वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब मूत्रोत्सर्ग होणे, मूत्रमार्गाची आग होणे या लक्षणांच्या समुच्चयाला उन्हाळे लागणे असे म्हणतात.
मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांचे अंगग्राही (स्नायूचे कठीण व तीव्र) आकुंचन झाल्यामुळे ही लक्षणे होतात. मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) झाल्यास, अथवा अश्मरी (मूतखडा), जंतुसंसर्ग विशेषतः पूयप्रमेह (परमा) वगैरे कारणांनी उन्हाळे लागतात. अष्ठीलाशोथ (मूत्राशयाच्या खाली व मूत्रमार्गाला वेढणाऱ्या ग्रंथीचा शोथ) आणि विद्रधी (पूयुक्त फोड) झाल्यामुळे मूत्रोत्सर्गास अडथळा उत्पन्न झाल्यानेही अशीच लक्षणे दिसतात. उष्ण प्रदेशात घाम जास्त गेल्याने व त्यामानाने पाणी घेण्यात न आल्यामुळे मूत्र अधिक अम्लीय झाल्यानेही उन्हाळे लागतात, त्यामध्ये शोथाचा संबंध नसतो.
या रोगात मूत्र फार अम्लीय असून त्याचा रंग लालसर असतो, काही वेळा मूत्रात रक्तही असते. जंतुसंसर्गामुळे उन्हाळे लागल्यास मूत्रात पूही आढळतो. सूक्ष्मदर्शकाने मूत्रपरीक्षा केली असता रक्त आणि पू - कोशिका (पुवाचे सूक्ष्म घटक) दिसतात.
मूळ कारण शोधून काढून त्यावर योग्य ते उपचार करावे लागतात. पाणी, साळीच्या लाह्यांचे पाणी आणि लिंबाचे सरबत दिल्याने मूत्राचे प्रमाण वाढून त्याची अम्लता कमी झाल्यामुळे लक्षणांचा जोर कमी होतो. मूत्रातील अम्लता कमी करण्यासाठी सोड्यासारखे क्षारीय (अल्कलाइन) पदार्थ दिले असता उन्हाळे लागण्याचा त्रास कमी होतो. जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वापरावी लागतात.
लेखक : वा. रा. ढमढेरे
लेखक : वेणीमाधवशास्त्री जोशी
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/19/2020
उन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी...
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...
शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस...
हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. याचा संसर्ग मुला...