संपूर्ण महाराष्ट्रात 2018 च्या मार्च एंडला उघड्यावरील हागणदारीचा एंड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला होता. त्यानुसार राज्य शासनाने रोड मॅपही तयार केला. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदांनी प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये बुलडाणा जिल्हा परिषदही मागे राहिली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, नागरिकांचे मतपरिवर्तन करीत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने ग्रामीण भागात 3 लक्ष 51 हजार 928 वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती वेगाने झाली आणि निर्धारीत कालावधीत बुलडाणा जिल्हा हागणदारीमुक्त झाला. अशी अधिकृत घोषणाही जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली.
वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीसाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीसह स्थानिक निधीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. या कामी सदर निधीचा उपयोग करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराजन यांनी दिल्या व बांधकामाला वेग मिळाला. या संपूर्ण कामामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने प्रभावी काम केले. अधिकारी व कर्मचारी यांचे परिश्रम फळाला आले असून 31 मार्च अखेर जिल्हा हागणदारीमुक्त घोषीत झाल्याचे जाहीर करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुकानिहाय नियोजन करून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील अधिकारी कामाला लागले होते. यासाठी 1 नोव्हेंबर 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान मिशन 90 डेज हे अभियान राबविण्यात आले. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला वेग आला. या संपूर्ण अभियानात शासनाच्यावतीने देण्यात आलेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी कामी आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यंत्रणेच्या सहकार्याने हागणदारीमुक्त मोहिम प्रभावीपणे राबविली.
मेहकर तालुक्यात एकाच दिवशी सर्व यंत्रणा कार्यान्वीत करून हजारो शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते. तसेच वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी शौचालय बांधकामाचे कमी ‘कवरेज’ असलेल्या गावांमध्ये कलापथक, चित्ररथ यांच्या माध्यमातून समाज जागृती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 51 हजार 928 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यामध्ये तालुकानिहाय झालेले बांधकाम पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा 38302, चिखली 40578, देऊळगाव राजा 14427, सिं.राजा 28065, लोणार 23577, मेहकर 40869, खामगांव 38265, मोताळा 25639, मलकापूर 20250, जळगांव जामोद 20863, संग्रामपूर 21383, नांदुरा 23121 व शेगाव तालुक्यात 16605. अशाप्रकारे या मार्च एंडला जिल्ह्यातील उघड्यावरील हागणदारीचा एंड झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, हे मात्र नक्की.
- निलेश तायडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/18/2020
बुलढाणा जिल्हा पर्यटकांना अध्यात्मासह हिरव्यागर्द ...
सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करीत बुलडाणा जिल्...