पालघर जिल्हा सागरी, डोंगरी व नागरी भागाची पार्श्वभूमी लाभलेला जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा ८५ टक्के आदिवासी जिल्हा आहे. पालघर, वसई व डहाणू या तालुक्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. तर जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा हे तालुके डोंगरी भागात आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरी भाग आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे व प्रत्येक कुटुंबांनी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणे यांची जनजागृती करुन पालघर जिल्ह्यातील जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पालघर जिल्ह्यातील ४७३ पैकी ४६५ ग्रामपंचायती १ ऑगस्ट २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त झाले आहेत.
१ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. पालघर जिल्ह्यात सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटूंबांची संख्या १,०४,८५६ इतकी होती. सन २०१६-२०१७ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय पाणी व स्वच्छता विभागाने आव्हान म्हणून स्विकारला. यासाठी विविध उपाययोजना करण्याचे नियोजन केले. जिल्हा परिषद पालघरमधील सर्व विभागांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत शौचालय बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी सामजिक संस्था, शासनाचे विविध विभाग यांचे सहकार्य घेण्यासाठी WISH-1 कार्यक्रम घेऊन सुरवात केली. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव याठिकाणी स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात कुटूंबस्तर संवाद अभियान या कार्यक्रमाअंतर्गत डहाणू तालुक्यातील आशागड येथे “ एक लक्ष गृहभेटी, पालघर जिल्ह्यासाठी” ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये जिल्हाभर शौचालय नसणाऱ्या एक लाख कुटूंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून दिले व शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्यात आले. २ ऑक्टोबर २०१६ रोजी शिरगाव बीच महास्वच्छता अभियान राबविले. यावेळी लोकप्रतिनिधी, सर्व विभाग प्रमुख, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील तज्ञ/सल्लागार व तालुक्यातील BRC/CRC यांनी सहभाग घेतला. २ ऑक्टोबर २०१६ रोजी पालघर जिल्ह्यात संत गाडगेबाबा स्वच्छता दिंडीचे मालजीपाडा, नागले, पोमण, कळंब येथे आयोजन केले होते. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जागतिक हातधुवा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत डहाणू तालुक्यातील कासा येथे गवंडी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील गवंड्यांना दोन शौषखड्डे शौचालय बांधण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. डिसेंबर २०१६ मध्ये डहाणू तालुक्यात महारेखांकन अभियान राबविण्यात आले. यामध्ये ६१ ग्रामपंचायतीमध्ये महारेखांकन करण्यात आले. मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामीण शौचालय व पिण्याच्या टाकीचे बांधकाम खारघर येथील एन. एस. एस. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून केले व पालघर तालुक्यातील करवाळे ग्रामपंचायत येथे के. सी. कॉलेज मुंबई येथील एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केले. ९ जानेवारी २०१७ रोजी तालुका व जिल्हास्तरीय शाळा व महाविद्यालयामध्ये स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील तज्ञ/सल्लागार यांनी व युनिसेफ यांच्या मदतीने जव्हार तालुक्यात २९ दिवस विशेष अभियान राबवून २० फेब्रुवारी २०१७ रोजी जव्हार तालुका हागणदारीमुक्त करण्यात आला. जव्हार तालुक्यातील सुशिला खुरकूटे यांनी शौचालयाचे महत्व जाणून स्वत: आपल्या घराच्या बाजूला दोन शोषखड्डे खोदले व शौचालय बांधले. याची दखल घेऊन ८ मार्च २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी गांधीनगर (गुजरात) येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुशिला खुरकूटे यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील एकमेव पालघर जिल्ह्यातील महिलेचा गौरव केला. पालघर जिल्ह्यात शौचालय बांधकाम जलदगतीने होण्यासाठी श्रीमती खुरकूटे यांची स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आली.
विक्रमगड तालुका मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी विशेष अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या व विविध सामाजिक संघटनाची मदत घेऊन ११ फेब्रुवारी २०१७ रोजी WISH 2 कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद पालघर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या सयुक्त विद्यमाने पालघर सरस कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने सर्व तालुक्यातील गट समन्वयक / समुह समन्वयक, ग्रामसेवक यांना मोबाईल अॅपचे GEO Taging, GEO fancing प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल २०१७ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता स्पर्धेचे निकष पूर्ण करून जास्तीस जास्त गुण मिळालेल्या वेवजी, पास्थळ, उज्जैनी या ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. १२ मे २०१७ रोजी माहिम ग्रामपंचायत अंतर्गत वडराई येथे उघड्यावर शौचाला जाणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर घंटानाद करण्यात आला. २० जून २०१७ रोजी युनिसेफ सॅक्रीट, ब्लू-स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती पालघर येथे हातधुवा कार्यशाळा घेण्यात आली. दि. २१ जून २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी स्वच्छता मतदान घेण्यात आले. स्वच्छता मतदान अभियानात १,५४,७१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले मत नोंदविले.
अशाप्रकारे पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी जव्हार, मोखाडा, तलासरी व वाडा हे चार तालुके १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहेत. वसई ९९ टक्के, पालघर ९३ टक्के, डहाणू ८४ टक्के, विक्रमगड ८१ टक्के याप्रमाणे तालुके हागणदारीमुक्त झालेले आहेत. शौचालय उभारणीच्या कामामध्ये विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात युनिसेफच्या मदतीने व इतर भागात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाने हे काम सुरु आहे. पालघर जिल्ह्यातील ४७३ पैकी ४६५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून लवकरच पालघर जिल्हा हागणदारीमुक्त घोषीत करण्यात येणार आहे.
लेखक: दत्तात्रय कोकरे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024