तंत्रिका (मज्जातंतू) ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अकस्मात होणारा उत्सर्ग हे आक्षेपाचे मूळ कारण असते. कित्येक लहान मुलांना फार थोड्या कारणाने सुद्धा आक्षेप येतात. हीव येऊन ताप भरण्याऐवजी किंवा जंतांमुळेही त्यांना आक्षेप येतात, त्यालाच आकडी असे म्हणतात [→ आकडी].
कित्येक कुटुंबांत आक्षेप येण्याची प्रवृत्ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेली असते. त्या प्रकाराला अपस्मार असे म्हणतात. त्या प्रकारात बेशुद्धी हमखास असते. वर लिहिलेल्या लक्षणांशिवाय न कळत मूत्रोत्सर्गही अपस्मारात होतो; त्यालाच फेपरे किंवा घुरे असे म्हणतात. या प्रकारचे निश्चित कारण अजून समजलेले नाही; मेंदूमध्ये विशिष्ट विकृती सापडत नाही पण विद्युत् मस्तिष्कालेखात [विशिष्ट उपकरणाने काढलेल्या मेंदूतील विद्युत् क्रियेच्या आलेखात, → विद्युत् मस्तिष्कालेखन] मात्र फरक दिसून येतो.
वृक्क (मूत्रपिंड) रोगांतील मूत्रविषरक्तता (सामान्यतः मूत्राद्वारे बाहेर टाकली जाणारी द्रव्ये रक्तातच राहिल्यामुळे निर्माण होणारी अवस्था), गर्भिणी विषबाधा, अलर्क रोग (पिसाळ रोग), कुचल्याच्या बियांमुळे होणारी विषबाधा आणि मेंदूमध्ये दाब वाढविणारी अर्बुदे (पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी गाठी), शोथ (दाहयुक्त सूज), शोफ (सूज) वगैरे रोगांतही आक्षेप येतात. त्या त्या रोगांच्या लक्षणांवरून व पूर्ववृत्तावरून निदान होऊ शकते. विद्युत् मस्तिष्कालेखाचीही निदानास मदत होते.आक्षेपाची चिकित्सा मूळ रोगावर अवलंबून असल्यामुळे मूळ रोगाचे निदान करणे हे फार महत्त्वाचे आहे.
आक्षेप किंवा झटका आला असता तोल जाऊन पडल्यामुळे रोग्याला इजा होण्याचा संभव असतो; तसेच जीभ चावली जाणे, श्वास मार्गात अडथळा उत्पन्न होणे वगैरे गोष्टींपासून अपाय होऊ न देणे ही गोष्ट फार अगत्याची असते.
ढमढेरे, वा. रा.
याला आक्षेपक किंवा अपतंत्रक म्हणतात. याला लंघन, रेचक इ. शरीर क्षीण करणारे उपचार करू नयेत.अपवाद, जेव्हा वातकफाने श्वासोच्छ्वासाला त्रास होईल तेव्हा मात्र तीक्ष्ण औषधे नाकात फुंकून रेचक द्यावे; त्याने शिंका येऊन कफ निघून जाऊन श्वासोच्छ्वास विनासायास होऊ लागेल; चिरफळ, पुष्करमूळ, हिंग, अम्लबेरूस, हिरडा तसेच सैंधव, पादेलोण व काळे मीठ ही तिन्ही मिठे जवाच्या काढ्याबरोबर पाजावी; हिरडा, पादेलोण, दूध यांनी सिद्ध तूप पाजावे. वातकफनाशक सर्व चिकित्सा करावी.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
आक्षेपी विकार, पशूंतील : या रोगाचे सर्व प्रकार पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा व मांजर यांत विशेष आढळतात. तर इतर प्राण्यांत क्वचित आढळतात. शेळी, डुकरीण, कुत्री व क्वचित व्यालेल्या गाई-म्हशीत स्तनामध्ये किंवा गर्भाशयामध्ये क्षोभ झाल्यामुळेही आचके येतात. लहान वासरात दात येताना तसेच हिरड्यांमध्ये शोथ होतानाही हा प्रकार संभवतो. ह्यात झटके येतात पण त्याचा मेंदूच्या विकाराशी संबंध नसतो. तसेच अपस्मार किंवा फेपरे ह्या रोगाप्रमाणे तो आनुवंशिकही नसतो. लहान वयात होणारा व गरोदरपणी होणारा असे त्याचे दोन प्रकार प्रामुख्याने कल्पिले जातात.
आचके दुसऱ्या एखाद्या रोगाचे लक्षण असते. पुष्कळ वेळा मेंदू किंवा मेरुरज्जू यांच्या कार्यामधील विकृतीमुळे हे आढळतात.कधीकधी हे विशेषेकरून कुत्र्याच्या लहान पिलात परजीवींमुळे (दुसऱ्यांच्या जीवावर उपजीविका करणाऱ्या सजीवांमुळे) आंत्रात(आतड्यात) होणाऱ्या अखंड क्षोभामुळे सुरू झालेले असले तरी गंभीर स्वरूपाचे नसतात; पण विषाणूंमुळे (व्हायरसांमुळे) होणाऱ्या रोगांत विशेष गंभीर स्वरूपाचे असतात.
कुत्र्यांमध्ये जठरात कठीण असे बाह्य पदार्थ असणे, अलर्क रोग, नृत्यवात रोग (एखाद्या अवयवाला तालबद्ध झटके येणारा रोग),पचन तंत्रातील परजीवी, निरनिराळी विषे शरीरात शोषली गेल्यामुळे होणारे तीव्र अपचन, घशाच्या मागील भागात हाडाचा तुकडा अडकणे तसेच विशेष ताण पडण्यामुळे होणारा तीव्र संक्षोभ अशा अवस्थांमध्ये आक्षेपी विकार उदभवतात.
गद्रे, य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/29/2020
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...
ब-याच लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे य...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्...