অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औषधे शरीरात कशी पोचतात?


औषधोपचारातले एक तत्त्व म्हणजे ज्या अवयवांना,भागांना किंवा पेशींना आजार, बाधा झाली असेल तिथपर्यंत औषध पोचवणे.

जेव्हा आजार कातडीवर किंवा कान, डोळा, तोंड,जीभ, नाक वगैरे वरवरच्या भागांत असतो तेव्हा औषधे त्या त्या भागाला लावता येतात. मात्र हृदय, यकृत,मेंदू वगैरे सर्व आतले अवयव तसेच ते कातडीखालचा भाग, चरबी, स्नायू यांना अर्थातच सरळ औषध लावता येत नाही. या भागांना 'आतून' च औषध पोचवले पाहिजे. आतून औषध पोचवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे रक्तप्रवाह. रक्तप्रवाह आपल्या शरीरात सर्वत्र असतो. त्यामुळे आतून दिलेले औषध सगळीकडे नीट पोहोचते

- 'बाहेरून' लावण्याची औषधे म्हणजे निरनिराळी मलमे, पावडरी, थेंब, इत्यादी.

'आतून' औषध देण्याचे मुख्य प्रकार म्हणजे पोटात औषध घेणे व निरनिराळया प्रकारची इंजेक्शने. आणखी एक प्रकार म्हणजे हवेवाटे श्वासमार्गाने औषध देणे.

तोंडाने घेतलेले औषध जठरात किंवा लहान आतडयात शोषले जाते. तिथून ते रक्तात मिसळते. रक्तावाटे ते आधी यकृतात येते. यकृताच्या पेशींच्या गाळण्यातून ते पुढे हृदयात जाऊन सगळीकडे पसरते.

इंजेक्शन म्हणजे सुईवाटे शरीरात टोचून औषध देणे. बहुतेक वेळा हे इंजेक्शन मांसल भागात (स्नायूंमध्ये) दिले जाते तर काही वेळा कातडीच्या लगेच खाली दिले जाते. काही इंजेक्शने 'शिरेत' देतात.(उदा. सलाईन). 'शिरेतले' इंजेक्शन म्हणजे खरे तर नीलेमध्ये सुई टोचून औषध सोडणे. हे औषध हृदयाच्या उजव्या बाजूच्या कप्प्यांमधून फुप्फुसांची यात्रा करून हृदयाच्या डाव्या बाजूस येते. तिथून ते सर्व शरीरात पसरते. सलाईन म्हणजे वेगळे काही नसून निर्जंतुक केलेले मिठाचे किंवा साखरेचे पाणी असते. सलाईन नीलेतून देता येते.

श्वसनमार्ग : दम्याची काही औषधे श्वासावाटे देतात. ऑपरेशनच्या (शस्त्रक्रियेच्या) वेळी भूल देताना बहुधा श्वासावटे निरनिराळे गॅस (वायू) शरीरात सोडले जातात. फुप्फुसात ते रक्तात मिसळून मेंदूपर्यंत पोचतात व भूल येते.

जिभेखाली धरायची औषधे

औषधे शरीरात कशी पोचतात?जिभेखाली व तोंडात रक्तप्रवाह भरपूर असतो. ब-याच चिजा आपण चोखून किंवा जिभेखाली धरून आस्वाद घेतो. (उदा. तंबाखू) या तत्त्वाचा वापर करून इंजेक्शनपेक्षा वेगाने औषध रक्तप्रवाहात मिसळता येते. होमिओपथीत हा मार्ग वापरतातच. आता बरीच औषधे जिभेखाली धरण्यासाठी उपलब्ध आहे. हृदयवेदना कमी करणारी, शरीरवेदना कमी करणारी, रक्तदाब कमी करणारी अशी निवडक औषधे उपलब्ध आहेत. यातून शोषलेली औषधे सरळ हृदयातून सर्वत्र पोचतात. यकृताचा मार्ग टाळल्यामुळे औषध मूळ स्वरुपात व कमी न होता पेशींपर्यंत पोचते. (याउलट पचनसंस्थेत शोषलेले औषध यकृतात मोडतोड करून हृदयापर्यंत पोचते)

त्त्वचामार्ग

काही औषधाच्या चिकटपट्टया मिळतात. ही पट्टी त्त्वचेला चिकटवली की त्यातून त्वचेत हळूहळू औषध रक्तात शोषले जाते.


औषधाची विल्हेवाट

शरीरात सोडलेले कोठलेही औषध असो; रक्तात मिसळल्यानंतर त्यावर शरीराची प्रक्रिया चालू होते. आधी यकृतात ते औषध निरुपद्रवी करण्याचे आणि ते शरीराबाहेर टाकण्यासाठी त्याच्यात योग्य ते बदल करण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर मल, मूत्र, श्वास वगैरे वाटांनी ते बाहेर टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान ते शरीरात प्रवाहित झालेले असते. एवढया वेळातच त्याचा उपयोग होतो.

औषधाची रक्तातील पातळी

औषधाचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी ते रक्तामध्ये ठरावीक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते. परंतु औषधात होणारे बदल आणि शरीराबाहेर टाकले जाण्याची क्रियाही होतच राहते. काही औषधे भराभर शरीराबाहेर टाकली जातात, तर काही अगदी सावकाश. यावर औषधाचा डोस किती तासांनी द्यावा लागेल ते ठरते. यकृताच्या आजारांत (उदा. कावीळ ) या क्रिया मंदावतात म्हणून अशा आजारात औषधे देताना फार काळजी घ्यावी लागते.

रक्तामध्ये काही औषध हे त्यातल्या प्रथिनांबरोबर बांधले जाते. शरीरातील चरबीदेखील बरेच औषध शोषून घेते व हळूहळू परत सोडते.

औषधात केलेले बदल आणि ते बाहेर टाकण्याचे काम नेहमीच चालू असते. यामुळे रक्तामध्ये ठरावीक प्रमाणात औषध असल्याशिवाय सगळीकडे ते पोहोचणार नाही. या सर्व बाबींचा विचार करूनच औषधांचा डोस, ते किती वेळा घ्यायचे, कसे घ्यायचे हे ठरवले जाते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate