डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे जेव्हा रुग्ण श्वास घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घशात ‘हूप’ असा विशिष्ट आवाज येतो. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार, जगभर दरवर्षी ३-५ कोटी रुग्ण आढळतात. त्यांपैकी सु. ३ लाख रुग्ण मरण पावतात.
झ्यूल बॉर्दे व ऑॅक्ताव्ह झॅवगू यांनी १९०६ मध्ये डांग्या खोकल्याचा जीवाणू वेगळा करून त्याचा अभ्यास केला आणि त्यांनीच प्रथम या रोगावरील लस तयार केली. त्यानंतर १९२० मध्ये लुईस सॉए याने निष्क्रिय जीवाणूंपासून आणखी एक प्रतिबंधक लस तयार केली. १९२५ मध्ये डेन्मार्कमधील वैद्यक थॉर्वल्ड मॅड्सेन याने हीच लस वापरून डेन्मार्क देशालगत असलेल्या फरो बेटावर पसरलेली डांग्या खोकल्याची साथ आटोक्यात आणली. १९४२ मध्ये अमेरिकन वैज्ञानिक पर्ल केंड्रीक याने घटसर्प आणि धनुर्वात लशींमध्ये डांग्या खोकल्याची लस मिसळून डीटीपी (डिप्थेरिया टिटॅनस परट्यूसिस) लस तयार केली.
मात्र, सुरुवातीच्या काळात या लशीमुळे काही दुष्परिणाम उद्भवत असल्याचे लक्षात आल्यानंतर जपानी वैज्ञानिक युजी साटो याने या रोगाचे जीवाणू वृद्धिमिश्रणात वाढविले आणि या जीवाणूंनी स्रवलेल्या ग्लुटिनिनापासून लस तयार केली. ही लस पेशीविरहित (अपेशीय) असून तिचे नाव डीटीएपी (डिप्थेरिया टिटॅनस असेल्युलर परट्यूसिस) आहे. १९८१ सालापासून ही अपेशीय प्रतिबंधक लस वापरली जात असून लसीकरण केलेल्या बालकांमध्ये ७०-८५% रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र या लशीने मिळणारी प्रतिकारक्षमता ५ ते १० वर्षेच टिकत असल्यामुळे या लशीचे डोस पुन्हा घ्यावे लागतात.
बॉर्देटिल्ला परट्यूसिस किंवा बॉ. पॅरापरट्यूसिस या जीवाणूंमुळे डांग्या खोकला रोग होत असून यात श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात संक्रामण होते. हे जीवाणू जीवविष निर्माण करतात. त्यामुळे श्वसन नलिकेतील लोमश पेशींचा नाश होतो. विशेषेकरून, लहान बालके या रोगाला संवेदनशील असतात आणि त्यांचे लसीकरण झालेले नसेल तर हा रोग जीवघेणा ठरू शकतो. डांग्या खोकल्याने बाधित असलेली व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा तुषाराच्या स्वरूपात उडणाऱ्या सूक्ष्मकणांमधून हे जीवाणू हवेत मिसळतात आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात.
डांग्या खोकल्याच्या जीवाणूंचा उबवण काल ७ ते १० दिवसांचा असून लक्षणे सर्दीसारखीच असतात. या लक्षणांबरोबर वाहते नाक, बारीकसा ताप आणि हगवण अशीही लक्षणे दिसून येतात. १ ते २ आठवड्यानंतर रुग्णाला कोरड्या खोकल्याची जोरदार आणि लगेच थांबणारी उबळ येते. खोकल्याच्या ढासेनंतर बऱ्याचदा उलटी होते आणि चिकट श्लेष्म बाहेर टाकले जाते. खोकल्याची उबळ वारंवार व आपोआप येत राहते. एवढेच नाही तर जांभई येणे, हसणे, बोलणे, रडणे व आळस देणे यांसारख्या कृतींमुळेही उबळ येऊ शकते. गुंतागुंत झाल्यास फुप्फुसशोथ (न्यूमोनिया) होऊ शकतो. मात्र, गुंतागुंत न झाल्यास १ ते २ महिन्यांनंतर खोकला कमीकमी होत जातो. रुग्ण जेवढा वयाने लहान, तेवढी या रोगाची तीव्रता अधिक असते. त्यामुळे ६ महिन्यांखालील बालके अधिक संख्येने मृत्युमुखी पडतात.
आरंभीचे निदान सामान्यपणे लक्षणांवरून करतात. बऱ्याचदा हा रोग लगेच समजून येत नाही. रुग्ण विशिष्ट प्रकारे खोकू लागला की रोगनिदान करणे सोपे होते. जर खोकल्यानंतर उलटी झाली तर रुग्णाला डांग्या खोकला झाल्याचे निश्चित समजतात. लक्षणांनुसार आणि रुग्णाला त्रास कमी व्हावा या उद्देशाने उपचार केले जातात. रुग्णाची शुश्रूषा, शामके (झोप येण्यासाठी औषधे) आणि भरपूर द्रव रूपातील अन्न उपचारात दिले जातात.
प्रतिजैविके दिल्यास लक्षणांची तीव्रता कमी होते. तसेच रुग्णाद्वारे होणाऱ्या रोगप्रसाराची क्षमता कमी होते. बऱ्याचदा या रोगाचे निदान उशिरा समजून येत असल्यामुळे प्रतिजैविके फारशी प्रभावी ठरत नाहीत. मात्र, न्यूमोनिया झाल्यास प्रतिजैविके देणे आवश्यक असते.
जेव्हा डांग्या खोकल्यावर लस उपलब्ध नव्हती तेव्हा अर्भके आणि लहान बालकांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक होते. मात्र आता लहान बालकांचे लसीकरण होत असल्यामुळे त्यांच्यात या रोगाचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र लसीकरणामुळे किंवा आधीच्या संक्रामणामुळे आलेली प्रतिकारक्षमता दीर्घकाळ टिकत नसल्याने हा रोग पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये अधिक दिसून येतो. दीर्घकाळ रेंगाळणाNया कोरड्या खोकल्याशिवाय इतर वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे प्रौढांत सहसा आढळत नाहीत.
लहान मुलांना डांग्या खोकला होऊ न देणे, हाच या रोगावर महत्त्वाचा इलाज आहे. त्यामुळे लसीकरण हा या रोगावरील प्राथमिक प्रतिबंधक उपाय आहे. या दृष्टिकोनातून लसीकरणाचे काटेकोर कार्यक्रम देशभर राबविण्यात येतात. भारतातदेखील ही लस धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक लशींबरोबर मिसळून देतात. या लशीला त्रिगुणी (ट्रिपल) लस असे नाव आहे. बालकांना या लसीचे डोस २, ३ व ४ महिने, दीड वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे या वयांत दिले जातात.
लेखक - राजेंद्र प्रभुणे
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...