অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद...

१७ ऑक्टोबर राष्ट्रीय आरोग्य दिनानिमित्त..

केंद्र शासनाच्या आयुष विभागाने सन 2016 पासून धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. याबाबतचा मुख्य आयुर्वेद दिवसाचा शासकीय समारोह विज्ञान भवन नवी दिल्ली येथे साजरा केला जाणार आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश हा “आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे आयुर्वेदीय उपचार करण्याचे ज्ञान व कौशल्य आयुर्वेद चिकित्सकामध्ये व्हावे” हा आहे. यावर्षी हा दिवस दि.17 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे...यानिमित्ताने.

देशातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, आयुर्वेदीय संघटना, औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्या तसेच शासनाच्या सर्व आरोग्यसंस्था, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विविध सामाजिक संस्थेमार्फत आयुर्वेद विषयात व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुर्वेद हे प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र तसेच आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी आवश्यक पथ्यकर व हितकर आहार-आचार-विचार शैली वर्णन करणारे जीवनशास्त्र आहे. हजारो वर्षापेक्षा जास्त काळापासून अखंडित व अबाधित असे आयुर्वेदशास्त्र काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे. विश्वस्वास्थ्याच्या व विश्वकल्याणाच्या भावनेने आयुर्वेद पारंगत प्राचीन ऋषि मुनींनी नि:स्वार्थपणे या शास्त्राचे जतन व संवर्धन केले.

आयुर्वेदाचे आद्यप्रवर्तक भगवान धन्वंतरी

भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असून ते आयुर्वेदाचे आदिदेव मानले जातात. आपल्या चार भूजांमध्ये त्यांनी दिव्य असे शंख चक्र जलौका व अमृतकलश धारण केले आहेत, जे पावित्र्याचे रोगनाशाचे आरोग्याचे व दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. या कारणास्तव धन्वंतरी जयंतीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे आयोजन भारत सरकारच्या आयुष विभागामार्फत करण्यात येत आहे. यावर्षीचे राष्ट्रीय आयुर्वेददिनाचे घोषवाक्य हे Pain management through Ayurveda हे आहे. अर्थात आयुर्वेदाच्या माध्यमातून वेदना कमी करणे, वेदना म्हणजे रोगाच्या परिणामी होणारा त्रास यामध्ये जळजळ, आंबट पाणी घशासी येणे येथपासून तर छातीत कळ येऊन तीव्र प्रमाणात वेदना होणे याचा समावेश होतो. हा त्रास कमी करण्याच्यादृष्टीने आयुर्वेदाने केलेला वेगळा विचार आता आपण पाहूया.

आयुर्वेद शास्त्राचे मूळ प्रयोजनच स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् आतूरस्य विकार प्रशमनम्च! अर्थात निरोगी माणसाचे आरोग्य सांभाळणे आणि जर आजार झालाच तर त्या आजारावर उपचार करणे हे होय. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदललेली आहे. सतत ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, स्वत:च्या गरजेपेक्षा (मर्यादा न ओळखता) अधिक गरजा वाढविणे, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुन्हा अधिकचे काम त्यामुळे वाढणारा अधिकचा ताणतणाव आणि त्यांच्या परिणामी आरोग्याकडे दुर्लक्ष आणि त्याची परिणती म्हणून मधुमेह, रक्तदाब, ह्दयरोग, कॅन्सर, किडनीचे आजार, ॲसिडीटी, ॲमिबीयॉसीस, लठ्ठपणा, मलावरोध, संधीवात इत्यादी आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

आयुर्वेदाचा दृष्टिकोन उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक जास्त आहे. रोग होऊ नये, झालेच तर ते नियंत्रणात राहावे आणि त्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत या उद्देशाने पुढील महत्त्वाच्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. दिनचर्या-अर्थात आपले रोजचे दैनंदिन वेळापत्रक कसे असावे याचा विचार, ऋतुचर्या- अर्थात ऋतुनुसार आहार विहार इत्यादी वेळापत्रक कसे असावे याचा विचार, आहार-योग्य स्वास्थ्यवर्धक आहार व भोजन विधीनियमांचे पालन करणे याबाबतचा विचार, निद्रा- गाढ, योग्य कालावधीत चांगली झोप येणे याबाबतचा विचार, ब्रम्हचर्य- इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याबाबतचा विचार, असात्म्य इंन्द्रियार्थ संयोग- आपल्या ज्ञानेंद्रियाचा त्याच्या विषयाशी येणारा अतियोग, हीनयोग, मिथ्यायोग, उदा.प्रखर प्रकाशात वाचने, अंधुक प्रकाशात वाचणे इत्यादी.

व्यायाम- नियमित व्यायाम करण्याबाबतचा विचार.

प्रज्ञापराध- अमुक गोष्ट वाईट आहे हे समजून देखील ती गोष्ट पुन्हा करणे उदा. धुम्रपान/मद्यपान हे शरीराला हानिकारक आहे हे समजून देखील त्याचे सेवन करणे.

याचाच अर्थ आयुर्वेदाला वरील सर्व बाबींचे पालन आरोग्य संवर्धनासाठी करणे अपेक्षित आहे. सर्व सामान्यांनी आजारी पडण्यापूर्वी आयुर्वेद वैद्यांना भेटून संभाव्य आजार टाळण्यासाठी काय करता येईल हे समजून घेणे गरजेचे आहे. परंतू दुर्दैवाने आजारी पडण्यापूर्वी तर सोडाच परंतू आजारी पडल्यावर देखील अनेक दिवस उपचार न घेऊन रोगाची तीव्रता वाढल्यावर रुग्ण आयुर्वेदाकडे येतात आणि त्यामुळे आयुर्वेदाने उशिरा गुण येतो असा समज व्यवहारात रुढ झाला आहे. घर पेटल्यावर फोन करून फायरबिग्रेडला बोलाविण्यापेक्षा घर पेटणार नाही याची काळजी घेणे अधिक चांगले त्यानुसार हे आजार होऊ नये म्हणून आणि हे आजार झालेच तर त्याचे दुष्परिणाम कमी करून ते आजार नियंत्रणात कसे ठेवावे याचा विचार महत्त्वाचा आहे.

आयुर्वेदात सर्व आजार होण्याची महत्त्वाची दोन (सिद्धांत) कारणे सांगितलेली आहे. रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार), रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमूत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे).

रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार)-आयुर्वेदाने सामान्यात: सर्व आजाराचे महत्त्वाचे कारणे हे “अग्नी मंद असणे” हे सांगितले आहे. आजाराच्या प्रमुख कारणापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भूक न लागणे, भूक नसताना वेळ झाली म्हणून पिशवीत सामान कोंबतो तसे पोटात काहीतरी टाकणे तर याउलट भूक लागली असताना वेळ नाही म्हणून (व्यवसाय, मिटींग इत्यादी) जेवण न घेणे किंवा त्याऐवजी वडापाव, कचोरी, समोसा व इतर काही चटकमटक खाद्यपदार्थ खाणे. आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहार संभवं वस्तु रोगश्चाहारसंभव! अर्थात आहारापासून शरीराचे पोषण होते व याच्या अयोग्य सेवनाने विविध आजार होतात. तच्च नित्यं प्रयुजिंत स्वास्थ येनानुवर्तते! अजातानां विकारणां अनुत्पन्त्तिकरं यत! (च.सू.अ.5:13) अर्थात ज्यामुळे आपले आरोग्य संवर्धन होईल व संभाव्य आजार टाळले जातील, अशा प्रकारचे भोजन घ्यावे. हे भोजन उष्ण, स्निग्ध व योग्य मात्रेत घ्यावे. अतिघाईने, अति हळूहळू, बडबड करीत, खूप हसत जेवन करू नये थोडक्यात मन लावून जेवावे, टीव्ही समोर बसून जेवण टाळावे.

आपल्याला बऱ्याच वेळा भूक लागल्यासारखे वाटते आपण जेवणपण घेतो पण ती भूक खोटी असते. भूक नसताना सवयीने वेळ झाली म्हणून आपण जेवन करतो, हे चुकीचे आहे. पोट जड वाटणे, अंग जड पडणे, सुस्ती वाटणे, आळस येणे, तोंडाला पाणी सुटणे, तंद्रा येणे, मन प्रसन्न नसणे, सतत चिंता असणे, उत्साह न वाटणे इत्यादी लक्षणे असताना भूक लागल्यासारखी वाटली तरी जेवण घेऊ नये ही लक्षणे कमी झाल्यानंतरच भोजन घ्यावे. तरच ते पचते. अन्यथा अनेक आजाराला आमंत्रण दिल्यासारखे आहे. थोडक्यात पचायला हलका, बलवर्धक असा आहार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने घेणे अधिक चांगले आहे.

सकाळचा नास्ता मित्राप्रमाणे म्हणजे अगदी कमी प्रमाणात, दुपारचे जेवण राजासारखे म्हणजे व्यवस्थित (वरण, भात, भाजी, पोळी) व रात्रीचे जेवण भिकाऱ्याप्रमाणे म्हणजे अगदी अल्पमात्रे घ्यावे असे म्हटले आहे. परंतू व्यवहारात याउलट परिस्थिती पाहतो. रात्रीचे जेवण साग्रसंगीत (पंजाबी, चायनीज डिश, पनीर, बरगर, पीझा, कोल्ड्रींग इत्यादी) भरपेट घेतले जाते आणि त्यानंतर जेवणाच्या शेवटी स्वीट डिश घेतली जाते हे चुकीचे असून आयुर्वेदाच्यादृष्टीने स्वीट डिश हे जेवणाच्या सुरुवातीस घेणे आरोग्याच्यादृष्टीने हितकारक आहे. कारण जेवणाच्या सुरुवातीस भूक चांगली असल्याने गोड पदार्थाचे पचन व्यवस्थित होते. त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ घ्यावेत.

आयुर्वेदाच्यादृष्टीने पाणी देखील जेवढी तहान आहे तेवढेच प्यावे. “पिबेंत् स्वस्थोपि अल्पश: अर्थात निरोगी व्यक्तीने देखील पाणी कमी प्रमाणात प्यावे. अत्यम्बुपान अर्थात अति पाणी पिणे हे आरोग्यास हानीकारक ठरते. शरीरातील अग्नीला अन्नाप्रमाणे पाणी पण पचवावे लागते. याबाबत बरेच मतमतांतरे असली तरी आपण स्वत: प्रत्यक्ष याची अनुभूती घ्यावी.

रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमुत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे)- सर्वसामान्य रोग होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वेगाने लघवी येणे, शौचास येणे, अधोवायु, उलटी, शिंक, ढेकर, भूक, तहान, रडू येणे, झोप इत्यादी बाबी शरीरात निर्माण झाल्यावर त्यांना थांबवून थोपवून ठेवू नये. या वेगाचा अवरोध केल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. म्हणून याचा अवरोध करू नये.

निदान परिवर्जन अर्थात ज्या कारणामुळे आजार होतात त्या कारणाचा त्याग करणे मानसिक ताण तणाव, व्यायाम न करणे, अजीर्ण अपचन हे रक्तदाब ,मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजार वाढविण्यासाठीची महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे दूर करणे आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदात “नि:सुखत्वं सुखायच !” हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. याचा अर्थ सुखकारक गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच अंग मेहनतीची कामे व्यायाम चालणे, परिश्रम (शरीरातून घाम येईपर्यंत) इत्यादी गोष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत. सध्या श्रमाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जातो. सध्या जीवनशैलीत शारीरिक परिश्रमाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. गाडीचा वापर जास्त असल्याने पायी चालणे होत नाही घरात देखील सर्व गोष्टी रिमोटद्वारे (टीव्ही, एसी) केल्या जातात. वॉशिंग मशीन, कुकर, फुड प्रोसेसर, कनिक मळण्याचे यंत्र, पोळी तयार करण्याचे यंत्र इत्यादीचा वापर होत असल्याने शरीर सुखवस्तू बनत चालले आहे व त्यासोबत आपला ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे वजन वाढणे, डायबिटीज, रक्तदाब इत्यादी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

आतापर्यंत आपण विचार केलेल्या कारणांचा त्याग करणे हीच खरी हे आजार टाळण्याची गुरुकिल्ली होय याबाबत दररोज व्यायाम, अभ्यंग, प्राणायाम, योगासने करणे अधिक श्रेयस्कर आयुर्वेदात अमुक रोगावर अमुक औषधी ही संकल्पना नाही. आयुर्वेद रोगावर उपचार करत नसून रोग्यावर उपचार करणारे शास्त्र आहे. यामुळे आपण जर वरील बाबींचे पालन केले तर आपणास कुठलाच त्रास, वेदना आजार होणार नाही. रोग होऊन त्याच्या वेदना सहन करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून वरीलप्रमाणे आहार विहारामधील बदल करण्याचा संकल्प आपण आज आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने धन्वंतरी चरणी करूया.

लेखक -वैद्य व्यंकट पुरुषोत्तम धर्माधिकारी,

एम.डी. (आयुर्वेद),

सहायक संचालक आयुष, कोकण भवन.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate