অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रक्तदानामुळे महिलेस जीवनदान

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रक्तदानामुळे महिलेस जीवनदान

एखादा अपघात झाल्यास जखमीं झालेल्या व्यक्तीची मदत करण्यासाठी किती जण पुढे येतात? अनेक बघणारे तर आपण भानगडीत पडूच नये असा विचार करून पुढेच निघून जातात. परंतू अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस मदत केल्यास त्यास वेळेवर उपचार मिळाले तर, त्याचा जीव वाचू शकतो. अशा होणाऱ्या असंख्य घटनेच्या वेळी डॉक्टर समय सुचकतेचे भान ठेऊन माणुसकी दाखवतात, ती प्रत्येकाने का दाखवू नये?

शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळत नाहीत असा गैरसमज शक्यतो नागरिकामध्ये आहे. तसेच डॉक्टर योग्य उपचार करत नाहीत म्हणून डॉक्टरांना मारहाणीच्या घटनाही मागील काही काळात घडलेल्या आहेत. परंतू जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील डॉक्टरांनी अपघातग्रस्त महिला रुग्णासोबत कोणतेही नाते किंवा ओळख ही नसताना समय सुचकता दाखवत सदर महिलेचे पालकत्व स्वीकारुन योग्य वेळी उपचार केले. तसेच शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त उपलब्ध होत नसल्याचे पाहून डॉक्टरानेच रक्तदान करुन महिलेस जीवनदान देत माणुसकीचे दर्शन घडविले.

पुर्णा तालूक्यातील पोखर्णीजवळ मजूर काम करणारे अंबुबाई व नवसाजी खंदारे हे पती-पत्नी शुक्रवार 26 मे रोजी रात्री 12 वाजेच्या रेल्वेने जवळच्या नातेवाईकाच्या विवाहासाठी पूर्णा रेल्वेस्थानकावरून येथून निघाले होते. परंतू जुनूना या गावी येथे रेल्वे पोहचली असता, नांदूरा रेल्वेस्थानक समजून अंबुबाई यांनी जुनूना रेल्वे स्थानकावरच उतरण्याचा प्रयत्न केला. उतरण्याच्या प्रयत्नात अंबुबाई यांचा उजवा पाय रेल्वेच्या पायऱ्यामध्ये अडकल्याने त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या आणि त्यांचा पायाला गंभीर इजा झाली. प्लॅटफार्मवर पडताच अंबुबार्इंनी मदतसाठी आवाज दिला असता रेल्वे स्थानकावरील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी तात्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधून दूरध्वनीद्वारे रुग्णवाहिका बोलावली. मध्यरात्रीची वेळ असल्याने अंबूबाई या रेल्वेतून पडल्याचे सुमारे अर्धा ते एक तास त्यांच्या पतीला कळलेच नाही.

रुग्णवाहिका देखील काही वेळेताच घटनास्थळी पोहचून जखमी झालेल्या अंबुबाईना घेऊन हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिशेने निघाली. रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. रवीकुमार करवंदे यांनी रुग्णवाहिकेतच अंबुबाईवर उपचार सुरू केले. सकाळी सुमारे 3 वाजता त्यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधिकारी डॉ.अग्रवाल व आपत्कालीन सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी महिलेवर प्राथमिक उपचार केले. सकाळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंबुबाईची तपासणी केली असता त्यांचा पाय पूर्णपणे निकामी झाल्याने शस्त्रक्रिया करून तो कापण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतू अशावेळी जवळच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतू त्यावेळी पाय कापण्याचा निर्णय घेण्यासाठी अंबुबाई यांच्यासोबत एकही नातेवाईक उपस्थित नव्हता. लवकर शस्त्रक्रिया केली नाहीतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे क्षणांचाही विचार न करता रुग्णालयात उपस्थित डॉ.आर.आर. तडवी आणि डॉ. इनायतुल्ला खान यांनी शस्त्रक्रियेसाठीच्या परवानगी अर्जावर अंबूबाई यांची जबाबदारी घेत अर्जावर स्वाक्षरी केल्या. आणि शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अजय शिराडकर, डॉ. भगवान पुंडगे आणि भूलतज्ज्ञ डॉ. एन. आर. पवार यांनी अंबुबाई यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून त्यांचा निकामी झालेला उजवा पाय काढून टाकला.

अंबुबाई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांना रक्ताची नितांत गरज होती. अंबुबाईचा रक्तगट ‘बी पॉझिटीव्ह’ परंतू सदर रक्तगटाचे रक्त हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी त्याक्षणी उपलब्ध नव्हते. या रक्तगटाचे रक्त मिळविण्यासाठी डॉक्टरांनी अनेकांना संपर्क केला. तसेच सोशल माध्यमाद्वारे ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे, असे आवाहनही केले. परंतू बराच वेळ प्रतिक्षा करूनही सदर रक्तगटाचे रक्त मिळत नसल्याचे पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आपत्कालीन सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी त्यांचा रक्तगट ‘बी पॉझिटीव्ह’ असल्याने त्यांनी स्वत: अंबुबाईना रक्तदान करण्याचा निर्णय घेत जीवदान दिले.

शस्त्रक्रियेच्या वेळी आणि झाल्यानंतर सुमारे दोन दिवस अंबुबाई यांच्यासोबत जवळचा कोणताही नातेवाईक उपस्थित नव्हता. अशा वेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांची काळजी घेत शुश्रषा केली. डॉ. खान यांनी त्यांच्या नातेवाईकांची जबाबदारी स्वीकारलीच परंतू शस्त्रक्रियेवेळी त्यांना रक्त उपलब्ध होत नसल्याने रक्तदानही केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंबुबाईचे पालकत्व स्वीकारुन स्वत:च्या नातेवाईकासमान त्यांची काळजी घेत त्यांच्यावर उपचार केले. यानिमित्त हिंगोलीतील डॉक्टरांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

लेखक: अरूण सूर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी,
हिंगोली

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate