प्रवेशिका नीलेवर बाहेरून दाब पडला असता अशीच परिस्थिती उत्पन्न होऊन जलोदर होतो. अग्निपिंड (जठराच्या मागच्या बाजूस असणारी मोठी, लांबट व द्राक्षाच्या घडासारखी ग्रंथी) इ. जवळपासच्या अंतस्त्यांमध्ये अर्बुद झाल्यास त्यांचा दाब प्रवेशिका नीलेवर पडूनही जलोदर होऊ शकतो.
जलोदरात पोटात साठलेला द्रव पिवळट रंगाचा असतो. क्वचित मारक अर्बुदामुळे होणाऱ्या जलोदरात तो लाल वा रक्तमिश्रित असतो. वक्षांतर्गत (छातीतील) लसीका मार्गातील रोधामुळे जलोदर झाला असल्यास तो दुधासारखा पांढरा असतो. त्या द्रवाचे विशिष्ट गुरुत्व १·०१५ ते १·०१८ असून त्यातील प्रथिनांचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी असते.
उदरातील अंतस्त्यांवर द्रवाचा दाब पडल्यामुळे पुढील विविध लक्षणे दिसू लागतात. अपचन, क्षुधानाश, वृक्कावर दाब पडल्यामुळे मूत्रोत्पत्ती कमी होणे वगैरे. द्रवाचा दाब अधोमहानीलेवर (शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातील अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या वाहिनीवर) पडल्यामुळे पायांवर सूज येणे वगैरे लक्षणे दिसतात. मध्यपटलावर (छातीच्या व पोटाच्या पोकळ्यांच्या मधल्या पडद्यावर) दाब पडल्यामुळे श्वासोच्छ्वासास त्रास होतो. नाभीभोवती नीलांचे जाळे असून नाभी फुगीर व वर आल्यासारखी दिसते.
द्रवाच्या दाबामुळे यकृत वक्षामध्ये वर ढकलले जाते, तसेच हृदयही वरच्या बाजूस सरकते. या गोष्टी ताडनाने म्हणजे एक हात तपासावयाच्या जागी ठेवून दुसऱ्याने ताडन करून तपासण्याने ओळखता येतात.
उदराच्या एका बाजूस टिचकी मारली असता आतील द्रवात उत्पन्न होणारी लाट दुसऱ्या बाजूला हाताला जाणवते. उदरभित्तीमधून जाणारी अशी लाट उदरावर मध्यरेषेत हात उभा ठेवला असता बंद पडते, तशी जलोदरात पडत नाही.
निदान : वर दिलेल्या वर्णनावरून जलोदराचे निदान करणे सोपे असले, तरी त्याच्या कारणांचे निदान करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या कोष्टकावरून निदानाला मदत होते.
जलोदराच्या कारणांचे निदान |
|||
विकार |
विशेष लक्षणे |
||
द्रवाचे स्वरूप |
अंतस्त्याचे स्वरूप |
इतर |
|
हृद्विकार |
स्वच्छ, प्रमाण थोडे |
यकृतवृद्धी |
पायांवर व पाठीवर सूज |
वृक्कविकार |
स्वच्छ व थोडे |
वृक्कशोथ |
शोफ व प्रथिन मूत्रता |
यकृतविकार |
स्वच्छ, प्रमाण फार |
यकृत कठीण ग्रंथियुक्त |
यकृत विकाराची इतर लक्षणे |
तीव्र पर्युदर-शोथ |
गढूळ, प्रमाण थोडे |
विद्रधी (गळू) अथवा अंतस्त्यभेद |
स्थानिक लक्षणे |
मारक अर्बुद |
पुष्कळ लालसर अर्बुदकोशिका |
उदरातील काही अंतस्त्यांत आनुषंगिक अर्बुद |
इतरत्र अर्बुद लक्षणे |
जलोदराच्या कारणांचे व्यवच्छेदक (वेगळेपणा ओळखणारे) निदान होण्यासाठी विशेष काळजीने परीक्षा करणे फार महत्त्वाचे आहे. मूत्रपरीक्षा, रक्तदाब व हृदयपरीक्षा आणि जरूर तर यकृतक्रियेची परीक्षा केली असता निदान सुलभ होते.
यकृतसूत्ररोगामध्ये उदरात द्रव फार त्वरेने साठतो, इतर प्रकारांत त्यामानाने तो कमी असून शरीरात इतरत्र शोफ दिसतो. कित्येक वेळा यकृत, हृदय आणि वृक्क या तिहींमध्येही एकाच वेळी विकृती झाल्याने व्यवच्छेदक निदान फार कठीण होते.
चिकित्सा : रोगकारण शोधून काढून त्यावर योग्य ती चिकित्सा करावी लागते. द्रव फार साठल्यामुळे श्वासाला त्रास होत असल्यास तात्पुरता उपाय म्हणून सूचिशलाकेने (नलिका व टोकदार सुई असलेल्या उपकरणाने) द्रव काढून टाकतात; परंतु हा इलाज वारंवार करणे योग्य नाही. पाऱ्यापासून तयार केलेली मूत्रल (मूत्राचे प्रमाण वाढविणारी) औषधे वापरल्यास मूत्रप्रमाण वाढून काही काळ तरी द्रव कमी करता येतो.
ढमढेरे, वा. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/20/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...