कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत असतो. कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात. बाहेरचा भाग फक्त ध्वनिलहरी-(आवाजाची कंपने) गोळा करून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचवतो.
बाह्यकर्णाची रचना नरसाळयासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग मऊ राहतो.
मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. तिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो. दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो. मध्यकर्णाची पोकळी एका नळीने (कानाघ नळी) नाकाला जोडलेली असते. या नळीमुळे मध्यकर्णातील हवा बाहेरच्या हवेशी जोडली जाऊन सम दाबात राहते. यामुळे कानाचा पडदा सुरक्षित राहतो. असे नसते तर कानाचा पडदा कमीजास्त दाबाबरोबर आत किंवा बाहेर फुगला असता. सर्दी झाली, की या नळयांची तोंडे सुजून बंद होतात;यामुळे मध्यकर्णात विचित्र संवेदना होते. कधी कान गच्च झाला आहे असे वाटते; तर कधी कानाला दडे बसल्यासारखे वाटते.
सर्दीपडशात नाकातील घाण मध्यकर्णात जाऊन मध्यकर्णाचा दाह सुरू होतो. यामुळे कान ठणकून कधीकधी फुटतो. मध्यकर्णात तीन लहानलहान हाडांची साखळी असते ही साखळी एका बाजूने कानाच्या पडद्याशी लागते तर दुस-या बाजूने अंतर्कर्णाच्या शंखाला जोडलेली असते. या साखळीचे काम म्हणजे ध्वनिकंपनांनी होणारी पडद्याची हालचाल अंतर्कर्णाच्या शंखापर्यंत नेणे. कान वारंवार फुटत असेल तर ही साखळी जंतुदोषाने खराब होऊन ऐकू येत नाही. मध्यकर्णात पू झाला, की कान ठणकतो. मात्र पडदा फुटून पू बाहेर पडला, की ठणका थांबतो.
अंतर्कर्ण म्हणजे हाडाच्या पोकळीत बसवलेला गाभारा किंवा एक नाजूक शंख. त्या शंखाचे मुख्य काम म्हणजे ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंतर्फे मेंदूपर्यंत पोचवणे. याला तीन अर्धवर्तुळाकार नळया जोडलेल्या असतात. त्यांना एकत्र जोडणारा छोटा फुग्यासारखा भाग असतो. या शंख व नळया तोल-स्थिती-गती यांच्याबद्दल मेंदूकडे संदेश पाठवतात. ध्वनिलहरी व स्थिती-गती ज्ञान कसे होते हे आपण अगदी थोडक्यात पाहू या.
शंखाकृती ध्वनिशंखात एक द्रव भरलेला असतो. त्याच्या कोषात हारमोनियमच्या (बाजाची पेटी) पटटयांसारखी रचना असलेला एक पडदा बसवलेला असतो. ध्वनिकंपने हाडाच्या साखळीमार्फत ध्वनिशंखामध्ये पोचतात. या ध्वनिकंपनांमुळे ध्वनिशंखातल्या द्रवाची हालचाल होते. त्यामुळे ध्वनिविशिष्ट पेशींचेही कंपन होते. यानुसार पेशींना जोडलेल्या मज्जातंतूंमार्फत ध्वनिसंदेश मेंदूत पोचवले जातात. हा ध्वनिशंख मज्जातंतू आणि मेंदूतले ध्वनिकेंद्र यामुळे ध्वनिज्ञान होते. मध्यकर्णाच्या दीर्घकालीन आजारात (जंतुदोष) कानाचा पडदा आणि हाडांची साखळी खराब होतात. यामुळे मध्यकर्णामार्फत आवाज ऐकू येणे बंद होते. पण कवटीच्या हाडांवर कंपने आदळून हा आवाज हाडामार्फत ध्वनिशंखात पोचू शकतो. यामुळे काही प्रमाणात तरी ध्वनिज्ञान शाबूत राहते. या तत्त्वाचा उपयोग करून फक्त मध्यकर्ण बिघडलेल्या व्यक्तीस हाडामार्फत थोडे ध्वनिज्ञान मिळवता येईल. पण ध्वनिशंख व पुढली यंत्रणा नष्ट झाली तर त्या कानास ठार बहिरेपणा येईल.
अंतकर्णाचे दुसरे काम म्हणजे गतिस्थिती ज्ञान. शरीराच्या गती-स्थितीचे ज्ञान अनेक मार्गांनी (स्नायू, सांधे, दृष्टीज्ञान आणि अंतर्कर्णातील व्यवस्था) होत असते. अंतकर्णाचेयंत्रणा त्यापैकीच एक आहे. ही यंत्रणा म्हणजे तीन अर्धवर्तुळाकार नळया व त्यांना एकत्र जोडणारा लहानसा फुगा असतो. या सर्व भागात द्रवपदार्थ असतो. नळयांमध्ये खास संवेदनाक्षम पेशी असतात. या पेशींच्या थरावर पातळ पण वजनदार कणांचा एक थर असतो. द्रवपदार्थ आणि हा पातळ वजनदार थर यांच्या हालचालींचे संदेश मज्जातंतूंमार्फत मेंदूत पोचतात. ही सूक्ष्म हालचाल होते याचे कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण. डोक्याच्या स्थितीप्रमाणे (आडवे, उभे, तिरपे, उलटे) आणि गतीप्रमाणे (पुढे, मागे, वर्तुळाकार गती) द्रवपदार्थ व वजनदार थराची हालचाल होत राहते. याचे मेंदूत संदेश पोचतात. या यंत्रणेत बिघाड झाला तर तोल सांभाळता येत नाही. कानाच्या काही आजारांमध्ये या यंत्रणेपर्यंत आजार पोचला तरीही तोल सांभाळण्याचे काम बिघडते.
केवळ मध्यकर्ण बिघडला आहे की ध्वनिशंखही बिघडला आहे हे साध्या तपासणीत कळू शकते. यासाठी चिमटयासारखे एक खास लोखंडी उपकरण असते. (याला ध्वनिचिमटा किंवा ध्वनिकाटा म्हणू या) या ध्वनिकाटयाचा वापर करून एक
दा कानासमोर व एकदा कानामागच्या हाडावर आळीपाळीने टेकवा. ध्वनिकाटा टेकवल्यावर 'ऐकू' येते का ते
पुढीलप्रमाणे तपासता येते. (निर्दोष) कान चांगला असल्यास कानासमोर काटा धरण्यापेक्षा हाडावर टेकवल्यावर जास्त चांगला आणि जास्त वेळ आवाज ऐकू येतो. मात्र मध्यकर्ण बिघडल्यास ध्वनिकाटयाने कानासमोर काही ऐकू येत नाही, पण हाडांवरून ऐकू येते. ध्वनिशंखही बिघडला असल्यास कोठूनच ऐकू येत नाही. ही तपासणी करायला तुम्हीही शिकू शकाल.
स्त्रोत: आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...