नोकरीची रोजची वेळ गाठणं आणि कामाचा ताण यामुळे सकाळी वेळेवर उठूनही झोप अर्धवट झाल्यामुळे दिवसभर पेंगायला होतं. हे पेंगणं मात्र इतरांच्या 'डोळ्यावर' येतंय. ही अवस्था सध्या 'सोशल जेटलॅग सिंड्रोम' या नावानं ओळखली जात असून, दिवसा १० ते १२ तासांपेक्षा जास्त काम करणारा नोकरदार वर्ग याला सामोरा जातोय. आपल्याला सहा ते आठ तासाची झोप आवश्यक असते. ही झोप मिळाली तरच दिवसभराच्या कामाची कसरत उत्साहात करू शकतो. अन्यथा मानसिक आरोग्य बिघडतं सध्याची वर्किंग जनरेशन या सिंड्रोमला बळी पडत असल्याचं प्रकर्षानं जाणवतंय. झोप पूर्ण न होणं हे एकमेव कारण त्यामागे आहे. आठवड्यातील दिवशी झोप पूर्ण होत नाही म्हणून ती भरून काढण्यासाठी शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी गरजेपेक्षा जास्त झोप घेतली जाते. त्यामुळे अंग जड पडतं, कंटाळा येतो आणि त्यामुळे वीकेंडही वाया जातो. वीकेंडला जास्त झोप घेऊनही अपुऱ्या झोपेअभावी एरवीचा दिवस मात्र कंटाळवाणा होऊन जातो.
सतत विमानप्रवास करून विविध देशांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना जेटलॅगचा त्रास होतो. कारण वेगवेगळ्या वेळेमुळे त्यांना झोपणं आणि काम करणं यामध्ये कसरत करावी लागते. हाच सिंड्रोम आता प्रवास न करणाऱ्यांना निश्चित वेळी झोपी न गेल्यानं भेडसावतो आहे. युरोपमधील संशोधकांनी अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना 'सोशल जेटलॅग सिंड्रोम' असं म्हटलंय. आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वेळी झोपणं हे त्यामागचं मुख्य कारण. त्याबरोबरच कामाचा ताण, अस्वस्थ मनही या सिंड्रोमला जबाबदार आहेत. हा सिंड्रोम वेगानं पसरत असून, एका आजाराचं रूप घेऊ पाहातोय असंही त्यांनी म्हटलंय.
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यामध्ये तसंच त्याच्या विकासासाठी झोपेची भूमिका मोठी आहे. झोप आणि कामाचे तास याचं घड्याळ आपल्याच शरीरानं तयार केलंय. ते पाळलं गेलं नाही, तर विविध दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. या सिंड्रोममुळे वजनवाढ, सतत मूड बदलणं, लक्ष केंद्रित न होणं, आत्मविश्वासाची कमतरता, कार्यक्षमता कमी होणं, पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड, हृदयविकार, मधुमेह, हार्मोन्समध्ये असंतुलन आदी मोठ्या आजारांना आमंत्रण मिळतं.
रात्री १० वाजताच झोपण्याची सवय लावा. मात्र, रोजचा दिवस नवा असेल, तर रात्री जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नका. मध्ये अर्ध्या तासाचं अंतर ठेवा. आठवड्यातून किमान दोनदा १० वाजता झोपण्याचा प्रयत्न करा. दिवसा दहा मिनिटांची डुलकीही मन उत्साही करते.
सुट्टीच्या दिवशी राहिलेली झोप भरून काढा. मात्र, ती अती होणार नाही याची काळजी घ्या. काम झाल्यानंतर लगेचच घरी या. रोज इतरत्र भटकून वेळ वाया घालवू नका. उत्साही होण्यासाठी संगीत ऐका, हिरवळ पाहा, नुसतंच पडून राहा.
अंजली प्रभुणे, डाएटिशन
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स
अंतिम सुधारित : 7/8/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...