स्पायरिलम मायनस व स्ट्रेप्टोबॅसिलस मोनिलिफॉर्मिस नावाचे सूक्ष्मजंतू उंदीर चावल्यामुळे रक्तप्रवाहात शिरून उद्भवणाऱ्या रोगाला ‘मूषकदंश ज्वर’ म्हणतात. स्पा. मायनस सूक्ष्मजंतुजन्य रोगास ‘सोडोकू ज्वर’ असे दुसरे जपानी नाव आहे. स्ट्रे. मोनिलिफॉर्मिसमुळे होणाऱ्या रोगास ‘हेव्हरिल ज्वर’ असे दुसरे नाव आहे. अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील हेव्हरिल गावी १९२६ मध्ये उद्भवलेल्या या रोगाच्या साथीवरून हे नाव मिळाले आहे; परंतु या नावाचा उपयोग जेव्हा मूषकदंश न होता, संसर्गित दूध किंवा अन्न यांच्या सेवनामुळे उद्भवतो तेव्हाच करतात. दोन्ही प्रकारचा सूक्ष्मजंतु-संसर्ग जगभर आढळतो. अमेरिकेतील एका पाहणीत बॉल्टिमोरमधील ९,००,००० लोकवस्तीत १९४८–५२ या काळात ३२२ मूषकदंश झाल्याचे आढळले होते. त्यांपैकी ६०% सहा वर्षांखालील, २५% एक वर्षाखालील आणि ८०% दंश रात्री झोपेत झाल्याचे आढळले होते.
लक्षणे
स्पा. मायनस सूक्ष्मजंतुजन्य रोगात परिपाक काल (सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यापासून ते रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काल) १ ते ४ आठवड्यांचा असून या कालाची कक्षा १ ते ३६ दिवसांची असते. दंश जागा लवकर बरी होते; परंतु कालांतराने तिथे सूज येऊन लाली व वेदना सुरू होतात. थंडी वाजून ताप भरतो. दंश जागेशी संबंधित लसीकावाहिनीशोथ व लसीका ग्रंथीशोथ [⟶ लसीका तंत्र] उद्भवतात. ज्वर पुनरावर्ती प्रकारचा -२ ते ४ दिवस ज्वर नंतर २ ते ४ दिवस ज्वररहित-असतो. ज्वर कालात डोकेदुखी, प्रकाश असह्यता, मळमळ व उलट्या होतात. अर्ध्यापेक्षा जास्त रूग्णांमध्ये हातापायावर पुरळ उमटतो.
स्ट्रे. मोनिलिफॉर्मिसजन्य रोगात परिपाक काल सर्वसाधारणपणे १ ते ३ दिवस आणि १० दिवसांपेक्षा कमी असतो. सुरुवात एकाएकी ज्वर, थंडी, डोकेदुखी व अंगदुखीने होते. रोग मूषकदंशजन्य असल्यास दंशजागी विशेष काही आढळत नाही. ७५% रूग्णांमध्ये पुरळ उमटतो व तो हातापायांवर अधिक असून तळहात आणि तळपायांवरही आढळतो. ५०% रुग्णांमध्ये संधिवेदना किंवा संधिशोथ (सांध्यांची दाहयुक्त सूज) पहिल्या आठवड्यात उद्भवतात. या संसर्गाचे हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या अस्तर पटलाची दाहयुक्त सूज), मऊ ऊतकात (पेशी समूहात) किंवा मेंदूमध्ये विद्रधी (गळू) उत्पन्न होणे हे गंभीर उपद्रव शक्य असतात.
निदान
स्पा. मायनस सूक्ष्मजंतू दंशजागेतील स्त्राव, लसीका ग्रंथीतून सूचीद्वारा काढलेला द्रव आणि रक्त यांमध्ये कृष्णक्षेत्र दीप्ती तपासणीत (गडद पार्श्वभूमीवर निरीक्षण करावयाची वस्तू ठळकपणे दिसेल अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मदर्शकीय तपासणीत) दिसतात. स्ट्रे. मोनिलिफॉर्मिस सूक्ष्मजंतू रक्त, संधिद्रव किंवा पू यांमध्ये सूक्ष्मदर्शकीय दिसतात. संशयित रुग्णामध्ये रुग्णाचे रक्त उंदीर किंवा गिनीपिग या प्राण्याच्या पर्युदरात (उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्या पोकळीत भित्तींच्या आतील बाजूवर व तीमधील इंद्रियांवर पसरलेल्या अस्तरासारख्या पटलात) अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) टोचल्यावर ५ ते १५ दिवसांनंतर त्या प्राण्याच्या रक्तात किंवा पर्युदर द्रवात सापडतात.
उपचार
रसायन चिकित्सेच्या शोधापूर्वी स्पा. मायनस प्रकारात मृत्युप्रमाण ६% आणि स्ट्रे. मोनिलिफॉर्मिस प्रकारात १०% होते. अलीकडे ते फारच कमी झाले आहे. पेनिसिलीन अंतःक्षेपणाने किंवा तोंडाने सात दिवस दिल्यास गुणकारी ठरले आहे. दोन्ही प्रकारांवर ते प्रभावी औषध आहे. पेनिसिलिनाची अधिहृषता (ॲलर्जी) असल्यास एरिथ्रोमायसीन, टेट्रासायक्लीन, क्लोरँफिनिकॉल व सेफॅलोस्पोरिने ही औषधे गुणकारी आहेत. मूषणदंश होताच जखम जंतुनाशकाने स्वच्छ करणे, धनुर्वात प्रतिबंधक लस टोचणे आणि पेनिसिलीन किंवा टेट्रासायक्लीन उपचार सुरू करणे रोगप्रतिबंधक असते.
संदर्भ : 1. Datey, K. K.; Shah, S. J., Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay. 1979.
2. Petersdorf, R. G. and others, Ed., Harison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.
3. Wealtherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.
भालेराव, य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश