केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे. दि. ५ ते २० सप्टेंबर २०१७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
समाजातील लपून राहिलेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरूग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होवून रोगाचा होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत. हे अभियान पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून घरामधील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येणार आहे.
आशा व त्याच विभागातील एक पुरूष स्वयंसेवक टीम सदस्य राहणार आहे. दररोज एका टीममार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. या अभियानात लोकांनी स्वत: सहभागी होवून सहकार्य करावे.
कुष्ठरोगाविषयी विचारले जाणारे मुलभूत प्रश्न व त्यांची शास्त्रीय उत्तरे पुढीलप्रमाणे-
कुष्ठरोग म्हणजे काय ?
कुष्ठरोग म्हणजे फक्त मानवाच्या त्वचा व चेतातंतूना होणारा सर्व सामान्य आजार होय.
कुष्ठरोग होण्याचे मूळ कारण काय आहे ?
कुष्ठरोग होण्याचे मूळ कारण केवळ कुष्ठजंतूचा संसर्ग होय. कुष्ठजंतूचे शास्त्रीय नाव मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री आहे. या जंतुचा शोध डॉ. जी.ए. हॅन्सन या नॉर्वेमधील शास्त्रज्ञाने २८ फेब्रुवारी १८७३ रोजी लावला.
कुष्ठरोग जंतूंचा प्रसार कोणत्या माध्यमातून होतो?
कुष्ठजंतूंचा प्रसार प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतो. रूग्णांच्या शिंकेद्वारे, उच्छवास व थुंकीद्वारे कुष्ठजंतू शरीराबाहेर पडून हवा/ वातावरण दुषित होते. अशा कुष्ठजंतूने दूषित झालेल्या हवेच्या श्वसनाने निरोगी व्यक्तीस कुष्ठजंतूंचा संसर्ग होतो.
कुष्ठरोगाचे सर्व रूग्ण रोगाचा प्रसार करतात का ?
नाही, कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत. असांसर्गिक व सांसर्गिक. फक्त उपचार न घेतलेले सांसर्गिक प्रकारचे कुष्ठरूग्ण कुष्ठरोगाचा प्रसार करू शकतात.
कुष्ठजंतूंचा संसर्ग झाल्यास कुष्ठरोग होण्यास प्रतिबंध करणे शक्य आहे का?
नाही, अद्याप कुष्ठरोगावर रोगप्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. यामुळे कोणत्याही व्यक्तीस कुष्ठरोगास प्रतिबंध करणे शक्य नाही. यावर कुष्ठरूग्ण शोध व एम.डी.टी. उपचार हाच एकमेव पर्याय आहे.
कुष्ठरूग्णांमध्ये सांसर्गिक कुष्ठरूग्णांचे प्रमाण किती ?
नवीन कुष्ठरूग्णामध्ये सांसर्गिक कुष्ठरूग्णाचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के असते. सांसर्गिक कुष्ठरूग्ण औषधोपचार सुरू होण्याच्या अल्पावधीतच असांसर्गिक बनतात. यामुळे त्यांच्यापासून इतरांना कुष्ठसंसर्गाचा धोका नसतो.
कुष्ठरोगातील सांसर्गिक प्रकारचे रूग्ण कसे ओळखता येतात?
सांसर्गिक प्रकारचा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीमध्ये रोगाच्या प्राथमिक अवस्थेत त्वचेच्या पोतात बदल झालेला दिसून येतो. त्वचा तेलकट, गुळगुळीत, चमकदार व जाडसर (कानाच्या पाळ्या) झालेली दिसते. तसेच भुवयांचे केस विरळ होतात. निदान व उपचारास विलंब झाल्यास प्रगत अवस्थेत त्वचेवर गाठी येतात.
असांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोगाची त्वचेवरील प्रमुख लक्षणे व वैशिष्टे कोणती ?
त्वचेवर न खाजणारा, लाल किंवा फिकट रंगाचा, एक वा अधिक चट्टा/चट्टे येतात. त्यावर संवेदना क्षमतेत कमतरता /बधिरता येते. चट्ट्याच्या भागात घाम व केसांच्या प्रमाणात घट झालेली दिसून येते.
कुष्ठरोगाच्या जंतूंच्या संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव होतो का ?
नाही, कुष्ठरोगाप्रती नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा रोग होवू शकतो. भारतीय समाजात कुष्ठरोग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. (केवळ २ ते ५ टक्के) कारण, भारतीय नागरिकांमध्ये कुष्ठरोगाप्रती निसर्गत:च उच्च रोगप्रतिकारशक्ती असण्याचे प्रमाण ९५ ते ९८ टक्के इतके जास्त आहे.
कुष्ठरोगाच्या जंतूंचा संसर्ग झाल्यापासून कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्यास किती कालावधी लागतो?
रोगजंतूंचा संसर्ग झाल्यापासून रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्यास लागणाऱ्या कालावधीस अधिशयन काळ असे म्हणतात. कुष्ठरोगाचा अधिशयन काळ हा सरासरी ३ ते ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पण (२५ ते ४० वर्षे) लागू शकतो. कुष्ठरोगाचा अधिशयन काळ हा व्यक्तीच्या कुष्ठरोगाप्रती असणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे.
कुष्ठरोगाचे निदान कशा पद्धतीने करतात ?
संवेदना तपासून- असांसर्गिक कुष्ठरोगाच्या प्रकारामध्ये त्वचेच्या चट्ट्यावरील /बाधित भागावरील संवेदना तपासून निदान करता येते.
चेतातंतू तसेच संवेदना आणि स्नायूंची क्षमता तपासून
त्वचा विलेपन तपासून- सांसर्गिक कुष्ठरोगाच्या प्रकारामध्ये ज्यामध्ये त्वचा तेलकट गुळगुळीत लालसर, जाडसर किंवा शरीरावर अनेक चट्टे आहेत. पण संवेदना सामान्य आहे, अशा रूग्णांमध्ये त्वचा विलेपनाची प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणीद्वारे कुष्ठजंतूच्या अस्तित्वाची खात्री करून कुष्ठरोगाचे निदान निश्चित केले जाते.
कुष्ठरोग बरा होतो काय ?
नियमित व पूर्ण कालावधीच्या एम.डी.टी. उपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. रूग्णावर या औषधांचा कोणताही दीर्घकालीन गंभीर अथवा अनिष्ठ परिणाम होत नाही.
कुष्ठरोगावरील वैद्यकीय सेवा कोठे उपलब्ध असतात ?
कुष्ठरोगावरील निदानात्मक सेवा (एम.डी.टी.) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये नि:शुल्क उपलब्ध असतात. याशिवाय खाजगी क्षेत्रातील सर्व त्वचारोग तज्ज्ञांकडे कुष्ठरोगावरील वैद्यकीय सेवा उपलब्ध असतात.
कुष्ठरोग दुरीकरण म्हणजे काय ? याचा दुरगामी परिणाम काय ?
कुष्ठरोग दुरीकरण म्हणजे समाजातील कुष्ठरूग्णाचे प्रमाण दर १० हजार लोकसंख्येमागे १ किंवा १ पेक्षा कमी असणे. कुष्ठरोग तज्ज्ञांच्या मते कुष्ठरोगाचे प्रमाण समाजात इतक्या कमी स्तरावर आल्यास कुष्ठरोग ही सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने समस्या राहत नाही. तसेच उच्च प्रतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कमी प्रमाणातील सातत्य टिकविल्यास कालांतराने कुष्ठरोग नैसर्गिकरित्या लोप पावेल.
कुष्ठरोग शोध अभियान कालावधीत सर्वांनीच तपासणी करावी. कुष्ठरोग हा बरा होणारा रोग आहे.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/9/2020