गरीब, गरजू रुग्णांची आरोग्य पूर्वतपासणी करून त्यांच्या आजारांवर योग्य निदान व औषधोपचार मोफत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून हे अभियान राज्यात बीड जिल्ह्यासह सहा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाविषयी ही माहिती.
दैनंदिन आयुष्याच्या सुखकर वाटचालीसाठी निरामय जीवन अत्यावश्यक गोष्ट आहे. शरीर आणि मन स्वस्थ असेल तर माणूस कोणतेही आव्हान सहजपणे पेलू शकतो. व्यक्ति, स्वस्थ ग्राम आणि स्वस्थ राज्य या पायऱ्यावरूनच आपण स्वस्थ राष्ट्राचे अंतिम ध्येय गाठू शकतो. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून स्वस्थ भारत घडवण्यासाठी स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
या अभियानातर्गंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामुल्य वैद्यकीय सेवा देणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व प्रथम निवडक जिल्ह्याच्या ठिकाणी पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतही जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामुल्य उपचार उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. याकरिता संबंधित जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुखांसोबत वैद्यकीय शिक्षण विभागांअतर्गत सर्व शासकीय/खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत यांच्या अखत्यारितील आरोग्य विभाग यांच्या सहभागाने व विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, समाजसेवक यांच्या समन्वयाने ही मोहिम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत विविध जिल्हादरम्यान गरीब, गरजू रुग्णांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी संबंधित रुग्णांच्या आजाराचे निदान होण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या नियोजनासाठी संबंधित जिल्ह्यांमधील गरीब, गरजू रुग्णांची आरोग्य पूर्व तपासणी करण्याचा शासन निर्णय घेत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे 2017 पासून महाराष्ट्रातील सहा महसुली विभागातील प्रत्येक एक याप्रमाणे नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यामध्ये प्रथम टप्प्यांत 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमे अंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, ग्रंथीचे विकार, मनोविकार, कर्करोग, नाक-कान-घसा विकार, दंतरोग, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, लठ्ठपणा आदी विषयासंबंधीच्या आजारांची पूर्व तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेकरिता विविध विषयासंबंधीच्या आजारांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ समितीमार्फत, राज्यातील सामाजिक व पर्यावरणाची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध आरोग्य मानकांनूसार पूर्व तपासणीच विहीत नमुने अंतिम करण्यात आले आहेत. तसेच, संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांनी तज्ज्ञ समितीमार्फत अंतिम करण्यात आलेले पूर्व तपासणीचे विहीत नमुने ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे.
या मोहिमेअंतर्गत पथदर्शी जिल्ह्यातील प्रत्येक गावांगावांत प्राथमिक आरोग्यकेंद्राअंतर्गत आरोग्य पूर्व तपासणी कक्ष स्थापित करण्यात आली आहे. यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्यामार्फत रुग्णजागृती करून त्यांना तपासणी कक्षामध्ये तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत प्रवृत्त करण्यात येत आहे.शहरी भागाबाबत सदर मोहिमेअंतर्गत पथदर्शी जिल्ह्यातील शहरांमध्ये प्रत्येक प्रभागातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य पूर्व तपासणी कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्यामार्फत रुग्णजागृती करून त्यांना तपासणी कक्षामध्ये तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत प्रवृत्त करण्यात येणार आहे. पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचे विविध जिल्ह्यादरम्यानचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी एक राज्यस्तरीय समन्वय समिती व संबंधित जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय समन्वय समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हे अध्यक्ष असून सार्वजनिक आरोग्य मंत्री, हे सह अध्यक्ष आहेत. अधिष्ठाता, सर ज.जी.समुहे रुग्णालये हे या समितीचे राज्य समन्वय अधिकारी राहतील, सदर राज्यस्तरीय समितीची रचना पुढीलप्रमाणे राहिल मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग अध्यक्ष, मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग सहअध्यक्ष, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग सदस्य, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य, प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सदस्य, आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) सदस्य, संचालक (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) सदस्य, संचालक (आयुष) सदस्य, संचालक (आरोग्य सेवा) सदस्य, अनुलोम सामाजिक संस्था यांचा प्रतिनिधी सदस्य, निरामय सामाजिक संस्था यांचा प्रतिनिधी सदस्य, अधिष्ठाता सर ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई, राज्य समन्वय अधिकारी सदस्य सचिव आहेत.
जिल्हास्तरीय समन्वयसमितीमध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे मुख्य समन्वय तथा अध्यक्ष राहतील. सदर जिल्हास्तरीय समितीची रचना पुढीलप्रमाणे राहिल: पालकमंत्री मुख्य समन्वय तथा अध्यक्ष, सर्व खासदार/आमदार सदस्य, जिल्हाधिकारी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, आयुक्त/मुख्याधिकारी महानगरपालिका/नगरपालिका सदस्य, उपसंचालक (आरोग्य) सदस्य, जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय दंत/आयुर्वेद महाविद्यालय सह सदस्य सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी सह सदस्य सचिव, अधिष्ठाता, खाजगी वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/होमिओपॅथी महाविद्यालय सदस्य, मुख्य आरोग्य अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद/नगर पंचायत सदस्य, जिल्हा समन्वय अधिकारी, जीवनदायी आरोग्य योजना सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य, जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी सदस्य, अनुलोम सामाजिक संस्था यांचा प्रतिनिधी सदस्य, सहाय्यक संचालक (आयुष) सदस्य राहतील.
सर्व गरजू रुग्णांचा पूर्व तपासणीसाठीच्या अंतिम करण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये आजारनिहाय तपशील संगणकीय प्रणालीवर व शासनामार्फत उपलब्ध केलेल्या विवरण पत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या आरोग्य पूर्व तपासणी कक्षामार्फत नोंद करण्यात येत आहे व त्याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा समन्वय समिती सदस्य सचिव यांना सादर करावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा लाभ मिळण्याच दृष्टीने जिल्हा समन्वय समितीने स्थानिक प्रशासकीय अधिकारी, स्थानिक आरोग्य यंत्रणा व कर्मचारी यांना दि. 24 ते 29 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये सविस्तर बैठका घेऊन प्रशिक्षण दिले आहे. तसेच, या पूर्व तपासणी मोहिमेदरम्यान तपासणी झालेल्या रुग्णांचा सविस्तर अहवाल दि.31 मे 2017 अखेर जिल्हा समिती सदस्य सचिव यांनी राज्य समन्वय अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 मे रोजी करण्यात आला. पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा कार्यक्रम दि.1 ते 27 मे 2017 या कालावधीत नाशिक, बीड, चंद्रपूर, सांगली, पालघर आणि अकोला या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार संबंधित जिल्ह्यातील आढळुन आलेल्या आजारांबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम व आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण हे संबंधित जिल्हासतरीय समन्वय समितीमार्फत आयोजित करण्यात आला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेच्या निष्कर्षानूसार आढळून आलेल्या गरजू रुग्णांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामुल्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समन्वय समितीने राज्यस्तरीय समन्वय समितीसोबत तात्काळ सविस्तर नियोजन करून प्रत्येक गरजू रुग्णाला अभियानाचा लाभ होण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी सुरु आहे.
त्याशिवाय ज्या रुग्णांना अस्तित्वात असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही अशा रुग्णांची मुख्यमंत्री सहाय्यक निधीद्वारे उपचारांसाठी मदत मिळणेकरीता जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव (जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी यथोचित प्रस्ताव संबंधितांना सादर करून पाठपुरावा करावा व याकरीता स्वतंत्र रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात यावा. त्याशिवाय वरील पैकी दोन्ही ठिकाणी उपचारास पुरेशी मदत न मिळु शकणाऱ्या रुग्णांसाठी सामाजिक संस्था, अशासकीय संस्था तसेच सामुदायिक सामाजिक दायित्व निधीद्वारे उपचारास मदत उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री यांचे आरोग्य सल्लागार व राज्य समन्वय अधिकारी यांनी स्वतंत्र कक्ष स्थापून नियोजन करावे, अशा सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आढळून आलेल्या विविध आजारांबाबत संशोधन करून शासनस्तरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समन्वय समितीने करावी. या मोहिमेच्या आधारावर संपूर्ण राज्यात पंडित दीनयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित महात्मा फुले जिल्हा आरोग्य योजनेची पुढील आखणी करण्यात येणार आहे.सहा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेत सर्व रुग्णांनी सहभागी होऊन आपले आरोग्य सुधारण्याची सुवर्णसंधी दवडू नये यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रास तात्काळ संपर्क साधावा हेच अपेक्षित आहे.
लेखक - अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी,बीड
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/11/2020
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत वाता...
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...