डोनोव्हेनिया ग्रॅन्युलोमॅटीस (डोनोव्हॉन पिंड) या नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे हा रोग होतो म्हणून या रोगास ‘डोनोव्हॉनोसीस’ असेही म्हणतात. या रोगाचे पहिले वर्णन १८८२ च्या सुमारास करण्यात आले होते. १९०५ मध्ये सी. डोनोव्हॉन यांनी रोगट ऊतकामधील (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहातील) पिंडाचा उल्लेख केला. १९४५ मध्ये कोंबड्याच्या अंड्यात वाढणाऱ्या भ्रूणामध्ये या पिंडाचे संवर्धन करणे साध्य झाले.
हे सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजक-अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेमध्ये तयार होणाऱ्या जांभळटसर रंग टिकून न राहणारे) आहेत. ते अचल असतात. कोंबडीच्या भ्रूणाशिवाय इतर कोणत्याही संवर्धन माध्यमात ते वाढत नाहीत. संवर्धित सूक्ष्मजंतू द्विध्रुवी (दोन्ही टोकांना थोडे मोठे असलेले), वक्राकार, साखळीसारखे किंवा वेष्टिलेले दिसतात. रोग्याच्या अंगावरील रोगट भागाचा स्राव किंवा रोगग्रस्त भागातील त्वचा सूक्ष्म दर्शकाखाली तपासल्यास वेष्टित डोनोव्हॉन पिंड एककेंद्रक कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) स्पष्ट दिसतात. राइट यांचे अभिरंजक द्रव्य वापरल्यास निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे डोनोव्हॉन पिंड दिसतात. त्यांचे आवरण गुलाबी रंगाचे दिसते.
जगाच्या सर्व भागांत आढळणारा हा रोग उष्ण कटिबंधीय भागात अधिक प्रमाणात आढळतो. इतर गुप्तरोगांच्या मानाने त्याचे प्रमाण सर्वांत कमी आढळते. भारतातील मद्रास येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेनेरॉलॉजी या संस्थेत १९७३ साली हा रोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते पुरुष १४६, स्त्रिया व मुले ३३, एकूण १७९. एकूण गुप्तरोगांतील या रोगाचे प्रमाण २.४४% होते.
उपदंश व जघन कणार्बुद एकाच वेळी असण्याची शक्यता असल्यामुळे योग्य रक्ततपासणीने उपदंश नसल्याची खात्री करून घेणे जरूर असते [ → उपदंश ].
सलगर, द. चि.; भालेराव, य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...