नाशिक जिल्ह्यात चांदवडपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजदेरवाडी गावात पावसाळ्यात जाणे हा आनंददायी अनुभव आहे. सातपुड्याच्या राजदेर, कोळदेर आणि इंद्राई किल्ल्यांचे सौंदर्य, डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग हे सर्व अद्भुत चित्र इथे अनुभवायला मिळते. हे सौंदर्य जपताना गावाला स्वच्छ, सुंदर पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नातून सुरू केला असून त्याला यशही येत आहे.
साधारण चौदाशे लोकसंख्येच्या या गावात 270 घरे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाला पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत करण्यासाठी गाव हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला. घराघरात शौचालय उभारण्यात आले. उर्वरीत नागरिकांसाठी सार्वजनिक शौचलयाची सुविधा करण्यात आली आणि गतवर्षी गाव हागणदारीमुक्त झाले.
केवळ शौचालयापुरती स्वच्छता मर्यादित न ठेवता सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. कचऱ्याचे रुपांतर खतात करण्यासाठी एकूण 19 ठिकाणी घनकचरा नडेप खड्डे तयार करण्यात आले आहेत. गावात गायी-म्हशींची संख्या अधिक असल्याने चांगले शेणखत तयार करण्यासाठी या खड्ड्यांचा उपयोग होतो.
सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी नळकोंडाळ्याच्या ठिकाणी शोषखड्डे बांधण्यात आले असल्याने सांडपाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. काही घरांभोवती सांडपाण्याच्या माध्यमातून परसबागा फुलविण्यात आल्या आहेत. गावात प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तत्कालिन विस्तार अधिकारी भूपेंद्र बेडसे, विस्तार अधिकारी डी.जी.सपकाळे आणि ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी ग्रामस्थांसोबत प्रामाणिक प्रयत्न केल्याने गावाच्या विकासाला गती मिळाली आहे.
गाव स्वच्छ करण्याबरोबरच ते विकसीत होण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत इमारतीतील विश्रामकक्ष इथल्या सुंदर निर्मितीचे जणू प्रतिक आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंगच्या सुविधेसोबतच शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. ग्रामपंचायतीतील माती परीक्षण युनिट, वायफाय सुविधा, एसएमएस सुविधेद्वारे ग्रामस्थांना दिली जाणारी माहिती, गावातील सौर दिवे गावाच्या विकासाची साक्ष देतात.
गावाने सामुहिक कामगिरीच्या बळावर निर्मलग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी पुरस्कार मिळविले आहेत. नुकताच तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कारदेखील ग्रामपंचायतीने मिळविला. आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत करण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतीच गावाची निवड वनपर्यटन स्थळ म्हणूनही करण्यात आली आहे. लोकसहभाग आणि ग्रामस्थांचे एकत्रित प्रयत्नांमुळे त्यादिशेने गावाची वेगाने वाटचाल होत आहे.
मनोज शिंदे, उपसरपंच-गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे प्रयत्न करतात. राजदेर आणि इंद्राई किल्ला आणि सभोवतालचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. दरवर्षी साधारण पाच हजार पर्यटक इथे येतात. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वच्छता हे त्यादृष्टीने पहिले पाऊल आहे.
लेखक: डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020