नमस्कार! 2015 हे नवीन वर्ष माझ्या सर्व शेतकरी कुटुंबातील मैत्रिणींना, घरातील वडीलधाऱ्यांना आणि चिमुकल्या बालगोपाळांना आनंदाचे जावो, ही ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.
खरोखरीच अक्षरशः ऊन, वारा, पाऊस कशाकशाची तमा न बाळगता कष्ट करून शेतात पिकवलेले धान्य आम्हाला मिळते तेव्हा आजच्या लहान-लहान मुलांना या तुमच्या कष्टांची जाणीव आम्ही करून देतो. अन्न हा आवश्यक घटक असून, त्यासाठी जे धान्य लागतं ते काळ्या मातीत उत्तम रीतीने यावं यासाठी तुम्ही किती मेहनत करता हे समजायलाच पाहिजे. ज्याद्वारे सर्वांच्या मनात प्रेमाबरोबर आदर आणि आपुलकी निर्माण होईल. कधी अवकाळी पाऊस व त्यातून होणारे पिकाचे भरमसाट नुकसान तर कधी दुष्काळामुळे कमी पडणारे पाणी यातून होणाऱ्या मानसिक त्रासातून, दुःखातून सावरताना तुमच्या मनाच्या खंबीरपणाचं कौतुक करावंसं वाटतं.
शेतातील कष्टाचे काम, नैसर्गिक संकटे या सर्वांना तोंड देण्यासाठी काय आवश्यक आहे, माहीत आहे मैत्रिणींनो, तर उत्तम आरोग्य! बरोबर ना? आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध आपल्या माणसांची काळजी घेण्यासाठी, आपल्या जोडीदारासाठी, आपल्या मुलांसाठी स्वतःचे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगले असायलाच हवे आणि याची जाणीव घरातील प्रत्येक स्त्रीला असायला हवी, हे मी तुम्हाला तुमची जवळची मैत्रीण म्हणून सांगत आहे. जरी डॉक्टर असले तरी मनमोकळेपणाने संवाद साधत आहे, ज्याद्वारे आपल्यात छान नातं तयार होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्त्री ही कुटुंबाचा फार मोठा आधार असते. स्वच्छता, जेवणाचे स्वरूप, वेळा सांभाळणे, लहान मुलांचा अभ्यास, त्यांचा आहार, जोडीदाराच्या तब्येतीची काळजी, वृद्ध लोकांची सेवा आणि हे सांभाळून शेतीसाठी जमेल तशी मदत करणे या सर्व गोष्टी सहजपणे सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? मला सांगा एक स्त्री आजारी पडली तर घर कसं सुनं होऊन जातं. मुलांचे चेहरे ओढल्याप्रमाणे होतात. घराची व्यवस्था कोलमडून जाते, म्हणून आपल्या कुटुंबासाठी आरोग्य सांभाळणे नितांत गरजेचे आहे.
उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरणातील बदलाप्रमाणे काय काळजी घ्यावी, आहारात बदल कसा करावा, पाणी किती व कसे प्यावे याबद्दलची जाणीव तसेच अधूनमधून चक्कर येणे, अंधारी येणे, पोटात दुखणे, जेवण न जाणे अशा तक्रारी, तसेच मासिक पाळीसंबंधी, अंगावर पांढरे जाणे, लघवीला, शौचाला त्रास होणे, अंगावर खाज येणे इतकेच नव्हे, तर गरोदरपणात घ्यावयाची काळजी व इतरही आजारांबाबत मनमोकळा संवाद आवश्यक आहे.
आई, पत्नी, सून, भावजय, जाऊ, वहिनी, आत्या अशा किती तरी जबाबदाऱ्या पेलताना, कष्ट करताना, कुटुंबासाठी झिजणाऱ्या स्त्रियांनी स्वतःचे आरोग्य जपले पाहिजे, असे मनापासून वाटते. त्यासाठीच या नवीन वर्षात हितगूज करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्या भेटीला येणार आहे. लेखांच्या माध्यमातून भेटताना मला खूप आनंद आणि समाधान मिळणार आहे आणि तुम्हालाही तो मिळेल, असा मी प्रयत्न करेन.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
समाजाच्या सामूहिक हितासाठी सर्वांची मिळून सर्वांना...