होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे. ऍलोपथीमध्ये प्रभावी, निर्धोक अशी औषधे 19 व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही फारशी नव्हती. विसाव्या शतकात, विशेषतः गेल्या पन्नास-साठ वर्षांत मात्र या शास्त्रात अत्यंत वेगाने प्रगती झाली. गुणकारी व तुलनेने निर्धोक अशी शेकडो औषधे आता बहुसंख्य रोगांसाठी उपलब्ध आहेत. याचे श्रेय एकतर सर्वसाधारण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आहे. कारण निरनिराळया विज्ञान-क्षेत्रांतील प्रगतीच्या आधारेच आधुनिक औषधशास्त्र उभे राहिले आहे. त्याचबरोबर आधुनिक औषधशास्त्राची एक पध्दत, शिस्त तयार झाली आहे. जगभर ती शिस्त मानली जाऊन त्या आधारे संशोधन होते. त्याचा फायदा सर्व मानवजातीला मिळतो हेही महत्त्वाचे आहे. नवीन औषध शोधताना ते प्रभावी व तुलनेने निर्धोक आहे याची खात्री एका समान पध्दतीच्या आधारे करतात. औषध उत्पादक कंपन्यांनीही संशोधन करून अनेक नवी औषधे तयार केली आहेत.
वनस्पती, प्राणी, जीवजंतू, क्षार, खनिज यांवर गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया करून आधुनिक औषधे तयार केली जातात.
या सर्व चाचण्यांना उतरलेली सुमारे हजारभर पुरेशी गुणकारी व पुरेशी निर्धोक औषधे शास्त्रज्ञांना आतापर्यंत सापडली आहेत. पैकी जागतिक आरोग्यसंघटनेने सुमारे तीनशे औषधांना आवश्यक औषधे (बहुसंख्य आजार बरे करण्यासाठी आवश्यक) म्हटले आहे. ही औषधे पुरेशा प्रमाणात, सर्वत्र व नेहमी उपलब्ध असलीच पाहिजेत अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.
नवनवीन औषधांचा शोध कायम चालूच राहणार आहे. पण प्रत्येक औषध शास्त्रीय कसोटीला तावून सुलाखून उतरले पाहिजे. नाहीतर एखादे औषध बाजारात येऊन लाखो लोकांनी वापरल्यावर लक्षात आले, की ते खरोखर गुणकारी नाही (कारण अनेकदा आजार आपोआप शमतात) किंवा त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत तर ते फार महागात पडते. पूर्वी असे अनेकदा झाले आहे. त्यामुळे नवीन औषधांबाबतचे निर्णय आता अधिक काटेकोर कसोटीवर घेण्याची प्रथा आहे.
नवीन, अधिक परिणामकारक, स्वस्त, अधिक निर्धोक औषधे उपलब्ध होत आहेत. या तुलनेत दृष्टीने डावी जुनी औषधे कालबाह्य समजून त्यांचे उत्पादनच बंद व्हायला हवे असे आधुनिक औषधशास्त्र सांगते. पण भारतात मात्र अनेक कालबाह्य औषधे सर्रास खपवली जातात.
आधुनिक औषधशास्त्र हे अत्यंत प्रगत, गतिशील शास्त्र आहे. औषधशास्त्र हे वैद्यकशास्त्राचे एक अत्यंत महत्त्वाचे उपांग आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 1/28/2020
पारंपरिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ...
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून...
गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक...
सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकवण्याच्या दृष्टीने स...