इ. स. पहिल्या शतकात अँरिटीअस व सेल्सस यांनी ‘निनाल’ (सायफन) या अर्थाचा मोठ्या प्रमाणातील मूत्रोत्सर्जन दर्शविणारा ग्रीक शब्द प्रथम वापरला. त्यापासून इंग्रजी भाषेतील ‘डायाबेटिस’ हा शब्द तयार झाला. लॅटिन भाषेतील ‘मध’ या अर्थाच्या ‘मेलिटस’ या शब्दाची जोड देऊन या रोगाचे इंग्रजी नाव ‘डायाबेटिस मेलिटस’ तयार झाले.
क्लोद बेर्नार (१८१३-७८) या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८५० मध्ये ग्लुकोजाची रक्तातील अती वाढ व मधुमेह यांचा संबंध प्रथम दाखविला. १८६९ मध्ये पाउल लांगरहान्स (१८४७-८८) यांनी अग्निपिंडातील विशिष्ट कोशिका पुंजांचे (पेशींच्या पुंजांचे) वर्णन केले होते व या इन्शुलीननिर्मितीशी संबंधित असलेल्या पुंजांना ‘लांगरहान्स द्वीपके’ असे नाव देण्यात आले. ओस्कार मिंको व्हस्की (१८५८-१९३१) आणि जोसेफ फोन मेरींग (१८४९-१९१०) या शास्त्रज्ञांनी शस्त्रक्रियेने प्राण्यातील अग्निपिंड काढून टाकून प्रायोगिक मधुमेह निर्माण केला होता. ई. एल्. ओपी या विकृतिवैज्ञानिकांनी १९०७ साली लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांचा अभ्यास करून त्यांचा मधुमेहाशी संबंध असल्याचे दाखवून दिले. १९२१ मध्ये ⇨सर फ्रेडरिक ग्रांट बँटिंग व ⇨चार्ल्स हर्बर्ट बेस्ट या शास्त्रज्ञांनी अग्निपिंडापासून इन्शुलीन मिळविले आणि १९२२ मध्ये ए. ए. फ्लेचर यांनी मधुमेहावरील उपचारात त्याचा प्रथम उपयोग केला. सल्फोनामाइड औषधांचा रक्तातील ग्लुकोजाची पातळी कमी करण्याचा गुणधर्म जांबोन या शास्त्रज्ञांच्या लक्षात १९४२ मध्ये आकस्मिक रीत्या आला. १९५५ मध्ये फ्रँक व फुक्स या शास्त्रज्ञांनी कारब्युटामाइड या सल्फोनामाइडाचा हा गुणधर्म एका संसर्गजन्य रुग्णाच्या उपचारामध्ये पाहिला व त्यानंतर अनेक सल्फॉनिल यूरिया गटातील तोंडाने गोळीच्या रूपात घ्यावयाच्या मधुमेहरोधी औषधांचा उपयोग सुरू झाला. १९५७ मध्ये उंगर यांनी बायग्वानिडे मधुमेहात वापरली व ती परिणामकारक असून धोकारहित असल्याचे दाखवून दिले.
मधुमेह हा एक लक्षण समूह असल्यामुळे विविध कारणे मिळून तो उत्पन्न होत असावा. त्याच्या संप्राप्तीविषयी अजून पुष्कळशी माहिती अज्ञात असून बहुधा कोणतेही निश्चित कारण सांगता येत नाही. तथापि दोन निश्चित कारणांचा संबंध ज्ञात झाला आहे: (१) आनुवंशिकता व (२) अतिपोषण (स्थूलता).
आनुवंशिकता : आनुवंशिकतेचा व मधुमेहाचा संबंध असल्याचे प्राचीन काळापासून ज्ञात असावे. या विषयाचा सखोल अभ्यास झाला असून एकूण माहितीबद्दल अजूनही मोठे मतभेद शिल्लक आहेत. मधुमेही रोग्यांच्या जवळच्या नातलगांत हा रोग उद्भवण्याचे प्रमाण अधिक आढळते. कोणत्याही एका जन्मदात्याकडून (माता किंवा पिता) रोग अपत्यात प्रेषित होतो. माता व पिता दोघेही मधुमेही असल्यास अपत्यात तो उद्भवण्याची शक्यता जवळजवळ ५०% असते. मधुमेही मातेच्या एकयुग्मजीय (एकाच अंडापासून तयार झालेल्या ) जुळ्यामध्ये मधुमेह उद्भवण्याची शक्यता अधिक असते. अशा जुळ्यापैकी दोन्ही अपत्यांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर मधुमेह उद्भवण्याची शक्यता अधिक असते व या प्रकाराला ‘मिलाफी’रोगोत्पत्ती म्हणतात. जुळ्यापैकी एकासच मधुमेह झाल्यास त्या प्रकाराला ‘विसंगत’ रोगोत्पत्ती म्हणतात. जनुक निर्मित [आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांमुळे निर्माण झालेल्या आनुवंशिकी; जीन] इतर काही विकृतींमध्ये पुष्कळ वेळा मधुमेहही आढळतो. जननिक वाहक स्वत: मधुमेही न होता, अपत्यामध्ये रोगकर प्रवृत्ती प्रेषित करू शकतो. बालमधुमेहातील तीव्र प्रारंभाला जननिक कारणे असल्याचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या –पेशींच्या –समूहाच्या ) तपासणीवरून समजू शकते. मधुमेही व मधुमेह-प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या रक्तरसात अल्ब्युमीन या प्रथिनाला बद्ध असलेले इन्शुलीन-प्रतिरोधक द्रव्य असल्याचे व्हॉलेन्स, ओवेन व लिली या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे.
विकृत कार्बोहायड्रेट चयापचय आनुवंशिक व जन्मजात असला, तरी मधुमेहाची सुरुवात स्थूलता, सूक्ष्मजंतुसंसर्ग, यकृत विकृती, तीव्र कावीळ, स्टेरॉइडांचा चिकित्सात्मक उपयोग या कारणांतून होऊ शकते. या गोष्टी शारीरिक ताण निर्माण करणाऱ्या आहेत.
[⟶ स्थूलता ].
मधुमेह कोणत्याही वयात उद्भवू शकतो; परंतु ८० % रुग्ण पन्नाशीच्या वरचे असतात. पाश्चात्त्य देशांत ५५ ते ६५ वर्षे वयोगटातील रोगी सर्वाधिक आढळतात. भारतात ही वयोमर्यादा ४५ ते ५५ दरम्यान आहे. बालवयीन (वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वी होणारा मधुमेह) क्वचित आढळतो आणि त्याचे प्रमाण १ ते ४ % च आहे. मध्यमवयीन रूग्णांत स्त्रियांचे प्रमाण अधिक दिसते. गर्भारपण व बहुप्रसवता रोगोत्पादनास हातभार लावतात.
काही ⇨ अंत:स्रावी ग्रंथी (ज्यांचा उत्तेजक स्राव व-हॉर्मोन-वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तात मिसळतो अशा ग्रंथी)व मधुमेह यांचा संबंध असावा. विशालांगता (हाडांची व मऊ ऊतकांची अपसामान्य वाढ होणे) ही ⇨पोष ग्रंथीची विकृती बहुधा मधुमेहासह आढळते. पोष ग्रंथीचे मधुमेहोत्पादक हॉर्मोन (वृद्धी हॉर्मोन) लांगरहान्स द्विपकांतील कोशिकांवर दुष्परिणाम करते. कधी-कधी पोष ग्रंथीच्या स्रावाची न्यूनता मधुमेहात सुधारणा करीत असल्याचेही आढळते.⇨ अवटू ग्रंथीच्या स्रावाचे आधिक्य आणि न्यूनता हे दोन्ही ग्लुकोज चयापचयावर परिणाम करतात.⇨ अधिवृक्क ग्रंथीची हॉर्मोने प्रायोगिक व मानवी मधुमेहावर परिणाम करतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/24/2020
सर्व शैक्षणिक संस्थांकडून होणार्या हरितगृहवायू उत...
शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घ...
आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या...
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स...