অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पचनज व्रण

(पेप्टिक अल्सर). जठरांत्र मार्गाच्या (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनलेल्या अन्नमार्गाच्या) श्लेष्मक-लास्तरावर (बुळबुळीत पातळ अस्तरावर) हायड्रोक्लोरिक अम्ल आणि पेप्सीन यांच्या संयुक्त परिणामुळे उत्पन्न होणाऱ्या व्रणांना पचनज व्रण म्हणतात. अशा प्रकारचे व्रण जठर व ग्रहणी (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) या भागांत प्रामुख्याने आढळतात. कधीकधी पचनज व्रण ग्रसिकेच्या (घशाच्या) खालच्या भागात आणि मेकेल अंधवर्धातही (काही व्यक्तींत जन्मजात विकृतीच्या स्वरूपात आढळणाऱ्या, लहान आतड्याच्या शेवटच्या भागात एका बाजूला असलेल्या पिशवीसारख्या भागातही; जे. एफ्. मेकेल ज्युनिअर या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) होतात. जठर-रिक्तांत्र संमीलन (जठर व रिक्तांत्र-लहान आतड्याचा मधला भाग-एकमेकांस जोडून अन्नपदार्थ ग्रहणीत न जाऊ देता सरळ रिक्तांत्रात सोडणे) या शस्त्रक्रियेनंतरही पजनज व्रण रिक्तांत्रात होण्याची शक्यता असते. झोलिंजर-इलिसन लक्षणसमूह या विकृती जठररसाचे उत्पादन भरमसाट वाढते या विकृतीचे मूळ कारण ⇨ अग्निपिंडात होणारे अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी गाठी) असते. गॅस्ट्रिन या हॉर्मोंनाचे (उत्तेजक स्रावाचे) उत्पादन अतिशय वाढून परिणामी हायड्रोक्लोरिक अम्ल व पेप्सिनाचे प्रमाण भयंकर वाढते. या लक्षणसमूहातही पचनज व्रण रिक्तांत्रात होण्याची शक्यता असते.

पचनज व्रण साधारणपणे १ ते ३ सेंमी. लांबी-रुंदीचा असून त्याची कड स्पष्ट व विविक्त असते. व्रणाचा तळ स्नायुस्तराचा असून त्यावर श्लेष्म – अधःश्लेष्मकला-स्तरातील कोशिकांचा (पेशींचा) चिकट व घट्ट थर असतो. त्याच्या बाहेरचा पर्युदराचा (उदरभित्तीच्या आतील बाजूस असलेल्या व उदरातील इंद्रियांवर आच्छादनासारख्या असलेल्या श्लेष्मकला अस्तराचा) थरही जाड झालेला असतो. व्रण बहुधा चिरकारी (दीर्घकालीन) असल्यामुळे त्याच्या तळाभोवती तंतुमय ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचा) प्रसार होऊन आजूबाजूच्या इंद्रियांना तो चिकटतो. तसेच व्रण वारंवार होत गेल्याने त्या जागी उत्पन्न झालेल्या तंतूंचे संकोचन होते. या संकोचनामुले जठर व ग्रहणी यांचा आकार बदलून त्यांतील अन्नमार्गाला रोध उत्पन्न होतो.

प्रकार

पचनज व्रणाचे दोन प्रकार आढळतात (१) तीव्र आणि (२) चिरकारी.

तीव्र पचनज व्रण

बहुधा एकापेक्षा जास्त असलेले हे व्रण जठराच्या सबंध श्लेष्मकलास्तरावर विखुरलेले आढळतात. ग्रहणीच्या पहिल्या भागातही ते असतात. श्लेष्मकलास्तरावंर जागजागी उथळ अपक्षरण (काही भाग निघून जाणे) होते. व्रण छोट्या आकारमानाचे असून फक्त वरच्या थरापर्यंतच मर्यादित असतात. ते जलद व संपूर्ण बरे होतात. अन्नविषबाधा, मूत्रविषरक्तता (रक्तातील मूत्रघटकांच्या अस्तित्वामुळे निर्माण होणारी विषारी अवस्था), रक्तस्रावी रोग (रक्त गोठण्यास अतिशय वेळ लागत असल्याने रक्तस्त्राव आटोक्यात राहण्यात अडचणी उत्पन्न होणारा आनुवंशिक रोग), तीव्र संक्रामणजन्य (संसर्गजन्य) ज्वर तसेच ॲस्पिरीन, ब्युटाझोलिडॉन, कॉर्टिसोन इ. औषधांचे सेवन यांमुळे तीव्र व्रण उद्‌भवतात. वारंवार अल्पकाल टिकणारे अपचन हे प्रमुख लक्षण असते. कधीकधी रक्तमिश्रित वांत्या होतात. इलाजामध्ये सौम्य आहार, विश्रांती व अम्लप्रतिकारक (अम्लतेला रोध करणारी किंवा त्याचे उदासिनीकरण करणारी) ओषधे गुणकारी असतात. बहुतेक सर्व व्रण बरे होतात; परंतु कधीकधी एकादा व्रण चिरकारी होण्याची शक्यता आहे.

चिरकारी पचनज व्रण

मानवामध्ये अधिकांश प्रमाणात आढळणारा हा रोग असून एका अंदाजाप्रमाणे इंग्लंडमधील प्रौढ पुरुष लोकसंख्येपैकी १५% व्यक्ती या रोगाने पछाडलेल्या असाव्यात. यूरोप, अमेरिका, स्कँडिनेव्हियन देश या प्रदेशांत १९३० सालानंतर या रोगाचे प्रमाण सतत वाढत असल्याचे आढळले आहे. आफ्रिकन बांटू जमातीत त्याचे प्रमाण बरेच कमी आहे, तर नायजेरियन लोकांत ते अधिक आहे. भारतातही या रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले असून ग्रहणी व्रणाचे भारतातील प्रमाण वाढत असल्याचे आढळले असून ग्रहणी व्रणाचे भारतातील प्रमाण जठर व्रणापेक्षा २०-३० पट अधिक आढळले आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांत पचनज व्रणाचे प्रमाण उत्तर भारतापेक्षा अधिक असून त्या भागात तो एक नेहमी आढळणारा रोग आहे. काश्मीरमध्येही थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो.

हा रोग विशीच्या खालच्या वयात सहसा आढळत नाही. पुरुषांमध्ये १५ ते ६० वयापर्यंत तो केव्हाही उद्‌भवण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये ऋतुनिवृत्तीनांतरच्या वयात त्याचे प्रमाण वाढते. पुरुष-स्त्री रुग्णांचे गुणोत्तर ६:१ असावे. ग्रहणी व्रण कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यावसायिकात होण्याचा संभव असला, तरी तो बहुतकरून बुद्धिमान, चाळीशीच्या वयातील, जबाबदारीचे काम करणाऱ्या आणि आधुनिक संस्कृतीतील मानसिक तणावाखाली सतत वावरणाऱ्या व्यक्तीत अधिक आढळतो, म्हणून तो डॉक्टर, अभियंते व व्यवसाय कार्याधिकारी (व्यवसाय प्रकल्पाचा आराखडा तयार करून तो आपल्या देखरेखी खाली अंमलात आणणे ही जबाबदारीची कामे करणारे अधिकारी) हे व्यवसाय करणार्‍यांत अधिक आढळतो. याउलट जठर व्रणाचे प्रमाण अपुरा पौष्टिक आहार सेवन करणाऱ्या पन्नाशीच्या वयातील मजूरवर्गात अधिक आढळते.

नेहमी पचनज व्रणनिर्मिती होणारे भाग : (१) जठर लघुवक्र कडेलचा भाग, (२) ग्रहणीचा पहिला भाग.

कारणे

चिरकारी पचनज व्रणाचे निश्चित कारण अज्ञात आहे. पुढील गोष्टी व्रणनिर्मितीस मदत करीत असाव्यात : (१) चिंता, मानसिक ताण आणि भावनाक्षोभ यांचा मेंदूतील अधोथॅलॅमस व प्राणेशा तंत्रिका केंद्रावर [ ⟶ तंत्रिका तंत्र ] उत्तेजक परिणाम होत असावा. त्यामुळे जठररसाचे उत्पादन भरमसाट वाढत असावे. (२) कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांचे सेवन पचनज व्रण तयार होण्याचा धोका वाढवतात. ही औषधे जठररसातील श्लेष्मा-प्रथिने कमी करतात, तसेच एकूण रसाची श्यानता (दाटपणा) कमी करतात व त्यामुळे त्याचा संरक्षणात्मक गुणधर्म कमी होऊन श्लेष्मकलास्तरास इजा होण्याचा संभव वाढतो. (३) पचनज व्रण गर्भारपणात सहसा आढळत नाही. तसेच तो स्त्रियांच्या जननक्षम कालातही अत्यल्प प्रमाणात आढळतो यावरून हॉर्मोनांचा संबंध असावा. (४) ⇨ परावट् ग्रंथी, ⇨ पोष ग्रंथी, अग्निपिंड यांची अर्बुदे व पचनज व्रण यांचा संबंध प्रस्थापित झालेला आहे. या संदर्भात झोलिंजर-इलिसन लक्षणसमूहाचा उल्लेख वर आलेला आहे. (५) अम्ल-पेप्सिनाच्या सतत सान्निघ्यात असूनही जठर श्लेष्मकलास्तराचे त्यांच्या परिणामापासून संरक्षण कसे होते, याविषयी अजून निश्चित माहिती नाही. जठररसातील म्युकोपॉलिसॅकॅराइडे [ ⟶कार्बोहायड्रेटे ] या संरक्षणास कारणीभूत असावीत. पचनज व्रणाचे प्रमाण ‘ओ’ रक्तगट असणार्‍यांत अधिक असल्याचे आढळून आले आहे. ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या जठररसात हे सं र क्ष ण दा यी घटक स्रवत न स ल्या मु ळे व्रण त या र हो ता त. ग्रहणी व्रण अ स ले ल्या रो ग्या च्या नातेवाईकास तो रोग होण्याची शक्यता तिपटीने अधिक असते. (६) श्लेष्मकलास्तरास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत सूक्ष्मजंतुसंसर्गामुळे विकृती होऊन रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तेथील कोशिकांची प्रतिकारशक्ती कमी पडून जठर अम्ल व पेप्सीन त्यांचे पचन करतात आणि व्रण तयार होतो. (७) काही अंशी अनियमित, पचनास जड, अतिउत्तेजक आहार व्रणनिर्मितीस मदत करीत असावा.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate