मोताळा तालुक्यातील चिंचपूर छोटेसे गाव.. या गावामध्ये अन्य गावांसारखे घरोघरी शौचालय बांधकामाचे वारे वाहत आहेत. मात्र चिंचपूर येथे शौचालय बांधकामासाठी वारे नाहीत, तर हट्ट धरण्यात येत आहे. हा हट्ट आहे नऊ वर्षीय नूतन धोरणचा. कु नूतन विष्णु धोरण या छोट्या 9 वर्षाच्या मुलीने आई वडीलांकडे यांच्याकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरुन शौचालय बांधकाम करुन घेतले आहे.
परिस्थिती हलाखीची असतानादेखील तिच्या आईने मुलीच्या हट्टासाठी सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र विकून शौचालय बांधकामाकरीता निधी उभारला. शाळेत दिलेले स्वछतेचे धडे नूतन विसरली नाही. शाळेत मिळालेले स्वच्छतेचे बाळकडून तीने थेट घरापर्यंत आणले. या शिकवणीमुळे व संस्कारामुळे नूतनने आपल्या घरी शौचालय बांधायलाच लावले. चिंचपूरची ही छोटीशी नूतन बुलडाणा जिल्ह्यासाठी स्वच्छतेची दूत ठरली. तिला जिल्ह्याचा ''स्वच्छता-दूत'' म्हणून स्वत: स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घोषीत केले.
नूतन गावागावात कार्यक्रमांमधून स्वच्छतेसाठी शौचालय बांधकामाचा हट्ट कसा धरला आणि आपणही धरायला पाहिजे, या विषयी तिच्या बोबड्या शब्दांमधून प्रबोधन करते.
शाळेत शौचालयाचे उपयोग व फायदे शिकविल्यामुळे प्रेरीत होवून नूतन धोरण हिने आई-वडील यांच्याकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरला होता. अत्यंत गरीबीच्या परीस्थीतीमध्ये शौचालय बांधण्यासाठी पैसे नसल्याने नूचनच्या आईने मंगळसुत्र विकुन आपल्या घरी शौचालय उभारले होते. याची माहिती मिळताच राज्यमंत्री खोत यांनी या कुटुंबाचा सत्कार केला होता. तर नूतनला सोबत घेऊन चिखली तालुक्यातील हातणी या गावामध्ये शौचालय पाहणी केली होती. तसेच तिच्याहस्ते शौचालयाचे भुमीपूजन करण्यात येऊन श्रमदान करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नूतनचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहन केले व तिला जिल्ह्याची स्वच्छता दूत म्हणून घोषीत केले.
नूतनचा 4 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा परीषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राज्य शासन हगणदारीमुक्तीसाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शासनाच्या प्रयत्नांना या छोट्याशा चिमुकलीने उत्तम प्रतिसाद दिला आहे. स्वच्छतेचे धडे देणारी शिक्षीकासुद्धा महत्वाची आहे. या शिक्षिकेने दिलेल्या स्वच्छतेच्या संस्कारांमुळे नूतनला वैचारीक बळ मिळाले आणि नुतनने शौचालय बांधकामासाठी हट्ट धरला. नूतन धोरण आज अन्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरली आहे. ती केवळ शौचालय बांधा म्हणून आवाहन करत नाही, तर उघड्यावरील शौचामुळे होणाऱ्या आजारांचे विश्लेषणही करते. त्यामुळे तिच्या बोबड्या बोलण्यांमधून उघड्यावरील शौचमुक्तीचा संदेश मनावर बिंबतो.
बुलडाणा जिल्ह्यात हगणदारीमुक्तीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी जिल्हा डिसेंबर 2017 पर्यंत संपूर्ण हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाने कुटूंब भेटीच्या कार्यक्रमाचीही प्रभावीपणे अंमलबजावणी केली. प्रशासन, शासन त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र नूतन धोरणचा हट्ट हा सर्वांना काही सांगून जातो. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेसाठी आग्रही असले पाहीजे. छोट्याशा नुतनने या वयात कपडे, गोड-धोड पदार्थ, खेळणे आदींचा हट्ट धरला पाहिजे होता. परंतु तीचा स्वच्छतेचा हट्ट निश्चितच वेगळेपण अधोरेखीत करतो.
लेखक: निलेश तायडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020