने शिकतात.
दोन महिन्यांत मुलाचे वजन वाढले नसल्यास त्यास अधिक किंवा अधिक पोषणयुक्त अन्नाची गरज असू शकते किंवा ते आजारी असेल किंवा त्याची जास्त काळजी घेण्याची गरज असू शकेल. अशावेळी बाळाकडे अधिक लक्ष देऊन पालक व आरोग्यसेवकाने ह्या मागील कारण शोधले पाहिजे. बाळाच्या वाढीचा एक तक्ता उर्फ ग्रोथ-चार्ट बनवून प्रत्येक वेळी वजन केल्यानंतर वाढत्या वजनानुसार त्यावर खुणा करा. ह्या खुणा किंवा ठिपके जोडल्यास एक रेषा तयार होऊन ती बाळाचे वाढते वजन दाखवेल. रेषा वरील दिशेने चढत असल्यास बाळाची वाढ चांगली आहे असे समजा. परंतु रेषा आडव्या किंवा खालील दिशेने जात असल्यास काहीतरी गडबड आहे.
बाळाचे वजन नियमितपणे वाढत नसल्यास किंवा त्याची वाढ नीट होत नसल्यास काही महत्वाचे प्रश्न विचारात घ्यावे लागतील:
बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जिवाला धोका असू शकतो. अशा वेळी फक्त आईचे दूध दिल्याने त्याला अतिसार व इतर आजारांपासून संरक्षण मिळते. सहा महिन्यांनंतर मुलाला वरचे अन्नपाणी सुरू करा. स्तनपान दुसर्या वर्षापर्यंत चालू ठेवा.
सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाचे वजन वाढत नसेल तर त्यास अधिक वेळा स्तनपान द्या.
सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळाच्या आहारामध्ये, आईच्या दुधाच्या जोडीला शिजवलेला भाजीपाला, डाळी व फळे, थोडेफार तेल, अंडी, मासे, मांस, चिकन व दुधाच्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे ज्यायोगे त्यास सर्व प्रकारची जीवनसत्वे व खनिजे मिळतील. आहारामध्ये जेवढी विविधता असेल तेवढी चांगली.
वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये मूल कुपोषित राहिल्यास पुढील संपूर्ण आयुष्यभर त्याचा शारीरिक व मानसिक विकास धिम्या गतीने होतो.
उत्तम तब्येतीसाठी लहान मुलांना, आईच्या दुधाच्या जोडीला, विविध प्रकारच्या पोषक अन्नाची गरज असते, उदा. मांस, मासे, अंडी, फळे व भाज्या इ.
मोठ्या माणसाच्या तुलनेमध्ये मुलांचे पोट लहान असते. त्यामुळे ती एका जेवणामध्ये खूप खात नाहीत. मात्र त्यांची शारीरिक गरज अधिक आणि अखंड खेळण्याचा उत्साह भरपूर असल्यामुळे त्यांनी दिवसातून बर्याच वेळा खाणे आवश्यक आहे.
भाज्यांचा लगदा, बारीक केलेले मांस, अंडी, मासे ह्यांचा मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त वेळा समावेश करा. कमी प्रमाणात तेल ही वापरा. लाल पामतेल किंवा जीवनसत्वयुक्त इतर एखादे तेल उत्तम.
एकाच सामायिक ताटात वाढले तर, लहान मुलांना पुरेसे अन्न न मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुलास पुरेसे अन्न मिळावे ह्यासाठी त्याला वेगळे ताट द्या. मुलास गरजेनुसार खाणे मिळाल्याची पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी खात्री करावी.
लहान मुलांना खाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते तसेच ताट-भांडे हाताळण्याची योग्य पद्धत शिकवावी लागते. अपंग मुलास खाण्यापिण्यासाठी कदाचित मदत करावी लागेल.
बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत, आईच्या दुधामधून त्याला पुरेसे अ जीवनसत्व मिळते. ह्यासाठी आईच्या शरीरामध्ये तिच्या आहारातून किंवा गोळ्यांमधून पुरेसे अ जीवनसत्व पोहोचलेले असले पाहिजे. सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना इतर खाद्यपदार्थ किंवा पूरक अन्नाद्वारे अ जीवनसत्व मिळवण्याची गरज असते.
लिव्हर, अंडी, दुधाचे पदार्थ, फॅटी फिश लिव्हर तेल, पिकलेले आंबे व पोपया, गोड रताळी, हिरव्या पालेभाज्या, गाजर इ. मध्ये अ जीवनसत्व भरपूर आढळते.
मुलांना अ जीवनसत्व कमी पडत असल्यास त्यांना रातांधळेपणा येऊ शकतो. संध्याकाळी व रात्री कमी दिसणार्या मुलांना अ जीवनसत्वाची गरज असणार. अशा वेळी आरोग्यसेवकाकरवी त्यांना अ जीवनसत्वाच्या गोळ्या द्या.
काही देशांमध्ये, खाद्यतेलात किंवा अन्नपदार्थांमध्ये अ जीवनसत्व मिसळले जाते. बाजारात गोळ्या व द्रवाच्या रूपात ही अ जीवनसत्व मिळते. तर काही देशांमध्ये सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या सर्व मुलामुलींना वर्षातून दोनदा अ जीवनसत्वाच्या गोळ्या दिल्या जातात.
अतिसार व गोवर ह्या आजारांमध्ये मुलांच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण एकदम घसरते. अधिक वेळा स्तनपान करविल्याने अ जीवनसत्वाची भरपाई होऊ शकते. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फळे, भाज्या, अंडी, दुधाचे पदार्थ व लिव्हर दिल्याने ह्याची भरपाई होऊ शकते. 14 दिवसांपेक्षा जास्त काळ अतिसार झालेल्या किंवा गोवर झालेल्या मुलांना आरोग्यसेवकाकरवी अ जीवनसत्वाची गोळी द्या.
लोहाच्या कमतरतेमुळे होणार्या – ऍनिमिया - ह्या रोगामुळे शारीरिक व मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो. ह्याची लक्षणे म्हणजे जीभ, हाताचे तळवे व ओठांच्या आतील बाजूची त्वचा फिकट दिसणे. थकवा जाणवणे तसेच धाप लागणे. पोषण न मिळाल्याने होणारा जगभरातील प्रमुख आजार म्हणजे पंडुरोग होय.
लिव्हर, मांस, अंडी व डाळींमध्ये लोहतत्व असते. खास बनवलेले अन्न देखील लोहाचा पुरवठा करते. मलेरिया आणि हुकवर्म यांच्यामुळे देखील ऍनिमिया होऊ किंवा वाढू शकतो.
मुलामुलींची योग्य वाढ व विकास होण्यासाठी आयोडिनच्या अल्प प्रमाणाची आवश्यकता असते. त्यांना पुरेसे आयोडिन न मिळाल्यास किंवा गर्भवती असताना त्यांच्या आईलाच आयोडिन कमी पडले असल्यास मुलाची ऐकण्याची, बोलण्याची किंवा मानसिक क्षमता जन्मजात कमी असू शकते. शारीरिक किंवा मानसिक विकास उशीराने सुरू होऊ शकतो.
आहारात आयोडिन कमी असल्याचे प्रमुख लक्षण म्हणजे मानेवर सूज येऊन होणारा गॉयटर हा रोग. गर्भवतीस गॉयटर झालेला असल्यास गर्भपात, मृत बाळाचा जन्म किंवा मुलाच्या मेंदूमध्ये जन्मतःच व्यंग असणे इ. शक्यता वाढतात.
साध्या मिठाऐवजी आयोडिनयुक्त मीठ वापरल्याने गर्भवतींना व मुलांना आवश्यक तेवढे आयोडिन मिळते. आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध नसल्यास आरोग्यसेवकाकडून स्त्रिया व मुले यांनर देण्यासाठी आयोडिन देणारे पूरक पदार्थ घ्या.
मुले आजारी असल्यास, विशेषतः त्यांना अतिसार किंवा गोवर झाल्यास, त्यांची भूक कमी होते आणि त्यांनी खाल्लेल्या वापर कमी प्रभावी ठरतो. वर्षातून बरेचदा असे झाल्यास मुलाची वाढ मंदावते व थांबतेच.
आजारी मुलास खाण्यासाठी उद्युक्त करणे अतिशय गरजेचे आहे. हे काम कठीण असते कारण अशा मुलाची खाण्याची इच्छाच कमी झालेली असते. अशावेळी मुलाला आवडीचे पदार्थ दर काही वेळाने थोडेथोडे देत रहा. जादा स्तनपान करविल्यास विशेषत: आवश्यक आहे.
आजारी मुलास जास्तीचे पाणी प्यायला लावा. अतिसार झालेल्या मुलांना जलशुष्कता उर्फ डीहायड्रेशन झाल्यास त्यांची अवस्था वाईट होते. पुष्कळशा प्रमाणात पेये घेतल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.
आजारपण व मंदावलेली भूक काही दिवसां नंतरदेखील कायम राहिल्यास, त्याला आरोग्यसेवकाकडे न्या. मुलाचे घटलेले वजन पुन्हा वाढून, आजारी पडण्यापूर्वी होते त्याच्या आसपास आल्याशिवाय ते त्या आजारातून बाहेर आले आहे असे मानता येणार नाही.
स्त्रोत : UNICEF
अंतिम सुधारित : 5/5/2020
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक...
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या क...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
हेल्थ फोन निर्मित आईचे पहिले दाट दुध यावरील चित्रफ...