महाराष्ट्र राज्यात औषधी वनस्पतींच्या लागवडीकरीता अनुकूल वातावरण आहे. वैविध्यपूर्ण हवामान, मानवी आरोग्यासाठी औषधी वनस्पतींचे महत्व, राज्यातील आयुर्वेदिक उद्योग आणि शहरातून औषधी वनस्पतींची वाढती मागणी, शेतकऱ्यांमध्ये पीक बदलाबाबतची जागृती, वाजवी, उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची नगदी पिके, औषधी वनस्पती क्षेत्रात स्वयंरोजगार निर्मिती इत्यादी बाबींच्या अनुषंगाने औषधी वनस्पती क्षेत्र विकासास भरपूर चालना मिळू शकते. कोकणातले हवामान आणि उपलब्ध जमीन लक्षात घेवून यामुळे कोकणात समृद्धी येऊ शकते.
केंद्र शासनाच्या आयुष विभागामार्फत बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत गतवर्षीपासून राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी या वैद्यकीय पद्धतींना प्रोत्साहन देणे त्याबाबतची शिक्षण प्रणाली मजबूत करणे, गुणवत्ता नियंत्रण तसेच उपरोक्त वैद्यकीय पद्धतीसाठी सातत्यपूर्ण वनस्पतीजन्य, कच्च्या मालाचा पुरवठा करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. एकत्रीकरणाच्या धोरणानुसार राष्ट्रीय वनस्पती अभियान ही योजना आता राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत समाविष्ट आहे. औषधी वनस्पती क्षेत्र विकासास सर्वच स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजना, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या सनियंत्रणाखाली सन 2015-16 पासून राज्यात राबविण्यात येत आहे.
अभियानाचे घटक आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी अंतर्गत सेवा, आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी शैक्षणिक संस्था, आयुष औषधी पद्धती अंतर्गत औषधीचे गुणवत्ता नियंत्रण यांचा समावेश होता. आयुष अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपरोक्त चार घटकांपैकी औषधी वनस्पती हा घटक केंद्र व राज्याच्या आर्थिक योगदान (60:40) तत्त्वावर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. त्याचे उपघटक औषधी वनस्पती रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, काढणीपश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन औषधी वनस्पती कार्यक्रमांतर्गत समाविष्ट विविध घटकांच्या खर्चाचे मापदंड व देय अर्थसहाय्याची माहिती/सविस्तर विवरण व केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना www.indianmedicine.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती घटक कार्यक्रमांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषध वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन इत्यादी घटक योजनांसाठी अर्थसहाय्य देय आहे. राष्ट्रीय आयुष अभियान या योजनेकरीता सन 2015-16 च्या वार्षिक कृति आराखड्यास राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाली आहे. त्यामधील 40 टक्के रक्कम राज्य शासनाकडून दि.2 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात 20 हेक्टरवर 2400 लक्ष रुपये उत्पन्नाचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
सन 2017-18 राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती घटक सन 2017-18 करिता राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांनी राज्याच्या रु.355.77 लाख रक्कमेचा वार्षिक कृति आराखडा राज्य आयुष सोसायटी मुंबई यांच्यामार्फत सादर करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार औषधी वनस्पती लागवडीकरीता जिल्हास्तरावरील मागणीनुसार सन 2017-18 करीता वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषधी वनस्पती लागवड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. यातून रोजगार उपलब्ध होतोय परंतु आवश्यक असणारी औषधे देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. व्यावसायिकस्तरावर उत्पादन करणाऱ्यांसाठी रोपवाटीकाच्या माध्यमातून कच्चा मालही उपलब्ध होईल.
लेखिका: शैलजा पाटील
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/17/2020