অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेंटाव्हॅलंट लसीकरण

पेंटाव्हॅलंट लसीकरण

  1. पेंटाव्हॅलंट लसीकरणासंबंधी अधिक माहिती-हिब म्हणजे काय ? त्याच्यामुळे कोणते रोग उद्भवतात ?
  2. हिब हा रोग सार्वजनिक आरोग्याची समस्या का आहे ?
  3. हिबचा संसर्ग कसा होवू शकतो, पसरु शकतो ?
  4. हिबचा संसर्ग कोणाला होऊ शकतो? कोणत्या प्रकारच्या बालकांना संसर्गापासून सर्वाधिक धोका आहे ?
  5. हिबचा संसर्ग झाल्यास प्रतिजैविके प्रभावी ठरतात का?
  6. हिबपासून होणारे संसर्ग कसे थोपवता येऊ शकतात ?
  7. हिबच्या लसीच्या मर्यादा काय आहेत?
  8. हिबच्या लसीने कोणाला संरक्षित केले पाहिजे ?
  9. हिबच्या लसीचे किती डोस आवश्यक आहेत ? ते कधी दिले पाहिजेत ?
  10. हिबची लस स्वतंत्रपणे न देता पेंटाव्हॅलंट लसीच्या स्वरुपात का दिली जाते ?
  11. 10 महिन्यांपर्यंत कोणतीही लस टोचण्यात आलेली नाही, अशा बालकाला कोणत्या लसी देण्यात येऊ शकतात ?
  12. पेंटाव्हॅलंट लसीचा वापर, अपव्यय आणि लसीकरणाची व्याप्ती यांचे सनियंत्रण करणे गरजेचे आहे का ?
  13. कोणत्‍या प्रकारच्‍या नोंदी ठेवणे आवश्‍यक आहे ?

दरवर्षी जगात पाच वर्षांखालील 3 लाख 70 हजारहून अधिक बालके हिबमुळे दगावतात. त्यापैकी भारतामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण 20 टक्के आहे. हिब रोगातून वाचलेली बालके कायमस्वरुपी अपंग अथवा कर्णबधीर होतात अथवा त्यांच्या मेंदूला इजा पोहोचते. हा धोका लक्षात घेवून केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही निवडक राज्यांमध्ये राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत पेंटाव्हॅलंट लसीकरण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेंटाव्हॅलंट लसीमुळे बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच प्राणघातक रोगांपासून संरक्षण होते. भारतामध्ये डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि हेपिटायटिस बी) यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात या आधीच करण्यात आला आहे. यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एकत्रितपणे या समुच्चयाला ‘पेंटाव्हॅलंट’ असे संबोधण्यात येते.

हिब लसीमुळे हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी जिवाणूद्वारे होणाऱ्या न्युमोनिया, मेनिंजायटिस, बॅक्टेरेमिया, एपिग्लोटायटिस, सेप्टिक आर्थ्रायटिस आदींसारख्या गंभीर रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. पेंटाव्हॅलंट लस दिल्याने बालकाला सुई वारंवार टोचावी लागत नाही आणि बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच रोगांपासून संरक्षण मिळते.
अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हास्तर, तालुकास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यिका (स्त्री) यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर 22 जून, 2015 व 10 सप्टेंबर, 2015 रोजी घेण्यात आले आहे. आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सेवक (स्त्री/पुरुष), अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण तालुकास्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी राज्यस्तरावरुन 72 हजार लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

बालवयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वज्ञात आणि सर्वात प्रभावी पद्धतीपैकी एक आहे. भारत सरकारने अंमलबजावणी केलेल्या सार्वत्रिक लसीकरण उपक्रमामुळे (युआयपी) लसींच्या वापराद्वारे टाळता येण्याजोग्या रोगांना (व्हीपीडी) प्रतिबंध आणि नियंत्रित करण्याबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे. पेंटाव्हॅलंट लसीचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी (हिब) या जिवाणूद्वारे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिंजायटिस या रोगांचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होईल.

लसीकरणाच्या उपक्रमातील सध्याच्या हेपिटायटिस बी आणि डीपीटी प्राथमिक लसीकरणाच्या योजनेच्या जागी पेंटाव्हॅलंट लसीचा उपक्रम राबवण्यात येईल. त्याशिवाय संस्थांमध्ये जन्म झालेल्या शिशूंना जन्म झाल्यावर 24 तासांच्या आत जन्मतः देण्यात येणारा हेपिटायटिस ‘बी’ चा ‘0’ डोस पूर्वीप्रमाणे चालू राहील. 16 ते 24 महिने आणि 5 ते 6 वर्षे या वयोगटातील बालकांना देण्यात येणारे डीपीटीचे बूस्टर पुर्वीप्रमाणेच चालू राहतील.
लसीकरणाचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

लस

वेळापत्रक

बीसीजी, हेपिटायटिस ‘बी’ चा  ‘0’ ओपीव्ही ‘0’

जन्माच्या वेळी

पेंटाव्हॅलंट (डीपीटी+हेपिटायटिस बी + हिब) ओपीव्ही

6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे

गोवर -1 आणि अ जीवनसत्व

9 ते 12 महिने

डीपीटी बूस्टर, ओपीव्ही बूस्टर, गोवर - 2

16 ते 24 महिने

डीपीटी बुस्टर - 2

5 ते 7 वर्ष


पेंटाव्हॅलंट लस द्रवरुप अवस्थेत एका लहान बाटलीत येते. त्यात 10 डोस असतात. प्रत्येक डोस 0.5 मि.ली. असून तो एडी सिरिंजद्वारे मांडीच्या मध्यभागी पुढे अथवा बाजूला इंजेक्शनच्या स्वरुपात देण्यात येतो. लसीकरणातील टाकाऊ वस्तूंच्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरुन इंजेक्शनच्या सिरिंज आणि बाटल्या नष्ट करण्याच्या संबंधितांना आणि आरोग्य सेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पेंटाव्हॅलंट लस ही शीत तापमानाबाबत संवेदनशील लस असल्याने ती अधिक 2 अंश ते अधिक 8 अंश सेल्सियस तापमानामध्ये आईस लाईन्ड फ्रिजमध्ये ठेवावी आणि कंडिशन्ड आईस पॅकसह वॅक्सिन कॅरियरमधून वाहून न्यावी. लस गोठल्यास अथवा व्हीव्हीएम त्याज्य बिंदूपर्यंत पोहोचल्यास ती नष्ट करावी. बाटलीचे निरीक्षण केले असता वापरण्याजोगे व्हीव्हीएम-चौकोनाचा रंग वर्तुळापेक्षा फिका असतो आणि न वापण्याजोगे व्हीव्हीएम-चौकोनाचा रंग वर्तुळाच्या रंगाशी जुळणारा अथवा गडद असतो.

या लसीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि तिचा वापर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

पेंटाव्हॅलंट लसीकरणासंबंधी अधिक माहिती-हिब म्हणजे काय ? त्याच्यामुळे कोणते रोग उद्भवतात ?

हिब हे हिमोफिलिस इन्फ्लुएंझा टाईप बी याचे संक्षिप्त रुप आहे. या प्रकारच्या जिवाणूमुळे गंभीर प्रकारचे संसर्ग होतात.
1) बॅक्टेरियल मेनिंजायटिस- मज्जारज्जू आणि मेंदू यांना झाकणाऱ्या पटलांना असलेली दाहक सूज हा अतिशय गंभीर प्रकारचा संसर्ग आहे. 
2) न्यूमोनिया- फुप्फुसांना आलेली दाहक सूज.
3) सेप्टिसेमिया- रक्तामध्ये उपस्थित असलेले संसर्गजन्य जिवाणू.
4)सेप्टिक आर्थ्रायटिस- सांध्यांना आलेली दाहक सूज.
5) एपिग्लोटायटिस - स्वरयंत्राच्या आसपासच्या जागेला आलेली दाहक सूज आणि श्वसन नलिकेत आलेला अडथळा.
हिब म्हणजे हेपिटायटिस बी (हेप बी) नव्हे, हेपिटायटिस ‘बी’ हा आजार विषांणूमूळे होतो आणि यकृताच्या कार्यावर परिणाम करतो.

हिब हा रोग सार्वजनिक आरोग्याची समस्या का आहे ?

हिब या रोगाने सार्वजनिक आरोग्याच्या समस्येचे रुप धारण केले आहे. कारण या जिवाणूमुळे न्युमोनिया (बालकांचा मृत्यू होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक) आणि मेनिंजायटिस यासहित अन्य गंभीर प्रकारचे रोग उद्ववतात, ज्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते अथवा रुग्णाचा मृत्यू संभवतो.

हिबचा संसर्ग कसा होवू शकतो, पसरु शकतो ?

हिबचा जिवाणू संसर्ग झालेल्या बालकाच्या खोकल्यातून अथवा शिंकेतून उडालेल्या लाळेच्या थेंबाद्वारे एका बालकाकडून दुसऱ्या बालकाकडे संक्रमित होतो. तसेच बालके जेव्हा तोंडात घातलेली खेळणी आणि अन्य वस्तू एकमेकांना देतात तेव्हा देखील हिबचा प्रसार होतो.

हिबचा संसर्ग कोणाला होऊ शकतो? कोणत्या प्रकारच्या बालकांना संसर्गापासून सर्वाधिक धोका आहे ?

बहुतांशी पाच वर्षे वयोगटाखालील बालकांना हिबच्या संसर्गापासून धोका आहे. त्यातही चार महिने ते अठरा महिने वयोगटातील बालकांना या संसर्गापासून सर्वाधिक धोका असतो. पाच वर्षांपर्यंत पोहोचता पोहोचता बऱ्याचशा बालकांच्या शरीरामध्ये रोगांना प्रतिबंध करणारी प्रतिद्रव्य (अँटीबॉडीज) विकसित होतात. परिणामी मोठ्या वयाच्या बालकांना आणि प्रौढ व्यक्तींना हिबपासून होणारे गंभीर रोग सहसा होत नाहीत.

हिबचा संसर्ग झाल्यास प्रतिजैविके प्रभावी ठरतात का?

हिबचा झाल्यास उपचार योजनेमध्ये प्रतिजैविकांचा वापर करण्यात येतो. परंतू ती नेहमीच परिणामकारक ठरत नाहीत. प्रतिजैविके तसेच सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळूनही मेनिंजायटिस झालेल्या रुग्णांपैकी 3 टक्के ते 5 टक्के रुग्ण दगावतात. आता हिब रोगाच्या काही जिवाणूंमध्ये प्रतिजैविकांचा मुकाबला करण्याची क्षमता विकसित झाली असल्याने उपचार योजना अधिक अवघड झाली आहे.

हिबपासून होणारे संसर्ग कसे थोपवता येऊ शकतात ?


हिबपासून होणारे बरेचसे संसर्ग केवळ हिबच्या लसीद्वारे थोपवता येऊ शकतात. ज्या बालकांना संसर्ग झाला आहे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना प्रतिजैविक देऊन होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. परंतू अशा घटना केवळ 1 ते 2 टक्के इतक्याच आहेत.

हिबच्या लसीच्या मर्यादा काय आहेत?

हिबची लस केवळ हिबच्या जिवाणूंमुळे उद्भवणाऱ्या रोगांपासून रक्षण करते. हिबची लस टोचल्यानंतरही बालकाला न्युमोनिया, मेनिंजायटिस अथवा फ्लू यासारखे अन्य जिवाणू आणि विषाणूंमुळे होणारे रोग होऊ शकतात.

हिबच्या लसीने कोणाला संरक्षित केले पाहिजे ?


सर्वसामान्यपणे 1 वर्षापर्यंतच्या (6 आठवड्यानंतर आणि 1 वर्षाच्या आत) सर्व बालकांना नियमित लसीकरणाचा भाग म्हणून हिबची लस टोचण्यात यावी.

हिबच्या लसीचे किती डोस आवश्यक आहेत ? ते कधी दिले पाहिजेत ?

हिबच्या लसीचे तीन डोस दिले जातात. बालक सहा आठवड्यांचे झाल्यावर पहिला डोस पेंटाव्हॅलंट लसीच्या स्वरुपात दिला जातो. दुसरा आणि तिसरा डोस हे देखील पेंटाव्हॅलंट लसीच्या स्वरुपात बालक अनुक्रमे 10 आणि 14 आठवड्यांचे झाल्यावर दिले जातात. युआयपीच्याअंतर्गत बूस्टर डोसची शिफारस करण्यात आलेली नाही.

हिबची लस स्वतंत्रपणे न देता पेंटाव्हॅलंट लसीच्या स्वरुपात का दिली जाते ?

डीपीटी, हेपिटायटिस बी आणि हिब या तिन्हीच्या लसींचे वेळापत्रक 6, 10 आणि 14 आठवड्यांचे म्हणजेच एकसारखे आहे. परिणामी, या तिन्ही लसी स्वतंत्रपणे दिल्या गेल्या तर बालकाला एकाचवेळी तीनदा सुया टोचाव्या लागतील. पेंटाव्हॅलंट लस देण्यात आल्याने सुई वारंवार टोचावी लागत नाही.

10 महिन्यांपर्यंत कोणतीही लस टोचण्यात आलेली नाही, अशा बालकाला कोणत्या लसी देण्यात येऊ शकतात ?


अशा बालकाला ओपीव्हीचे थेंब आणि ‘अ’ जीवनसत्वाच्या सिरपबरोबर बीसीजी, गोवर आणि पेंटाव्हॅलंट लसीचा पहिला डोस दिला गेला पाहिजे. पेंटाव्हॅलंट लस 6 आठवड्यापेक्षा अधिक ते 1 वर्षाच्या आतील वयाच्या कोणत्याही बालकाला दिली जाऊ शकते.
वयाने एक वर्ष पूर्ण झालेल्या परंतू तोपर्यंत कोणतीही लस देण्यात आलेली नसलेल्या बालकाला कोणत्या लसी दिल्या जाऊ शकतात?
अशा बालकाला चार आठवड्यांच्या अंतराने डीपीटीचे आणि ओपीव्हीचे तीन डोस गोवर- 1 लस आणि ‘अ’ जीवनसत्वाचे सिरप देण्यात यावेत. त्यानंतर एक वर्षाने डीपीटी, ओपीव्हीचा बूस्टर डोस द्यावा.
पेंटाव्हॅलंट लसीचे दुष्परिणाम कोणते ?
सर्वसाधारणपणे, पेंटाव्हॅलंट लस दिल्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, तथापि शरीरावर ज्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात आले आहे तेथे लालसरपणा व सूज येऊ शकते आणि वेदना होऊ शकतात. सामान्यतः ही लक्षणे इंजेक्शन दिल्यावर दुसऱ्या दिवशी दिसून येतात आणि ती एक ते तीन दिवस टिकतात. काही तुरळक बालकांमध्ये लसीकरणानंतर थोडा काळ ताप आल्याचे आढळून येते.
बालकाला पेंटाव्हॅलंट लस न टोचण्याचे काही खास कारण असू शकते का ?
पेंटाव्हॅलंट लसीचे गंभीर दुष्परिणाम क्वचितच दिसून येतात. तथापि ज्या बालकांमध्ये पेंटाव्हॅलंट लस टोचल्यावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यांना या लसीचा दुसरा डोस देण्यात येऊ नये.
पेंटाव्हॅलंट लसीचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत ?

पेंटाव्हॅलंट लस द्रवरुपात आणि पावडरच्या स्वरुपात उपलब्ध आहे. तथापि भारतामध्ये युआयपीच्याअंतर्गत ही लस केवळ द्रवरुपातच उपलब्ध आहे.

पेंटाव्हॅलंट लसीचा वापर, अपव्यय आणि लसीकरणाची व्याप्ती यांचे सनियंत्रण करणे गरजेचे आहे का ?

कोणत्‍या प्रकारच्‍या नोंदी ठेवणे आवश्‍यक आहे ?


पेंटाव्‍हॅलंट लसीचा वापर, अपव्‍यय आणि व्‍याप्‍ती यांच्‍या संनियंत्रणामुळे लसीकरणाची लक्षणे किती प्रमाणात गाठण्‍यात आली आहेत, पेंटाव्‍हॅलंट लस किती प्रभावीपणे वापरण्‍यात आली आहे, याबाबतची माहिती मिळते. म्‍हणून युआयपीअंतर्गत कोणत्‍याही लसीच्‍या नोंदी जशा ठेवल्‍या जातात तशाच पेंटाव्‍हॅलंट लसीच्‍या नोंदी योग्‍यरित्‍या ठेवल्‍या गेल्‍या पाहिजेत, अशा सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.
बालकाच्‍या माता-पित्‍यांनी, पालकांनी आरोग्‍यसेविका अथवा आशा कार्यकर्तीशी अथवा जवळच्‍या शासकीय रुग्‍णालयाशी संपर्क साधावा. आपले ‘माता व बालक सुरक्षा कार्ड’ नेहमी आपल्‍याजवळ बाळगा. ही लस सर्व शासकीय रुग्‍णालयात मोफत उपलब्‍ध आहे. आपल्‍या बालकांचे घातक रोगांपासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरणाची कास धरायला हवी.

लेखक - राजेंद्र सरग
जिल्‍हा माहिती अधिकारी, अहमदनगर.

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate