অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हृद्‌बस्ती

बायपास किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला मिळालेला असताना पंचकर्म व हृद्‌बस्ती घेतल्याने तब्येत अगदी व्यवस्थित राहिलेली अनेक उदाहरणे असतात. शिवाय यामुळे हृदयाची ताकद वाढत असल्याने व आतला अवरोध निसर्गतःच कमी होत असल्याने पुन्हा पुन्हा हृद्रोगाचा त्रास होणेसुद्धा टाळता येऊ शकते. 

नेत्रबस्तीत ज्याप्रमाणे डोळ्यांभोवती उडदाच्या पिठाचे पाळे बनवले जाते व आत औषधी तेल वा तूप भरून ठेवले जाते, त्याचप्रमाणे शरीराच्या इतरही भागांवर उपचार करता येतात. मुख्यत्वे हृदय, मेरुदंड व गुडघे या शरीरभागांवर या प्रकारचा उपचार करता येतो व यांना अनुक्रमे हृद्‌बस्ती, मेरुदंड व जानुबस्ती असे म्हटले जाते.

सहसा हे उपचार मुख्य पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी झाल्यानंतर करावयाचे असतात. कारण आतली स्रोतसे शुद्ध व मोकळी झालेली असली तरच पाळ्यात भरलेल्या औषधी तेला-तुपाचा प्रभाव आतल्या अवयवांपर्यंत पोचू शकतो. पंचकर्माशिवाय हे शक्‍य होत नाही.

हृद्‌बस्ती

हृद्रोगावर केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांमधला हा सर्वांत महत्त्वाचा आणि उपयुक्‍त उपचार होय. प्रथम स्नेहन-स्वेदनाद्वारा पूर्वतयारी, नंतर विरेचनाद्वारा मुख्य शरीरशुद्धी व त्यानंतरही काही दोष आतड्यात चिकटून राहिले असल्यास ते बस्तीच्या मदतीने शरीराबाहेर काढून मगच हृद्‌बस्तीची योजना केली जाते.

यात सुरवातीला व्यक्‍तीच्या छाती-पोटावर अभ्यंग केला जातो, नंतर छातीवर किंचित डाव्या बाजूला गोलाकार उडदाच्या पिठाचे पाळे बनवून त्यात रुग्णाच्या प्रकृती व हृद्रोगाच्या प्रकारानुसार औषधी तूप किंवा तेल भरले जाते. हे तूप वा तेल किंचित गरम केलेले असते. साधारणतः 30 मिनिटांसाठी हृद्‌बस्ती दिली जाते व नंतर तेल वा तूप तसेच पाळे काढून ती जागा गरम पाण्यात भिजविलेल्या सुती कापडाने स्वच्छ केली जाते. या उपचारानंतर व्यक्‍तीने 30 मिनिटांसाठी विश्रांती घ्यायची असते.

वर वर पाहता हृद्‌बस्ती हा उपचार साधा वाटला तरी तो सरळ हृदयावर काम करत असल्याने हृद्‌बस्ती घेतलेल्या दिवशी आहार-आचरणात काळजी घ्यायची असते. विशेषतः प्रवास, फार हसणे, फार बोलणे, रागावणे, पळणे, उन्हात वा वाऱ्यावर जाणे हे सर्व टाळणे आवश्‍यक असते.

हृद्‌बस्ती ही सहसा एक किंवा दोन दिवसांआड करायची असते.

हृद्‌बस्तीचा उपयोग पुढील अवस्थांमध्ये होताना दिसतो

- हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये अवरोध उत्पन्न होणे (ब्लॉकेज). 
- हृदयाची ताकद कमी झालेली असणे. 
- हृदयाच्या झडपांमध्ये कडकपणा आलेला असणे (स्टेनॉसिस). 
- हृदयाच्या गतीमध्ये दोष उत्पन्न झालेला असणे.

अशा प्रकारे हृद्रोगावर तर हृद्‌बस्ती महत्त्वाची असतेच, पण बऱ्याच वर्षांचा मधुमेह असला, घरामध्ये हृद्रोगाची प्रवृत्ती असली तरी भविष्यात हृद्रोग होऊ नये यासाठी हृद्‌बस्तीची योजना करता येते व त्याचाही उत्तम उपयोग होताना दिसतो.

अगोदर शास्त्रोक्‍त पंचकर्म, दोन किंवा तीन बस्ती व नंतर दोन-दोन दिवसांनी चार वेळा हृद्‌बस्ती घेतल्याने हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांतील अवरोध कमी झाल्याची व हृद्रोगाची सर्व लक्षणे, उदाहरणार्थ - 
- दम लागणे 
- चालताना, जिना चढताना किंवा बोलताना धाप लागणे 
- छातीत दुखणे 
- छातीत अकारण धडधडणे 
- छातीत जडपणा अनुभूत होणे वगैरे लक्षणे कमी होतात असा अनेकदा अनुभव येतो.

बायपास किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला मिळालेला असताना पंचकर्म व हृद्‌बस्ती घेतल्याने तब्येत अगदी व्यवस्थित राहिलेली अनेक उदाहरणे असतात. शिवाय यामुळे हृदयाची ताकद वाढत असल्याने व आतला अवरोध निसर्गतःच कमी होत असल्याने पुन्हा पुन्हा हृद्रोगाचा त्रास होणेसुद्धा टाळता येऊ शकते.

डॉ. श्री बालाजी तांबे

स्त्रोत- सकाळ

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate