অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गलगंड

गळ्यात मध्यभागी असलेल्या अषटू ग्रंथीची कोणत्याही कारणाने वाढ झाल्यास त्या वाढीस गलगंड म्हणतात.

इ.स.पू. ३००० व्या वर्षात लिहिलेल्या एका चिनी लेखात गलगंडाचा प्रथम उल्लेख आढळतो. इ.स.पू. १५५० मधील पपायरस इबर्स या ईजिप्तमधील वैद्यकविषयक ग्रंथामध्ये गलगंडावरील उपाय लिहिलेले आहेत. १२७५ मध्ये सुप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो यांनी उझबेकिस्तानमधील फरगाना खोर्‍यातील रहिवाशांच्या गलगंडाचा उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकात पॅरासेल्सस यांनी स्वित्झर्लंडमध्ये आढळणारा गलगंड आणि अवटुजन्य जडवामनता (अवटू ग्रंथीच्या स्त्रावाच्या अभावामुळे बुद्धी व शरीर यांची वाढ खुंटणे) यांमधील संबंध दाखविला.

गलगंड मानेच्या पुढच्या भागात श्वासनालाच्या (मुख्य श्वासनलिकेच्या) दोन्ही बाजूंवर असतो. क्वचित्‌ अवटू ग्रंथीचा एखादा फाटा उरोस्थीपर्यंत (छातीच्या मध्यभागी असलेल्या चपट्या हाडापर्यंत) पसरला असल्यास तेथेही तो होऊ शकतो.

प्रकार

गलगंडाचे मुख्य चार प्रकार आहेत :

(१) साधारण अथवा यौवनारंभिक,(२) स्थानिक (३) गाठाळ आणि (४) अवटू-आधिक्यज (अवटु ग्रंथी जास्त क्रियाशील झाल्यामुळे होणारा).

  1. यौवनारंभ, गरोदरपणा, दुग्धस्रवणावस्था वगैरे वेळी अवटू ग्रंथीला अधिक काम पडते म्हणून त्यावेळी त्या ग्रंथीची वाढ झालेली आढळते. ती वेळ होऊन गेली म्हणजे अवटू ग्रंथीचे आकारमान पूर्ववत होते. या प्रकारात काही उपचार करण्याची जरूरी नसते.
  2. काही प्रदेशांत–विशेषतः उंच डोंगराळ भागांत–पाण्यात आयोडिनाचे प्रमाण फार कमी असते. समुद्रापासून जितके दूर जावे तितके पाण्यातील आयोडिनाचे प्रमाण कमी होत जाते. अशा प्रदेशात मिळेल तेवढ्या आयोडिनाचा उपयोग करून घेण्यासाठी अवटू ग्रंथीची वाढ होते. त्या प्रकाराला ‘स्थानिक गलगंड’ असे म्हणतात. हिमालयासारख्या उंच आणि समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात या प्रकारचा गलगंड दिसून येतो. अशा स्थानिक गलगंड असलेल्या प्रदेशात गरोदरपणी पुरेसे आयोडीन न मिळाल्यामुळे गर्भात अवटूदोष उत्पन्न होऊन बालकाची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. त्या प्रकाराला क्रेटिनिझम असे म्हणतात. या प्रदेशातील लोकांना मिठाबरोबर आयोडीन दिले, तर हा स्थानिक गलगंड नाहीसा होतो. असे मीठ आता उपलब्ध आहे. इतर स्वरूपातही आयोडीन देता येते. मोहरीच्या जातीच्या (ब्रासिका) भाज्या, कोबी आणि आयोडीन कमी असलेल्या प्रदेशातील गाईम्हशींचे दूध यांमुळेही स्थानिक गलगंड होऊ शकतो.
  3. स्थानिक गलगंड फार दिवस तसाच राहिला, तर त्यात गाठी उत्पन्न होतात. कधीकधी प्रथमपासूनच अवटू ग्रंथीत गाठीसारखी अर्बुदे (नव्या पेशींच्या वाढीमुळे निर्माण होणारे आणि शरीरक्रियेस निरुपयोगी असणारे पुंजके) तयार होतात. त्यांना ‘गाठाळ गलगंड’ अथवा अवटूचे अर्बुद असे म्हणतात. या प्रकाराच्या गलगंडाचे परिवर्तन ‘अवटु-आधिक्यज गलगंड’ या प्रकारात होण्याचा संभव असतो. या गाठाळ गलगंडाचा आकार मोठा होऊन त्याचा दाब श्वासनालावर आणि आजूबाजूच्या इतर भागावर पडल्यास त्यासंबंधी लक्षणे दिसतात. या प्रकारात शस्त्रक्रियेने गाठी काढून टाकण्याची जरूरी असते.
  4. अवटु-आधिक्यज हा प्रकार फार मारक असून त्याचे मूळ कारण अजून अज्ञात आहे. हा प्रकार विशेषत: १५ ते ४० वर्षांच्या स्त्रियांमध्ये दिसतो. पोष ग्रंथी (मेंदूच्या बुंध्यापाशी असलेली अंतःस्त्रावी ग्रंथी), अधिवृक्क ग्रंथी (मूत्रपिंडाच्या वरच्या टोकापाशी असलेली अंतःस्रावी ग्रंथी) आणि अवटू ग्रंथी या तीन अंतःस्रावी ग्रंथीचा (ज्यांचा स्राव रक्तात एकदम मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रंथींचा) एकमेकींवर फार परिणाम होत असतो, त्यांची कार्ये एकमेकींवर अवलंबून असतात. काही अज्ञात कारणाने या तीन ग्रंथींच्या कार्यात समन्वय न झाल्यास अवटू ग्रंथीची वृद्धी होऊन तिच्यातील थायरॉक्सीन हे हॉर्मोन (अंत:स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारा रासायनिक पदार्थ ) अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे हा रोग होतो.

या प्रकारची लक्षणे म्हणजे रोग्याला अतिशय घाबरटपणा येऊन हातापायात कापरे शिरल्यासारखा कंप उत्पन्न होतो. ह्रदयक्रिया फार जलद चालते. शरीरातील सर्व मेद झडून रोगी अती कृश होतो. घाम जास्त येतो. रोग्याचा चेहरा अतिशय भ्यालेल्या माणसासारखा दिसतो. डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात.त्यामुळे पापण्या मिटल्या तरी बुबुळे झाकली जात नाहीत. बुबुळे उघडी राहिल्याने व्रणोत्पत्ती होऊन डोळ्यात कायम दोष उत्पन्न होतो. अवटू ग्रंथीचा आकार बराच मोठा झालेला असतो. शरीरातील चयापचयाचे (सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींचे) प्रमाण फार वाढते व ते नेहमीच्या दुपटीइतके होते. भूक कमी झाल्यामुळे अन्न जात नाही; चयापचय मात्र वाढलेला असतो म्हणून शरीरातील सर्व मेद झडून जातो. इतर ऊतकांवरही (समान रचना व कार्य असणार्‍या पेशींच्या समूहावरही) असाच विपरीत परिणाम होतो.

या प्रकारात शस्त्रक्रिया करून अवटू ग्रंथीचा अर्धाअधिक भागही काढून टाकतात, परंतु शस्त्रक्रिया सोसण्याची शक्ती या रोग्यात फार थोडी असते. अवटू ग्रंथीच्या अंतःस्त्रावाचे प्रमाण कमी करण्यासाठी थायोयूरासिलासारखी औषधे देतात. क्ष-किरणांचाही काही उपयोग होतो. अलीकडे किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या आयोडिनाचा उपयोगही केला जातो.

आयुर्वेदीय चिकित्सा

हा विकार गळ्याच्या मध्यभागी खालच्या बाजूला होत असतो. हा ग्रंथी विकार आहे. ग्रंथीवरचे सर्व उपचार ह्यांच्यावर करावयाचे असतात. हा विकार स्त्रियांमध्ये आधिक्याने दिसतो. रक्तस्त्राव हा महत्त्वाचा उपचार आहे. कांचनार गुग्गुल व गंडमाला कंडन रस ही औषधे सतत द्यावीत. स्त्रियांचे कोणतेही विकार बरे करताना स्त्रियांच्या गर्भावस्थेच्या काळाचा फायदा घेता आला, तर फारच चांगले होते.स्त्रियांच्या गर्भावस्थेमध्ये व अगोदर रज:कालात शरीराची शुद्धी करून भावी जीव आरोग्यसंपन्न निर्माण व्हावा म्हणून डोहाळेरूपाने परिपोषक पदार्थ घेण्याची इच्छा शरीरस्थ जीव उत्पन्न करीत असतो, ह्या काळात शरीरातील दोषांचा नाश व शरीरात व गर्भशरीरात उत्तम प्रतीचे घटक निर्माण व्हावे म्हणून स्त्रिच्या शरीरातील पुरुषाचा प्रयत्न असतो. अशा वेळी गर्भाला परिपोषक आणि तिच्या शरीरात असलेल्या रोगाचे नाशक असे औषध दिले, तर त्या रोगाचा नाश फार चांगल्या रीतीने होऊन गर्भशरीरही चांगले आरोग्य संपन्न राहते. ह्या अवस्थेत सुवर्णमालिनीवसंत वरील रोगावर उपयुक्त ठरल्याने व विकार नाहीसा झाल्याचे प्रत्ययास आले आहे.

पशूंतील गलगंड

हा रोग प्राण्यांतही आढळतो. काही तज्ञांच्या मते पाण्यातील कॅल्शियमाचे प्रमाण जास्त असून ते पचावयास जड असले, तर आयोडिनाच्या शोषणक्रियेत व्यत्यय येतो. रक्तातील आयोडिनाचा अंश शोषून घेऊन अवटू ग्रंथीमध्ये संचय करून ठेवण्याच्या कार्यात व्यत्यय आला म्हणजेही रोग होतो.

हा रोग कुत्र्याची पिले, शिंगरे, कोकरे, वासरे वगैरे लहान वयाच्या प्राण्यांत विशेषतः आढळतो. अवटू ग्रंथी गळ्याच्या दोन्ही बाजूंस असल्यामुळे दोन्ही बाजूंस सूज येते व त्यांचा आकार दुप्पट होतो. घोडी प्रसूत झाल्यानंतर तिला होणारी शिंगरे आयोडीन अभावी कृश निपजतात. प्राःय गरोदर माद्यांना आयोडिनाची नेहमीपेक्षा अधिक आवश्यकता असते व आवश्यक प्रमाणात ते न मिळाल्यास प्रजा अशक्त निपजते व मरते. रोगाच्या एका प्रकारात ग्रंथीच्या वाढीबरोबरच डोळेही सुजल्याप्रमाणे आणि बुबुळे जास्त बाहेर व पुढे आल्यासारखी दिसतात तसेच रोगी अस्वस्थ बनतो. यात अवटू ग्रंथीतून स्त्रवणारे थायरॉक्सीन हे हॉर्मोन जास्त स्रवते. काही जनावरांत हा रोग आनुवंशिक असतो.

चिकित्सा

रोगाच्या सर्व प्रकारांत आयोडीन पोटातून दिले की रोगी बरा होतो. कुत्र्याला ०·१० ग्रॅ. पोटॅशियम आयोडाइड रोज देतात व उत्तम आहार देतात. मेंढीला गरोदरपणी चौथ्या व पाचव्या महिन्यांत एकेकदा ०·१५ ग्रॅ. पोटॅशियम आयोडाइड दिले, तर आयोडीन योग्य प्रमाणात पुरे पडून कोकरांना त्रास होत नाही.

 

लेखक : य. त्र्यं. गद्रे / म. अ. रानडे/वेणीमाधवशास्त्री जोशी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate