অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किडनीची काळजी घ्या

शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. जागतिक मूत्रपिंड दिनाच्या पार्श्वभूमीवर मूत्रपिंड आणि त्याची काळजी याविषयी आजपासून जाणून घेऊया..

मूत्रपिंड अर्थात किडनी हा अवयव मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो. घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठीएवढा असलेला हा अवयव शरीराचे एक महत्त्वाचे अंग आहे. ज्याप्रकारे एखादी गाळणी पाण्यातील कचरा, अशुध्दी गाळून शुध्द पाणी देते त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणाबरोबर मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते. मूत्रपिंडातून स्रवणाऱ्या हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हाडे निरोगी राहतात आणि लाल रक्तपेशींच्या (आरबीसी) निर्मितीलाही मदत होते. अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणेलघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून पू येणे, पोटात सतत दुखणे, चेहरा सुजणे.

मूत्रपिंड विकार कसा होतो?मूत्रपिंड विकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. या सर्वांत लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबेटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो. यावर तातडीने उपचार केले नाही तर, मूत्रपिंडाचे काम पूर्ण थांबू शकते. मूत्रपिंडावर झालेला परिणाम हा तात्पुरता असल्यास त्यावर तातडीने उपचार करून त्याचे कार्य पूर्ववत करणे शक्य असते. परंतु, हळुहळू मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होत गेला आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर मूत्रपिंड वाचवणे अशक्य ठरते.

उपचार काय?- मूत्रपिंडांवरील आजारांवर आता मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु, यात विकार लवकरात लवकर ओळखून पेशंटला मूत्रपिंडविकारांच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते. एका मूत्रपिंडाचे काम थांबले तरी, एका मूत्रपिंडाच्या साह्याने शरीराचे सर्व काम सुरळीत पार पडू शकते. मात्र, दोन्ही दोन्ही मूत्रपिंडांचे काम पूर्णपणे ठप्प झाल्यास म्हणजे किडनी फेल झाल्यास पेशंटना डायलिसिस हा एकमेव पर्याय उरतो. डायलिसिस म्हणजे मूत्रपिंडाचे काम मशिनने करणे. वर्षानुवर्षे डायलिसिसच्या साथीने आयुष्य जगणारे अनेक पेशंट आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार असलेल्या पेशंटसाठी हे एक वरदान आहे. तसेच, डायलिसिस अशक्य झालेल्या पेशंटना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा आधार आहे.

- मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्या. स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. फास्ट फूड टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. रक्तदाब-डायबेटीस असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा.

 

डॉ. निरंजन कुलकर्णी, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ

स्त्रोत :  महाराष्ट्र टाइम्स
© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate