खरंतर ती मूळची विदर्भातील. नोकरीनिमित्ताने अहमदनगर येथे आली. शहरात राहताना, वावरताना आसपासच्या परिसरातील अस्वच्छतेने ती अस्वस्थ झाली आणि ही अस्वस्थताच तिच्या कामाची प्रेरणा बनली. होय.. प्रा. आश्लेषा भांडारकर यांची ही कहाणी. प्लास्टीकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या आणि शहर स्वच्छतेसाठी झटणाऱ्या उच्चशिक्षित महिलेचा हा प्रवास...
जिल्ह्यात स्वच्छतादूत म्हणून काम करताना हे शहर आणि परिसर स्वच्छ व्हावा, हा वसाच त्यांनी घेतलाय. त्यासाठी स्वत:ची नोकरी सांभाळून आणि प्रसंगी पदरमोड करुन त्यांचे काम सुरु आहे. या प्रवासात अनेकांची साथ मिळावी, यासाठीची त्यांची धडपड सुरु आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश येतानाचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सुरु झालेली त्यांची धडपड ते जिल्ह्याची स्वच्छतादूत म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच रंजक आहे. अहमदनगर येथील एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पदव्युत्तर विभागात त्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सात-आठ वर्षापूर्वी त्या नगरला आल्या. सुरुवातीला एका भाड्याच्या खोलीमध्ये कुटुंबासह त्या राहू लागल्या. मात्र, आसपासच्या परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी यामुळे त्या अस्वस्थ व्हायच्या. काय करता येईल, याचा नेहमी विचार सुरु असायचा. भाड्याच्या खोलीत राहात असल्याने आपसूक काही मर्यादा यायच्या. तरीही त्यांच्या मनातील पर्यावरण संवर्धनाचे आणि सार्वजनिक स्वच्छतेचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातून त्यांनी परिसरातील स्वच्छतेवर काम करणे सुरु केले. परिसर स्वच्छतेसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरु केला. कचऱ्याचे दैनंदिन संकलन करण्यासाठी आग्रही राहिल्या. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. त्यामुळे परिसरातील महिलाही सुखावल्या.
काही दिवसांनी प्रा. आश्लेषा या स्वत:च्या घरात राहायला गेल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वच्छता जनजागरणाचा प्रवास सुरु झाला. परिसरात कोठेही कचऱ्याचे ढीग साठले की प्रशासनाकडे पाठपुरावा कर, स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा कर, असं सुरु झालं. स्थानिक परिसरातील महिलांना सोबत घेऊन काम सुरु झालं. पर्यावरणांचा सगळ्यात मोठा शत्रू प्लास्टिक आहे, यामुळे त्याच्या बंदीविषयी जनजागृती सुरु झाली. केवळ तोंडी प्रबोधन करुन उपयोग नाही, त्याला कृतीची जोड हवी, म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने कापडी पिशवी बनविली. बाजारला जाताना गृहिणी प्लास्टिकच्या पिशव्या मागतात, दुकानदारही प्लास्टिकच्या पिशव्याच देतो, हे जाणून त्यांनी सात कप्पे असलेली कापडी पिशवी बनविली. ज्यामध्ये भाज्या, फळे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवता येतील. हेतू हा की, गृहिणींचा त्रासही वाचेल तसेच प्लास्टिक वापरावरही मर्यादा येतील.
परिसर स्वच्छता आणि जनजागृतीसाठी त्यांनी काम सुरु केले. सुरुवातीला महिलांचे संघटन केले. प्रेरणा महिला मंडळाच्या माध्यमातून काम सुरु केले. प्रत्येक महिन्याला परिसरातील महिलांची सभा आणि परिसर स्वच्छतेविषयी चर्चा सुरु केली. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना बोलते केले. शहर सौंदर्यीकरणात महिलांचा सहभाग याविषयावर महिलांचे मत जाणून घेण्यासाठी एक हजार महिलांचे सर्वेक्षण करुन त्यांच्याकडून मते जाणून घेतली.
मुलांना विशेषत: माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं. त्यासाठीचा कृती कार्यक्रम तयार केला. सध्या माध्यमिक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्वच्छता रक्षक ही संकल्पना त्या राबवित आहेत. स्वेच्छेने यामध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन विद्यार्थी रहात असलेल्या परिसरात जागृती करण्यात येत आहे. नवरात्राचे औचित्य साधून दरवर्षी महिलांना स्वच्छतेचा जागर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि प्रबोधनपर पत्रकांच्या वाटपातून त्यांचे काम सुरु आहे. प्लास्टीक वापरु नका, वापरु देऊ नका, असा कृतिशील संदेश देत त्यांचे काम सुरु आहे. त्यांच्या घरी ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविला. त्यामुळे घरच्या कचऱ्यापासून खत निर्मिती करुन त्यांनी बाग फुलवली आहे. परिसर स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी विविध सणावारांचे औचित्य साधून पत्रक आणि गृहभेटीद्वारे संबंधितांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम त्या करतात.
परिसर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कचरा वेचक महिलांसाठी स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मार्गदर्शन करण्याचे कामही प्रा. आश्लेषा करतात. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याची स्वच्छतादूत म्हणून त्या काम करतात. स्वच्छता व आरोग्य या विषयावर त्यांनी लघुपटाची निर्मिती केलीय. केवळ परिसर स्वच्छताच नाही तर वृक्षलागवड, हागणदारीमुक्ती, बेटी बचाव-बेटी पढाओ, महिला सबलीकरण अशा शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी कृतीशील कार्यक्रमांद्वारे त्या प्रयत्नशील आहेत.
शासकीय योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होत असतात. अशावेळी सुज्ञ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद त्या योजनेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असतो. प्रा. आश्लेषा भांडारकर यांच्यासारख्या महिलांचा हा पुढाकार निश्चितच त्यासाठी आवश्यक आहे.
लेखक: दीपक चव्हाण
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024