या विकाराचे कारण म्हणजे वाहनाची अनियमित व असंबद्ध गती हे होय. प्रत्येक व्यक्तीला हा विकार प्रकृतिमानाप्रमाणे कमीजास्त प्रमाणात होतो. वरचेवर त्याच त्याच वाहनाचा प्रवास घडल्यास सवयीने हळूहळू या विकाराचा त्रास कमी होतो.
गतिजन्य विकारात शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते. त्यामुळे घेरी येऊन उलट्या होतात. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कर्णेंद्रियातील अंतर्कर्णातील कर्णकुहराच्या ( कानातील पोकळ्या एकमेकींना जोडणाऱ्या यंत्रणेच्या) अर्धवर्तुळाकार नलिका व त्या नलिकांच्या अभिस्तीर्ण (फुगवटा असलेल्या) टोकाशी असलेल्या गोणिका (कानातील हाडाच्या पोकळीतील पिशव्या) या ठिकाणी असलेल्या तंत्रिकाग्राहकांमुळे (मज्जातंतूतील संवेदनाग्राहक पेशींमुळे) होते.या नलिकांमध्ये द्रव पदार्थ भरलेला असून त्यामधील ग्राहककोशिका (ग्राहक पेशी) असलेल्या भागाला ‘रंजिका’ असे नाव आहे.
या ठिकाणच्या द्रवामध्ये सूक्ष्म असे वाळूसारखे स्फटिकमय कण असतात. डोक्याच्या हालचालीमुळे द्रव आणि हे कण हालतात, त्यामुळे तेथील तंत्रिकाग्राहके उद्दीपित होऊन संवेदना उत्पन्न होते. ही संवेदना श्रवणतंत्रिकामार्गाने निमस्तिष्कात (लहान मेंदूत) पोहोचते . तेथे शरीराची अंगस्थिती (तोल सांभाळण्याच्या दृष्टीने असणारी शरीराची अवस्था) सांभाळणारे तंत्रिकाकेंद्र असून त्या केंद्रामुळे अंगस्थितीचे नियंत्रण होत असते.
डोक्याची हालचाल असंबद्ध आणि अनियमित झाली, तर ग्राहकामध्ये उत्पन्न होणाऱ्या संवेदना फार वेगाने निमस्तिष्कात जातात व त्यांचे पृथ:करण आणि त्यामुळे होणारे नियंत्रण नीट होत नाही, म्हणून शरीराचा तोल जातो. हालचालींमुळे उत्पन्न होणाऱ्या संवेदना शरीरातील इतर भागातूनही निमस्तिष्काकडे जाऊन त्यामुळेही तोलनियंत्रण होते. उदा., दृष्टिसंवेदना, हातपाय वगैरे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या हालचालीमुळेही असाच परिणाम होतो. डोळे मिटून चालल्यास तोल जातो. गोलगोल फिरल्यानंतर, नाचताना अथवा नाच बघत असतानाही असंबद्ध हालचालीमुळे तोल जातो. विशेष परिश्रम केल्यासच तोल सांभाळणे शक्य होते.
अर्धवर्तुळाकार नलिका फक्त कोनीय प्रवेग-प्रतिप्रवेगामुळेच (वेग वाढणे आणि कमी होणे) चेतविल्या जातात, तर सरळ रेषेतील प्रवेग-प्रतिप्रवेगामुळे व डोक्याच्या सरळ हालचालीमुळे गोणिकांतील रंजिकामधील स्फटिकमय कणांच्या हालचालीमुळे तेथील गुरुत्वग्राही (गुरुत्वाकर्षणाची संवेदना असलेल्या) ग्राहकात संवेदना उत्पन्न होतात. गतिजन्य विकारात मुख्यत: याच ग्राहकामुळे लक्षणे उत्पन्न होतात, त्या मानाने अर्धवर्तुळाकार नलिकांतील ग्राहकांमुळे ती कमी प्रमाणात असतात.
प्राचीन काळी वाहनांचा वेग कमी असल्यामुळे कर्णकुहर चेतविले जात नसे. आधुनिक वेगवान वाहनांमुळे आणि त्यांच्या गतीमध्ये प्रवेग व प्रतिप्रवेग यांमध्ये वरचेवर होणाऱ्या बदलांमुळे कर्णकुहर अधिक प्रमाणात चेतविले जाते. प्राचीन काळी हा प्रकार मुख्यत: समुद्रप्रवासात होई म्हणून त्याला ‘सागरी विकार’ असे नाव पडले.
लहान बोटी समुद्राच्या लाटांबरोबर हेलकावे खातात. त्यांतील मुख्य हालचाल वरखाली अशी असली, तरी बोट उजव्याडाव्या बाजूंसही कलते. काही लहान लाटांनंतर एखादी मोठी लाट आली तर बोटीचे हेलकावे अनियमित आणि असंबद्ध होतात. बोटीतील सर्व वस्तू हालतात. त्यामुळे एका जागी स्वस्थ बसणे अथवा फिरणे दुरापास्त होते. सर्व ऊतारूंना त्याचा सारखाच त्रास होतो असे नाही.
बोटीच्या प्रवासात तोल जाण्याचा संभव सर्वांत अधिक असतो. हल्ली मोठाल्या बोटी बांधताना हेलकावेप्रतिबंधक उपाय योजतात परंतु समुद्र फार खवळल्यास ह्या बोटीही हालतात. वयोमानाप्रमाणे त्रास कमीजास्त होतो. अर्भकात तोल-नियंत्रण तंत्राची पूर्ण वाढ झालेली नसते त्यामुळे तोल जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उतारवयात तंत्रिका-दुर्बलतेमुळे संवेदनावहन कमी होते म्हणून वृद्धांना हा त्रास कमी प्रमाणात होतो.
काही हळव्या प्रवृत्तीच्या लोकांना त्रास जास्त होतो; तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वीची काळजी, त्रासांची ऐकीव माहिती व हळवी मन:स्थिती यांमुळे बोटीत चढल्यापासूनच त्रास सुरू होतो. अन्नाचा अथवा डीझेल तेलाचा वास, बोटीवरच्या खोलीतील कोंदट हवा आणि सहप्रवाशांना होणारा त्रास बघूनही हा विकार होतो.
सुरुवातीस अस्वस्थ वाटणे, पोटात कालवाकालव होणे, तोंडाला पाणी सुटणे, जांभया येणे, अनियमित श्वासोच्छ्वास, पोटात गुबारा धरणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे इ. लक्षणे दिसतात. पुढे मळमळ, कोरड्या ओकाऱ्या आणि वांत्या सुरू होतात. क्वचित शौचास होते. थोड्या उलट्या होऊन गेल्यावर काही लोकांना आराम वाटतो परंतु काहींना सारख्याच उलट्या होत राहिल्यामुळे अशक्तपणा वाढतो; पुढेपुढे तर उलटीतून पित्त पडते; अन्नावरची वासना उडते; डोके गरगरू लागून दुखते, फार थकवा येतो.
सारख्या उलट्या झाल्याने निर्जलीभवन (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे) होते आणि त्यामुळे डोळे खोल व निस्तेज होतात, चेहरा सुरकुतलेला व हिरवट छटा असलेला वाटतो. त्वचा थंडगार आणि ओलसर असते. जिभेवर पांढरा थर साठतो, श्वासोच्छ्वास जलद होतो, रक्तदाब कमी पडतो, मूत्राचे प्रमाण कमी होऊन त्यात अॅसिटोन आढळते. सुरुवातीस एकदोन वेळा शौचास झाल्यानंतर बद्धकोष्ठता येते.
प्रवास संपल्याबरोबर पुष्कळांना एकदम बरे वाटते. पण काही लोकांना डोकेदुखी, घेरी आणि उलट्या काही काळ चालू राहतात; एक झोप झाल्यावर आराम वाटतो. कितीही त्रास झाला तरी मृत्यूचा संभव क्वचितच असतो.
विमान हवेत चढताना व उतरताना गती त्वरित वाढते अथवा कमी होते.
त्यामुळे होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे त्रास होतो. विमान उंच जाऊन स्थिर झाल्यावर त्रास होत नाही. लहान विमाने फार उंच जात नाहीत. हवेचा दाब कमीजास्त झाल्यास विमान अस्थिर होते व त्यामुळे त्रास होतो.
आजाराची लक्षणे सुरू झाल्याबरोबर वर सांगितलेल्या प्रकारांची औषधे घ्यावी, ओकारी होईलसे वाटत असल्यास घशात बोटे घालून उलटी काढावी. स्वस्थ पडून राहून फक्त थंड पेये घ्यावी. दिवसातून तीन-चार वेळा विशिष्ट औषधाच्या गोळ्या घेण्यास हरकत नाही. झोप येत नसल्यास शायक (झोप आणणारे) औषध घ्यावे; त्यामुळे झोप लागून जागे झाल्यावर पुष्कळ बरे वाटते.
आधुनिक काळात विमान प्रवास, अंतराळ प्रवास वगैरे करणारांना हा विकार होऊ नये म्हणून आगाऊ काळजी घेणे जरूर असते. युद्धजन्य परिस्थितीत सैन्याची विमान व सागरी वाहतूक करतानाही गतिजन्य विकारांबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते. विमानचालक आणि अंतराळ प्रवासी यांना यासाठी खास शिक्षण घ्यावे लागते.
संदर्भ : 1. Best, C.H.; Taylor, N.B. The Physiological Basis of Medicine, Baltimore, 1961.
2. Hunter, D. Ed., Price's Textbook of the Practice of Medicine, London, 1959.
लेखक - चिं. वा. तळवलकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/8/2023
शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
उन्हाळे लागणे : वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब म...
रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन...