खाज सुटली की नखाने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. खाजवले की त्या जागी दाह होतो आणि मग पुन्हा खाज. पेशींना रक्तपुरवठा नीट झाला नाही की खाज सुटते. रक्तपुरवठा सुरळीत झाला की खाज थांबते. काही वेळा मात्र मानसिक प्रक्रियेमुळेही खाज सुटत राहते.
नखासारख्या टणक अथवा अणकुचिदार किंवा टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारी संवेदना म्हणजे खाज. त्वचेत पसरलेल्या मोकळ्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून ही संवेदना निर्माण होते. शरीराच्या काही भागातील त्वचेतून अशी संवेदना अधिक सहजतेने निर्माण होते. बाह्य कर्णातील बोगद्यासारखा भाग, जननेंद्रियांवरील त्वचा, गुदद्वारासमीपची आणि नाकपुड्यांच्या शेजारची त्वचा, ही काही उदाहरणे आहेत. काही रासायनिक रेणू, काही विद्युत चेतना यांनी या मोकळ्या ज्ञानतंतूंची टोके चेतवली जाऊ शकतात. अशी चेतावणी शरीराच्या बाहेरून किंवा आतून मिळू शकते. या चेतावणीचा परिणाम जवळच्या त्वचेच्या किंवा रक्तवाहिन्यांच्या पेशीवर जेव्हा होतो तेव्हा दाह होतो.
परिणामी, ज्ञानतंतूंना होणारी चेतावणी थांबली तरीसुद्धा कंड सुटण्याची प्रवृत्ती काही काळ चालूच राहते. अशा वेळी हलका दाब देणे किंवा दाबापासून त्वचा मुक्त करणे, अशा चेतनांनीदेखील खूप खाज सुटते. येथे जोरात खाजवण्याने पुन्हा तेथील पेशी, मोकळी ज्ञानतंतूंची टोके यात दाह निर्माण होतो. दाहामुळे खाज आणि खाजेमुळे पुन्हा दाह, असे एक दुष्टचक्र निर्माण होते. पुन्हा पुन्हा खाजवण्यामुळे त्वचेच्या वरच्या आच्छादनातील पेशींची संख्या आणि आकार वाढतो. त्वचा जाड होते. तेथे काळा रंग येतो. अशा त्वचेवर खाज सुटू लागली की ती संवेदना बराच काळ टिकते. खाजेची संवेदना ज्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून निर्माण होते, तेथील संवेदनक्षमता उष्णतेने वाढते. त्या ज्ञानतंतूंच्या टोकाच्या जवळ असणाऱ्या सूक्ष्म केशवाहिन्या विस्तारित होण्याने अशी उष्णता वाढते. हा भाग थंड केला तर खाज शमते. एपिनेफ्रिन (ऍड्रिनलिन) या स्रावामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्यामुळे एपिनेफ्रिन आणि एफेड्रिन अशा रासायनिक रेणूंच्या परिणामांमुळे कंड शमते. उलटपक्षी त्वचेत फोड आले किंवा जखम भरत आली की होणाऱ्या दाहामुळे आणि दाबामुळे कंड सुटते. असा दाह कमी करण्याच्या प्रयत्नांनी (कॉर्टिसोनसारख्या औषधांनी) खाज शमते.
पेशींना प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न झाल्याने (नीलांमध्ये रक्त साचून राहणे, व्हेरीकोझ व्हेन्स) खाज सुटू लागते व रक्तप्रवाह सुरळीत झाल्यावर ही खाज थांबते. कोवळ्या सूर्यकिरणात असणारे अल्ट्राव्हायोलेट किरण, क्ष-किरण अथवा त्वचा बधिर करणारी द्रव्ये यांच्या वापरामुळे काही काळापुरती खाज थांबते. अशी तात्पुरती खाज थांबण्यानेसुद्धा खांजविणे, दाह होणे, खाज सुटणे हे दुष्टचक्र बंद होऊ शकते. कंड सुटणे ही एक संवेदना आहे. सर्व संवेदना अखेर मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागातून निओकॉर्टेक्सकडे नेल्या जातात. माणसात या मेंदूच्या भागावर भावना आणि विचार यांचा मोठा परिणाम होणे स्वाभाविक आहे. काही मानसिक प्रक्रियांमुळेदेखील त्रासदायक खाज सुटत राहते. हिस्टॅमिन या रेणूच्या प्रभावाने अनेक ठिकाणी खाज सुटण्याची संवेदना निर्माण होते. तथापि, गर्भवती स्त्रिया, मधुमेही रुग्ण, यकृताच्या विकाराचे रुग्ण, काही प्रकारच्या कॅन्सरसदृश आजारांत हिस्टॅमिनच्या रेणूचा प्रभाव असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही. अनेक वेळा हिस्टॅमिन या रेणूचे कार्य रोखणाऱ्या अँटिव्हिस्टॅमिन रेणूंचा फायदा होतो हे खरे आहे, तथापि खाज सुटताना तेथे उमटलेली त्वचेवरची लालसर रंगाची सूज (गांधी उठणे) अँटिव्हिस्टॅमिन औषधांनी लगेच कमी होत नाही. शिवाय प्रत्येक वेळी ही औषधे परिणामकारकरीत्या खाज शमवतीलच, याची खात्री देता येत नाही.
त्वचेच्या वरच्या स्तरातील पेशींतून स्रवले जाणारे काही रेणूदेखील कंड सुटण्याची संवेदना निर्माण करू शकतात. माणसात या रेणूंचे महत्त्व शास्त्राने सिद्ध झालेले आहे. पुढील रासायनिक रेणू एकट्याने अथवा दोन किंवा अधिक रेणू एकत्र येण्याने त्वचेतील ज्ञानतंतूंची मोकळी टोके चेतावली जातात :
कंड सुटण्याचा प्रश्न आणि इम्युनिटी हा प्रतिकारशक्तीचा एक भाग यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्वचेच्या काही आजारांत कंड सुटत नाही. हा मुद्दा विद्वानांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. उपदंश (सिफिलिस) या विकारात विविध प्रकारे त्वचेवर चट्टे पडतात, त्वचेत क्षय रोगाचे जंतू जाऊन तेथे आजार होतो आणि महारोगात त्वचेवर चट्टे येतात; परंतु या तीनही आजारांत कंड सुटत नाही. काही विकारांत खाज सुटत नाही, हेदेखील ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. गर्भावस्थेतील घटनांमुळे जे दोष निर्माण होतात किंवा ज्या आजारात पेशींची झीज होते, कॅन्सर नसणाऱ्या गाठी, तसेच कॅन्सरमुळे झालेली गाठ, त्वचेवर विषाणूंमुळे झालेले आजार, उपरिनिर्दिष्ट त्वचेचा क्षयरोग, उपदंश (सिफिलिस) अथवा महारोगाचे चट्टे, घाम स्रवणाऱ्या ग्रंथींचे, केसांच्या मुळांचे आणि नखांचे आजार, यात खाज सुटत नाही.
खाज सुटणाऱ्या विकारात एक महत्त्वाचे कारण म्हणजे घामोळे येणे हे होय. उष्णता असणे आणि घाम सुटण्यास अटकाव येणे, या दोन्ही घटना एकाच वेळी होण्याने घामोळे येते. अर्भकांत हे विशेष होते. भाग गार केल्याने ते शमते. त्वचेतील रक्तवाहिन्यांवर ऍलर्जीचा परिणाम झाला तर "गांधी‘ उठतात. कधी कधी खाज सुटत राहण्याचे मुख्य कारण मानसिक असू शकते. असा प्रकार तरुण स्त्रियांत विशेष करून आढळतो. अशा व्यक्तींना उष्णतेमुळेसुद्धा ऍलर्जी येते. खाज सुटण्यास कारणीभूत असणाऱ्या विकारांत मधुमेह, यकृताचे विकार, काही प्रकारचे कॅन्सर आणि मूत्रपिंडांचे अकार्यक्षम होणे, ही महत्त्वाची कारणे आहेत. त्वचेचे आजार- विशेषतः खरूज कोणत्याही वयात होऊ शकते.
लेखक : डॉ. ह. वि. सरदेसाई
स्त्रोत : सकाळ
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...