सात जिल्ह्यांनी केले 100 टक्के रक्त संकलन
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 27 हजार रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 16 लाख रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून महाराष्ट्राने संपादन केलेले हे यश देशात अव्वल ठरले आहे. राज्यात 97.54 टक्के एवढ्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान झाले आहे. 35 जिल्ह्यांमध्ये 332 रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्त संकलन आणि त्याची साठवणूक केली जाते. त्यापैकी गडचिरोली, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यांनी 100 टक्के रक्त संकलन करून महत्वाचे योगदान दिले आहे.
राज्यात 332 परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या एक टक्के रक्त संकलन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 8 लाख असून लोकसंख्येच्या प्रमाणात 12 लाख रक्त पिशव्यांचे संकलन आवश्यक आहे. मात्र, गेल्या वर्षात 16 लाख रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेले हे रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरले जाते.
देशभरातील 36 राज्यांची एकूण रक्त संकलनाची टक्केवारी 71 टक्के आहे. त्यातील सर्वाधिक टक्केवारी महाराष्ट्राची (97 टक्के) असून त्या खालोखाल सिक्कीम (96 टक्के), त्रिपुरा (95 टक्के), तामिळनाडू (93 टक्के), चंदीगड (91 टक्के) अशी आकडेवारी आहे.
राज्यात सर्वाधिक रक्तपेढ्या मुंबईत (60) असून त्या पाठोपाठ पुणे (33), ठाणे (23), सांगली व सोलापूर (प्रत्येकी 17), नाशिक (16), अहमदनगर व नागपूर (प्रत्येकी 14), कोल्हापूर (13) आणि जळगाव (10) अशी संख्या आहे.
एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था, महाविद्यालयातील एनएसएस प्रतिनिधी, कार्पोरेट हाऊस यांचा समावेश असलेली स्वैच्छिक रक्तदान समिती स्थापन केली असून त्यांच्या मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रक्त तुटवड्यावर मात केली जाते.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जास्तीत जास्त लोकांनी स्वैच्छिक रक्तदानाविषयी जागरुक होण्यासाठी ठिकठिकाणी जिल्हा पातळीवर रक्तदान शिबिरे, प्रभातफेरी, विविध स्पर्धा, रक्तदात्यांचे सत्कार आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ‘Be there for someone else’ या संकल्पनेनुसार आणि ‘Give blood, share life’ या घोषवाक्याचा वापर करण्यात आला.
महाराष्ट्रातील रक्तदानाची ही परंपरा कायम राखावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या निमित्ताने केले आहे.
लेखक- अजय जाधव
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...
खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या...
गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासा...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...