অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवयवदानामुळे मिळाला पुनर्जन्म

अवयवदानामुळे मिळाला पुनर्जन्म

घरातील गृहिणी जर आजारी असेल तर संपूर्ण घर विस्कळीत होते. घरातील व्यवस्थापनासह परिवारातील सदस्यांचे देखील मनःस्वास्थ्य बिघडत जाते. अशाच एक गृहिणी अनुराधा जयराम या कित्येक वर्षांपासून मधुमेहाने आजारी होत्या. त्यातच दोन्ही किडनी फेल झाल्या. डायलिसीस सारखे उपचार वारंवार घ्यावे लागत होते. किडनी बदलणे हाच त्यावर उपाय होता, मात्र त्यासाठी अवयवदाता मिळणे आवश्यक होते. काही वर्षे वाट बघितल्यानंतर त्यांना एका अज्ञात दात्याने किडनी दान केले अणि त्यांना जणू जीवदान मिळाले. त्यांच्याशी केलेली ही बातचीत, त्यांच्याच शब्दात...

लग्नापूर्वी मी नोकरी करीत होते. आमच्या सुखी कुटुंबात दोन मुलींची भर पडली. त्यांच्या पालन पोषणात माझा वेळ अनंदात जात होता. मुली शिकून मोठ्या झाल्या, दोघींचेही लग्न झाले. एक सिंगापूरला तर एक अमेरिकेला गेली. आपल्या आयुष्याची घडी नीट बसली आहे असे वाटत होते. छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी सोडल्या तर आयुष्यात काही तक्रारी नव्हत्या. मधुमेह व्यवस्थापन करत असतांना किडनीवर कधी परिणाम होत गेला ते कळले नाही. औषधोपचार सुरू होते आणि मग हळू हळू किडनीचे काम करणे बंद झाले. डायलिसीस करायला जाणे अणि औषधे घेत राहणे यातच संपूर्ण वेळ निघून जात होता. परिवारातील सगळ्या मंडळीची साथ होती. हाच एक दिलासा शिल्लक राहिला होता.

जर एखादा अवयव दाता मिळाला आणि नवीन किडनी मिळाली तर आपल्याला डायलिसीसच्या या त्रासातून मुक्ती मिळू शकेल हे कळले आणि जगण्याची आशा बळावली. अवयव दान मिळावेत म्हणून नोंदणी केली. वेटींग लिस्ट वर नाव असल्याचे कळले. जेव्हा कधी असा अवयवदाता मिळेल तेव्हा कळविले जाणार होते. ट्रीटमेंट सुरु होतीच. नाव नोंदवूनही बराच काळ लोटला होता. आपल्याला कोणी दाता मिळेल किंवा नाही याच्या विचारतच दिवस काढणे सुरू होते. घरच्यांचा पाठिंबा असल्याने आणि परमेश्वरावर श्रद्धा असल्याने हिम्मत हरले नव्हते. वाट बघणे हेच माझ्या हाती होते.

...आणि एक दिवस अचानक फोन आला, तुमच्यासाठी एक अवयवदाता आहे, ताबडतोब रुग्णालयात या. कोणी अज्ञात व्यक्ती अपघाताने मृत्यूच्या दारापाशी येऊन थांबला होता. त्याचा मेंदू मृत झाल्याने त्याच्या परिवारातील सदस्यांनी त्याचे अवयव गरजू लोकांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या परिवारातील प्रिय व्यक्तीचा अचानक आलेला मृत्यू स्वीकारणे घरातील लोकांसाठी अत्यंत कठीण परीस्थिती असते, त्याहूनही अवघड काम म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय घेणे. जीवंतपणी जर स्वेच्छेने अवयवदानाचा संकल्प केलेला असेल तर ‘त्या’ व्यक्तीची शेवटची इच्छा म्हणून अवयव दान करण्याचा निर्णय घेणे नातेवईकांना तुलनेने सोपे जाते. काहीवेळा व्यक्तीच्या निधनानंतर काही तासातच दुसऱ्‍या व्यक्तीवर अवयव प्रत्यारोपण करणे आवश्यक असते, अशा वेळी तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञ चिकीत्सक, कुशल सहकारी आणि सर्व सुविधांनी युक्त अशा रुग्णालयात माझ्यावर ही अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. परमेश्वराच्या कृपेने माझी शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली. मला कराव्या लागणाऱ्‍या सततच्या डायलिसीसच्या दुष्ट चक्रातून माझी सुटका झाली. परिवाराच्या सहकार्याने मी आज माझे आयुष्य पूर्ववत जगायला सुरुवात केली. माझे डायलिसीस बंद झाले, माझ्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे. मला बोनस आयुष्य देणाऱ्‍या त्या अज्ञात अवयव दात्याची मी कायम ऋणी आहे. माझ्या रोजच्या प्रार्थनेत मी त्यांच्या कुटुंबियांसाठी परमेश्वराकडे आशिर्वाद मागत असते.

अवयव गरजूंची नोंद घेणे, अवयव दाता शोधणे, अवयव दानाबाबत जागृती करणे अणि त्यानंतर प्रत्येक गरजूला जीवनदान कसे मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी गेल्या वर्षीपासून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी लोकचळवळ उभी व्हावी यासाठी ‘महाअवयवदान’ ही मोहीम हाती घेतली आहे. या अवयव दानाच्या मोहीमेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे. यावर्षी 29 आगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यभरात अवयव दान जागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अभियानाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा. आपल्या मागे परिवारासाठी अनेक आशिर्वादाचे मृत्युपत्र लिहून जावे.

लेखिका: अर्चना शंभरकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate