पावसाळ्यात नेहमी डेंग्यूच्या साथीविषयी व त्यातून ओढावणाऱ्या मृत्यूविषयीच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. डेंग्यूशी लढा देताना योग्य उपचार, पुरेशी विश्रांती आणि सकस आहार याच गोष्टी महत्वाच्या ठरतात. मात्र डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांचे उद्भव नष्ट केल्यास डेंग्यूवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे जाऊ शकते.
डेंग्यू हा विषाणूमुळे मानवाला होणारा आजार आहे. डेंग्यूच्या विषाणूचे मानवात संक्रमण करण्यासाठी एडिस इजिप्ती या डासाची मादी कारणीभूत असते. लक्षणांच्या अनुषंगाने डेंग्यू हा चिकणगुन्या व ओ न्यांग न्यांग या विषाणुमुळे होणाऱ्या तापाशी साधर्म्य राखतो. इतिहासात या तापाविषयी डँडी ताप, कोरियन ताप, थई ताप, हाडमोडी ताप, फिलीपाईन ताप, नी फिवर, सेवन डे फिवर, ढाका फिवर अशी अनेक नावे प्रचलीत झालेली आढळतात. गेल्या 30 वर्षांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास डेंग्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे आढळून येते. किटकजन्य आजारांमध्ये डेंग्यू हा साऱ्या विश्वात धुमाकूळ घालत असून सुमारे 2.5 दशलक्ष नागरिक तर 200 च्या वर देशात या आजारामुळे उद्भवणाऱ्या उद्रेकांचा व मृत्यूचा धोका समोर आला आहे.
डेंग्यू विषाणूचे डेन-1, डेन-2, डेन-3 व डेन-4 या उपप्रकारापैकी डेन-1 व डेन-2 हे उपप्रकार जास्त घातक असल्याचे आढळून आले आहे. कोलकाता येथे सन 1963-64 दरम्यान झालेल्या ताप उद्रेकात डेंग्यूच्या डेन-2 या विषाणूंचे प्रमाण अधिक आढळते, त्यामुळे रुग्ण रक्तस्त्रावजन्य ताप उद्रेकांमुळे गंभीर आजारी झाले होते. 46 व्या जागतिक आरोग्य परिषदेने मे 1993 साली डेंग्यू आजारावर नियंत्रण करण्यासाठी ठराव संमत केला. त्यानुसार मार्गदर्शक तत्वांचा वापर डेंग्यू नियंत्रणासाठी करण्यात येत आहे.
डेंग्यू हा आजार एक प्रकारच्या आरबो व्हायरस या विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार रुग्ण व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. या डासांमध्ये डेंग्यू विषाणूची वाढ 8-10 दिवसांत पूर्ण हाते. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्यांना टायगर मॉस्क्यूटो असे म्हणतात. हे डास दिवसा चावतात. या डासांची उत्पत्ती साठवलेले स्वच्छ पाणी, वॉटर कुलरमधील पाणी, फ्लॉवर पॉट, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, टायर्स, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, बाटल्यांबरोबरच बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे यामध्ये प्रामुख्याने होते.
या आजारांत विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी सुमारे 3 ते 10 दिवस एवढा कालावधी जातो.
डेंग्यू - अचानक तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे व जास्त तहान, ताप कमी जास्त होणे, अंगावर पूरळ येणे, या प्रकारात मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असते.
डेंग्यूची वरीलप्रमाणे लक्षणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, शैाचास होणे, पोटात दुखणे.
यातील गंभीर अवस्थेत रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो, यास डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतात. या अवस्थांमध्ये रुग्णात मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
डेंग्यू निदान निश्चितीसाठी रुग्णांचे 5 मिली. रक्त निर्जंतुक बल्बमध्ये तपासणीसाठी शीतसाखळी माध्यमातून राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे पाठवितात. या व्यतिरिक्त खाजगी प्रयोगशाळेत रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टद्वारे रक्त तपासणी करतात.
डेंग्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळाल्यास होणारी गुंतागुंत व मृत्यू टाळणे शक्य होते. डेंग्यू रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याने पॅरासिटॅमोल गोळ्यांची योग्य मात्रा वयोगटानुसार उपचारात देण्यात यावी. ताप असताना रुग्णाला पूर्ण विश्रांती देण्यात यावी. डेंग्यू हिमोरेजिक फिव्हरची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित दवाखान्यात दाखल करुन योग्य ते उपचार करण्यात यावेत. रक्तस्त्राव प्रवृत्त करणारी अस्प्रिन आणि ब्रुफेन ही औषधे उपचारात अजिबात वापरु नयेत. योग्य उपचार, विश्रांती आणि काळजी घेतल्यास डेंग्यूपासून रुग्ण सहज बरा होवू शकतो. मात्र डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखणे हाच महत्वाचा उपाय आहे.
लेखक - राहुल शरद भुसे,
आरोग्यसेवक (MSW), बारामती.
संकलन- उपमाहिती कार्यालय, बारामती.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/10/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...