प्रथिनांसाठी सूचना
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्नघटक एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदा. नुसते तांदूळ, नुसती डाळ यापेक्षा डाळ, तांदूळ एकत्र शिजवल्याने हे मिश्रण जास्त परिपूर्ण होते. पारंपरिक आहारपध्दतीत अशी अनेक मिश्रणे आहेत भाकरी-वरण, इडली, डाळ-तांदळाची खिचडी, वरण, भात, इत्यादी अन्नपदार्थ पौष्टीक आहेत.
जीवनसत्त्वांसाठी सूचना
- अन्नपदार्थावर जेवढी जास्त प्रक्रिया करावी तेवढे त्या अन्नाचे पोषणमूल्य कमी होते. गव्हाच्या सांज्याऐवजी (भरडलेला गहू) मैद्याचे पदार्थ कमी पोषक असतात.
- एखादा पदार्थ जेवढा शिजवावा तेवढा तो पचायला हलका होतो; पण त्यातली जीवनसत्त्वे उष्णतेने कमी होत जातात. शक्यतो 15 मिनिटांपेक्षा जास्त शिजवणे योग्य नाही.
- धान्यांना आणि कडधान्यांना मोड आणणे हे आहारशास्त्राच्या दृष्टीने जास्त चांगले. मोडामुळे 'क' आणि 'इ' जीवनसत्त्वे तयार होतात.
- अन्न जेवढे शिळे होत जाते, तेवढया प्रमाणात त्यातली जीवनसत्त्वे कमी होत जातात. पण फ्रिजमध्ये (शीतकपाट) थंडाई असल्याने अन्नपदार्थामध्ये बदल न होता ते टिकून राहतात. यामुळे यातली जीवनसत्त्वेही टिकून राहतात.
- तांदूळ कमी सडलेले-शक्यतो हातसडीचे वापरावेत. उकडे तांदूळ अधिक चांग़ले. धान्यांचे कोंडे जीवनसत्त्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. भाताचे पाणी टाकू नये. त्यात जीवनसत्त्वे असतात.
- भाजी आधी चिरून धुतल्यास भाजीतली जीवनसत्त्वे व क्षार पाण्यातून निघून जातात. म्हणून भाजी आधी धुऊन मग चिरून शिजवावी.
- इडलीसारखे आधी आंबवलेले पदार्थ पचायला हलके असतात. त्यांत 'ब'जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते.
लोह क्षारांसाठी सूचना
- स्वयंपाकाच्या भांडयांमध्ये काही भांडी, उपकरणे ही लोखंडीच असावीत. उदा. तवा,उलथने, कढई, विळी, सुरी, पळी, डाव यांपासून लोहाचा पुरवठा होतो.
- आणखी सूचना
- पुफायुक्त तेले वापरल्याने आरोग्य चांगले राहते.
- बाजारात 'तयार' मिळणा-या अनेक पदार्थात भेसळ असते. सगळेच पदार्थ घरी करणे आपल्याला शक्य नसते. निदान विषारी भेसळीची शक्यता असलेले पदार्थ बाजारातून न आणणे हा एक पर्याय आहे. (याबाबत अधिक सूचना अन्न भेसळीच्या प्रकरणात आहेत.)
- भाज्या चिरायच्या आधी पाणी वापरून नीट धुऊन घेणे आवश्यक असते. कारण रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वाढत्या वापरामुळे भाज्यांवर रासायनिक पदार्थांचे अंश असतात. कीडनाशके मुळात विषारी असतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/22/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.