(जागतिक आयोडीन न्युनता विकार नियंत्रण दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त विशेष लेख...)
मानवी जीवनास अत्यंत आवश्यक असलेले आयोडीन हे नैसर्गिक मूलद्रव्य आहे. थायरॉक्सीन टी-4 आणि ट्राय-आयडोथॉयराईन टी-3 या थायरॉईड संप्रेरकांना लागणारा आवश्यक घटक यामध्ये आहे.
गरोदर असताना व स्तनपान देणाऱ्या मातेला आयोडीनची विशेष गरज असते. ज्या गरोदर महिलेमध्ये आयोडीनची कमतरता असते, ती महिला मानसिक, शारिरीक व्यंग असलेल्या बालकास जन्म देण्याची शक्यता असते. प्रौढ व्यक्तीस दररोज सरासरी 150 मायक्रोग्रॅम व गरोदर तसेच स्तनपान देणाऱ्या महिलेस दररोज सरासरी 200 मायक्रोग्रॅम एवढी आयोडीनची आवश्यकता असते.
आयोडीन कमतरतेमुळे अनेक सौम्य किंवा अति गंभीर आजार होऊ शकतात. सहजासहजी दिसणारा व ओळखता येणारा गलगंड हा आजार, हे आयोडीन न्यूनतेचे एक लक्षण होय. या आजारामध्ये थायरॉईड ग्रंथीची वाढ होते आणि यालाच गलगंड म्हटले जाते. स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व नवजात बालकाचे मृत्यू होतात. आयोडिन कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम, मेंदूची वाढ खुंटणे, शारिरीक वाढ खुंटणे, मुकबधीरपणा, बुध्यांकाची 10 ते 15 अंशानी घट होते.
राज्य शासन व काही राष्ट्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की जवळ जवळ सर्व राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशात आयोडीनची कमतरता आहे. जमिनीमध्ये पाण्यात क्षाराच्या स्वरुपात आयोडीन असते. अन्नाद्वारे, पाण्याद्वारे आपल्या शरीरासाठी आवश्यक आयोडीन प्राप्त होते. साध्या मीठामध्ये अतिशय अल्प प्रमाणात पोटॅशियम आयोडेट मिसळल्यानंतर आयोडीनयुक्त मीठ तयार होते. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 मधील नियम 2011 नुसार उत्पादक स्तरांवर 30 पीपीएम व वितरणस्तरावर 15 पीपीएम आयोडिनचे प्रमाण आवश्यक आहे. आयोडीनयुक्त मीठ हे साध्या मिठासारखेच दिसते. त्याची चव आणि वाससुद्धा साध्या मीठासारखाच असतो. आयोडीनयुक्त मीठाची तपासणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे केली जाते. प्रयोगशाळेकडे राष्ट्रीय आयोडीन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून, अंगणवाडी सेविकांकडून (बचत गटामार्फत) तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत मीठ नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.
मीठातील आयोडीनचे प्रमाण प्रयोगशाळेतील तपासणी व्यतीरिक्त MBIKITS चाचणी किटद्वारे कोठेही, कोणालाही करता येते. शिवाय अगदी आपल्या घरामध्ये शिजवलेल्या भातावर जर मीठ घातले आणि त्यावर थोडे लिंबू पिळले असता जांभळा रंग दिसल्यास मीठामध्ये योग्य प्रमाणात आयोडीन आहे असे समजावे. परंतु, जांभळी रंगछटा दिसली नाही तर मीठामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात नाही आणि असे मीठ आयोडीनयुक्त नाही असे समजावे.
मीठ नमुने तपासणी व्यतिरिक्त या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे लघवी नमुन्यातील आयोडीनचे प्रमाण शोधून काढणे. या अंतर्गत प्राधान्याने 6 ते 12 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थी, गरोदर माता व स्तनदा माता यांचे लघवी नमुने घेऊन त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण किती आहे हे तपासले जाते. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या तपासणीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये आयोडीन न्यूनतेची लक्षणे आढळतील अशा व्यक्तीच्या लघवी नमुन्याची तपासणी करतात. तपासलेल्या निष्कर्षानुसार संबंधित व्यक्तींसाठी योग्य ती वैद्यकीय उपाययोजना सुचविण्यात येते.
जगभरात 21 ऑक्टोबर हा दिवस जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य हेतू लोकजागृती हा आहे. आपली भावी पिढी शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आहारामध्ये आयोडीनयुक्त मीठाचाच वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिन्याभराच्या आयोडीन मीठाची किंमत दिवसभराच्या दोन वेळेच्या भाजीच्या किंमतीपेक्षाही कमी आहे. त्यामुळे गरिबातील गरीब कुटुंबालाही आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे सहज शक्य आहे. सर्व सामान्य जनतेने प्रत्येक घटकापर्यंत ही माहिती पोहचविली तरच खऱ्या अर्थाने 21 ऑक्टोबर हा जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन म्हणून साजरा केल्या सारखा होईल.
शब्दांकन : जयंत कर्पे,
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
(डॉ.सुहास बोकरे, उपसंचालक (आरोग्य सेवा), पुणे यांच्या सहकार्याने)
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/12/2020