অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दोष येतात कोठून? कसे?

प्रस्तावना

आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने तसेच संस्कृतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचलेले दिसते. पण वेळ नाही म्हणून किंवा त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर त्यामुळे रोगाला आमंत्रण मिळतेच. म्हणून आयुर्वेदीय जीवनशैली स्वीकारली, आयुर्वेदिक मार्गदर्शनाचा वेळोवेळी उपयोग करून घेतला तर आरोग्य बिघडणार नाही हे नक्की.
योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही.
पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे.
दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो. मात्र हा निसर्गक्रम लक्षात न घेता अनियमित आचरण केले तर या दोषांचे असंतुलन होते आणि त्यामुळे शरीरात दोष साठायला सुरुवात होते. उदा. रात्री कफदोष वाढला की झोप येणे स्वाभाविक असते, मात्र झोपेकडे दुर्लक्ष करून जागरण केले तर त्यामुळे पित्तदोष व वातदोष वाढतात. दुपारी भूक लागूनही वेळेवर खाल्ले नाही किंवा भूक लागण्यापूर्वीच सोयीने खाऊन घेतले तर त्यामुळे पित्तदोषात बिघाड होतो. मलमूत्रविसर्जनाचा आवेग आला तरीही तो दाबून ठेवणे किंवा आवेग आला नसतानाही जबरदस्तीने विसर्जन करणे यामुळे वातदोष वाढत राहतो. सूर्योदयापासून पुढचे चार तास कफाधिक्‍याचे असतात, म्हणून सकाळी व्यायाम, उटणे लावून गरम पाण्याने स्नान, डोळ्यात कफदोष वाढू नये म्हणून अंजन करणे वगैरे गोष्टी करायच्या असतात, जेणेकरून कफदोषाचे शमन होईल. पण हे घडले नाही तर मात्र कफदोष हळूहळू शरीरात साठू लागतो. रात्री वेळेवर न झोपण्याने दिवसा झोप आली तर त्यामुळे कफदोष तसेच पित्त दोष वाढत राहतात. थोडक्‍यात, आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या नीट सांभाळली नाही की त्यातून दोष मलरूप होऊन शरीरात साठण्याची प्रवृत्ती वाढत राहते.

दोषांच्या अवस्था

रोजच्या रोज शरीरात ज्याप्रमाणे दोषांचे प्रमाण कमी-अधिक होत असते, तसेच ते ऋतुनुसारही बदलत असते. ऋतुपरत्वे दोषांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत,

 1. चय - दोष स्वतःच्या स्थानात वाढत राहणे व साचत राहणे.
 2. प्रकोप - दुधाला उष्णता देत असता एका मर्यादेनंतर ज्याप्रमाणे दूध उतू जाते त्याप्रमाणे स्थानात वाढलेला, साठलेला दोष शरीरात इतरत्र पसरणे.
 3. प्रशम - प्रकुपित झालेला दोष आपोआप शांत होणे.

तिन्ही दोष निरनिराळ्या ऋतूत या तीन अवस्थांमधून जातात. उदा. वातदोषाचा चय ग्रीष्म ऋतूत, प्रकोप वर्षा ऋतूत आणि प्रशम शरदात होतो; पित्तदोषाचा चय वर्षाऋतूत, प्रकोप शरदात तर शमन हेमंतात होते; कफदोषाचा चय शिशिरात, प्रकोप वसंतात तर प्रशम ग्रीष्मात होतो. "चय एव जयेत्‌ दोषः‘ म्हणजे दोष साठत असतानाच योग्य काळजी घेतली तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर प्रकुपित दोष शरीराबाहेर काढून टाकणे आवश्‍यक असते, अन्यथा त्यातून अनेकविध रोगांना आमंत्रण मिळू शकते.

आहार आणि पचन शरीराचा सर्व व्यापार व्यवस्थित होण्यासाठी पचन नीट होणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे योग्य पचन झाले की त्यातून शरीरातील धातू तयार होतात, हे धातू जोपर्यंत आपल्या नियत प्रमाणात असतात तोपर्यंत शरीरधारणाचे काम करतात. अन्नाचे पचन झाले की त्यातून मिळणाऱ्या शक्‍तीतून शरीरातील रस-रक्‍तादी सर्व धातूंचे पोषण होते. उरलेला मलभाग शरीराबाहेर जाणे अपेक्षित असते. तरी हे शंभर टक्के घडतेच असे नाही. हा साठलेला मलसुद्धा शरीरात रोगाला कारण ठरत असतो, त्यामुळे तो वेळच्या वेळी शरीराबाहेर काढून टाकणे आवश्‍यक असते. तसेच, पचन बिघडले व त्यापाठोपाठ धातू अयोग्य स्वरूपात किंवा अति प्रमाणात तयार होऊ लागले तर ते "मलरूप‘ समजले जातात. अशा वेळी पंचकर्माच्या माध्यमातून शरीरशुद्धी करून घेणेच आवश्‍यक असते.
आहार हा सुद्धा आरोग्य किंवा अनारोग्याला कारणीभूत होऊ शकणारा मुख्य मुद्दा असतो. चरकसंहितेत हितकर किंवा अहितकर आहारामुळे काय होऊ शकते हे पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे,
हिताहारोपयोग एक एव पुरुषवृद्धिकरो भवति ।
अहिताहारोपयोगः पुनर्व्याधिनिमित्तमिति ।।
स्वतःच्या प्रकृतीला, ऋतुमानाला, राहणीमानाला अनुकूल आहार हा व्यक्‍तीच्या पोषणाला, आरोग्याला कारणीभूत ठरतो. मात्र अहितकर आहार अनेक रोगांचे निमित्त बनत असतो. अहितकर आहारामुळे पुढील दोष उत्पन्न होऊ शकतात,

अहितकर आहारामुळे निर्माण होणारे दोष

 • अग्नीचा नाश होतो.
 • मनामध्ये दोष उत्पन्न होतात.
 • धातूंमध्ये नानाविध विकार उत्पन्न होतात. उदा. रक्‍त अशुद्ध होते. मांस-मेदधातू शिथिल होतात किंवा प्रमाणाने कमी-अधिक होतात, अस्थी ठिसूळ बनतात, मज्जा क्षीण होते, शुक्रदोष उत्पन्न होतात.
 • बल नष्ट होते, वर्ण बिघडतो.
 • इंद्रिये आपापली कामे योग्य प्रकारे करू शकत नाहीत.
 • या प्रकारे दोष उत्पन्न झाले की आहारात सुधारणा करणे पुरेसे नसते, तर बरोबरीने अगोदर घेतलेल्या अहितकर आहाराचा शरीरावर झालेला दुष्परिणाम काढून टाकण्यासाठी पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे आवश्‍यक असते.
 • आरोग्य हा सात्म्यज भाव समजला जातो म्हणजे जन्मापूर्वी आई-वडिलांनी त्यांच्या आरोग्यरक्षणासाठी घेतलेली काळजी आणि जन्मानंतर प्रत्यक्ष त्या व्यक्‍तीने स्वतः आरोग्यप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यांच्या समन्वयातून निरोगी राहता येणे शक्‍य असते. आयुर्वेदीय जीवनशैली स्वीकारली, आयुर्वेदिक मार्गदर्शनाचा वेळोवेळी उपयोग करून घेतला तर आरोग्य बिघडणार नाही हे नक्की.
 • आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने तसेच संस्कृतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचलेले दिसते. उदा. बाळंतिणीला शेक, धुरी देणे, नवजात बालकाला बाळगुटी देणे, तेल लावणे, पावसाळ्यामध्ये आहार जपून करणे, गर्भवतीने डोहाळे पुरविणे अशा किती तरी गोष्टी सर्वांच्या माहितीच्या असतात, पण वेळ नाही म्हणून किंवा त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर त्यामुळे रोगाला आमंत्रण मिळतेच. या संदर्भातील एक आठवणीत राहून गेलेली केस या प्रमाणे,

बाळंतपणातील वातदोष

पस्तिशीच्या आसपास वय असेल, नीटनेटकी साडी नेसलेली व पर्स घेतलेली मध्यमवर्गीय वाटावी अशी स्त्री एक दिवस दवाखान्यात आली. काळंवडलेली, खरखरीत झालेली त्वचा बघूनच अंदाज आला की काही तरी वाताचे दुखणे असणार. एक एक गोष्ट उलगडत गेली तसे लक्षात आले की गर्भारपणात व बाळंतपणात आवश्‍यक ती काळजी न घेतल्याने शरीरात वाताचा मोठा बिघाड झाला आहे. त्या स्त्रीने सांगितले ते असे, लग्न लहान वयात झाले. लग्नानंतर लगेच दिवस राहिले. पण घरी सासू-सासऱ्यांचा फार त्रास,त्यामुळे डोहाळे पुरवणे, खाण्यापिण्यात खास काळजी घेणे वगैरे गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नाही. बाळंतपण माहेरी झाले, पण लगेच दहाव्या दिवशी सासरी जावे लागले. घरातील सगळ्या कामाचा भार, शिवाय बाळाची काळजी या सगळ्यामुळे स्वतःला तेल, शेक, धुरी काहीच केले नाही. खाण्याची काळजी घेतली गेली नाही. पाण्यात काम करावेच लागले. दीड वर्षांनी पुन्हा दिवस राहिले, पुन्हा याच सर्व गोष्टींची पुनरावृत्ती झाली. मात्र यावेळी सहन करण्याची शरीराची क्षमता संपली आणि वाताची लक्षणे दिसायला लागली. दवाखान्यात बाई आल्या तेव्हा त्यांचा डावा खांदा एवढा आखडला होता की स्वतःची वेणी घालणे शक्‍य होत नव्हते, हातापायाची बोटे सुजली होती, ठणकत होती, कधी घोट्यावर, कधी गुडघ्यावर, कधी कोपरावर सूज यायची, वेदना सुरू व्हायच्या. एका ठिकाणची सूज उतरली की दुसरीकडे येणार व तो भाग दुखणार हे माहिती असायचेच. एकंदर बाळंतवात असे निदान करून वातशामक उपचार सुरू केले. दोन-तीन महिने संतुलनची औषधे घेतल्यावर स्नेहन-स्वेदन वगैरे पूर्वकर्मे करून विरेचन, बस्ती हे उपचार केले. बाळंतपणात वातदोष वाढलेला असल्याने उत्तरबस्तीही करून घेतल्या. सध्या त्यांना 50 टक्के बरे वाटते आहे. आखडलेला खांदा मोकळा झाला आहे. काम फार झाले तरच हाताच्या बोटांना सूज येते. सततचे दुखणे आता थांबले आहे, औषधोपचार व पथ्य यांच्या मदतीने प्रकृती सुधारेल हे नक्की.

उपाशीपोटी भेळ, आरोग्याचा खेळ

अशीच अजून एक केस आठवते ती म्हणजे चुकीच्या आहारामुळे संपूर्ण शरीर आखडलेल्या एका त

रुण स्त्रीची. सदर स्त्री स्वतः नोकरी करणारी, मात्र तिला नोकरीच्या निमित्ताने रोज पुणे ते कर्जत असा प्रवास करावा लागत असे.

दवाखान्यात आली तेव्हा तर तिला प्रवास करणे दूरच, पण आधाराशिवाय उभे राहणेही शक्‍य नव्हते. संपूर्ण अंग कडक होऊन आखडून गेले होते. वेदनाशामक गोळ्या घेऊनही दुखण्यात आराम पडत नव्हता. आयुर्वेदात नेहमीच आजाराचे कारण शोधणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केल्यावर समजले की, सकाळी फार लवकर घरातून निघावे लागायचे त्यामुळे न्याहारी वगैरे केली जात नसे. पोळी-भाजीचा सुका डबा बरोबर असायचा, पण तो खाल्ला जायचा दुपारी दोन-अडीचच्या सुमाराला. संध्याकाळी घरी पोचायला आठ तरी वाजायचेच. भुकेले राहणे, प्रवास करणे, अति परिश्रम करणे याच्याच जोडीला रोज सकाळ-संध्याकाळ गाडीमध्ये मैत्रिणी-मैत्रिणी मिळून भेळ खायच्या. उपाशी पोटी खाल्लेली वातवर्धक भेळ हळूहळू शरीरात आपला जम बसवू लागली आणि सात-आठ वर्षात बघता बघता वाताचे दुर्धर दुखणे मागे लागले. औषधे, आहार, पंचकर्म, नंतरही नियमित बस्ती यांच्या मदतीने गुण येतो आहे. सध्या प्रवास-नोकरी थांबली असली तरी स्वतःची, घरातील नेहमीची कामे करणे शक्‍य होते आहे आणि थोड्याच दिवसात ती आता पुन्हा कामावर रुजू होणार आहे.

डॉ. श्री बालाजी तांबे

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate