অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्तदाब जिंकण्यासाठी

उच्चरक्तदाबाची समस्या जगभरात सर्वदूर पसरली आहे. धकाधकीची जीवनशैली, आरोग्यदायी सवयींचा अभाव यांच्यामुळे ही समस्या असणाऱ्या व्यक्तींची संख्या रोज वाढते आहे. यावर ताबा ‌मिळवण्यासाठी उपाययोजना केल्यास रोगमुक्त आयुष्य जगणे शक्य आहे...

उच्चरक्तदाबामुळे हृदयावरील कामाचा भार वाढतो. हृदयाला वाढीव काम करावे लागते. रक्तवाहिन्यांच्या भिंती या सततच्या उच्चरक्तदाबाने जाडसर होऊ लागतात. या बदलाला अॅथरोस्केरॉसिस असे म्हणतात. अर्थातच, यामुळे शरीरातील विविध महत्त्वाच्या अवयवांना पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर विपरीत परिणाम होतो. कालांतराने या महत्त्वाच्या अवयवांचे काम बिघडते व पेशंटला विविध व्याधी जडतात.

मेंदू



पक्षाघात (पॅरालिसिस) होण्यासाठी उच्चरक्तदाब हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूमधील एखादी रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो. आकडी येणे, ग्लानी येणे, शुद्ध हरपणे, पक्षाघात होणे अशा गंभीर बाबी होऊ शकतात.

डोळे



उच्चरक्तदाबामुळे डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील बिघाड हे दृष्टी कमी होण्याचे अथवा अंधत्व येण्याचे महत्त्वाचे कारण ठरते.

मूत्रपिंड



उच्चरक्तदाबाच्या पेशंटमध्ये मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांमधील बिघाडांमुळे घातक द्रव्यांचे प्रमाण शरीरात वाढू लागते. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.

हृदय



हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्या या उच्चरक्तदाबामुळे बाधित झाल्यास पेशंटच्या छातीत दुखू लागते. यास हृदयदाह (अँजायना) असे म्हणतात. या रक्तवाहिन्यांना कमी-अधिक प्रमाणात बंद झाल्यास हृदयविकाराचा तीव्र झटका पेशंटला येऊ शकतो. हे प्राणघातकही ठरू शकते.

उच्चरक्तदाबाची लक्षणे



डोकेदुखी, डोके जड होणे, मानेचे स्नायू दुखणे, चक्कर येणे, छातीत धडधड होणे, थकवा, धाप लागणे, पायांना सूज येणे.
उच्चरक्तदाब नियंत्रणासाठी पंचसूत्री

वजनावर नियंत्रण



लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्चरक्तदाब होण्याची शक्यता दुप्पट ते सहापट असते. ज्या प्रणाणात वजन वाढते त्याप्रमाणात रक्तदाब वाढत जातो. प्रत्येक व्यक्तीचे वजन हे त्या व्यक्तीच्या उंचीच्या प्रमाणात (बॉडी मास इंडेक्स) असणे आवश्यक असते.

आहार



आरोग्यपूरक आहाराचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्र‌ित राहातो. तसेच, वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. फळे, भाज्या, कमी कॅलरीयुक्त दुधाचे पदार्थ, कडधान्ये, डाळी, ताजे मासे यांचा समावेश आहारात असावा.

सोडियम कमी करा



आपल्या आहारात चवीसाठी मीठ वापरतो. मिठातील सोडियम व क्लोराईड या क्षारांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. रक्तदाब ‌वाढीसाठी तसेच हृदयविकार, पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांना मिठाचे अतिसेवन कारणीभूत ठरते.

नियमित व्यायाम



वजन नियंत्र‌ित राहण्यासाठी आण‌ि हृदयाचा व्यायाम म्हणून नियमित व्यायाम गरजेचा ठरतो. तसेच, मनावरचा ताण कमी होतो. किमान ४० मिनिटे रोज चालणे, हा एक उत्तम व्यायाम ठरू शकतो.

व्यसनांवर नियंत्रण


नियमित मद्यपान आण‌ि धूम्रपानाचा रक्तदाबावर परिणाम होत असतो. मद्यपानाने वजन वाढते तसेच धूम्रपानाने हृदयविकार होण्याची शक्यता दोन ते चारपटींनी वाढते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेकांचा रक्तदाब नियंत्रणाबाहेर असतो. त्यावर ताबा मिळवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे श्रेयस्कर आहे.

 

स्त्रोत - महाराष्ट्र टाइम्स

 

अंतिम सुधारित : 9/12/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate