माणसातल्या हिवतापाच्या जंतूंचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी रक्त नमुना पाहणी करून जास्तीत जास्त रुग्णांवर प्राथमिक उपचार (क्लोरोक्वीन) व समूळ उपचार करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कधीकधी एखाद्या मर्यादित लोकवस्तीपुरता सार्वत्रिक क्लोरोक्वीनचा वापर केला जातो. (म्हणजे वस्तीवरच्या सगळयांनाच एकदम औषध दिले जाते.) पण सर्वसाधारणपणे हिवतापाच्या सर्व रुग्णांवर एकदम उपचार करता येणे शक्य नसते. यामुळे एकमेकांपासून संसर्गाचे चक्र चालूच राहते. शिवाय संसर्ग झालेल्यांपैकी काहीजणांना थंडीताप अजून यायचा असतो, काही जणांना चालू असतो, काही जणांना येऊन गेलेला असतो. काही जणांना तर शरीरात जंतू असूनही ताप येतच नाही. अशी सरमिसळ परिस्थिती असल्याने संसर्ग झालेले सगळेच एका वेळी उपचाराखाली येणे शक्य नसते. म्हणून लोकांमधल्या संसर्ग झालेल्या व्यक्तींना आढळतील तसे उपचार करावेत. यामुळे समाजातला एकूण जंतुभार कमीत कमी ठेवणे एवढेच आत्ता तरी आपल्याला शक्य आहे.
हिवतापाची लस तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.हिवतापाचे जंतू डासांच्या शरीरात राहतात आणि वाढतात हे आपण पाहिले. पण डास नष्ट करणे हे वाटते तितके सोपे नाही. डासांचे समूळ उच्चाटन तर शक्यच नाही. पण डासांची संख्या कमी ठेवण्यासाठी अंडी,अळी, कोश, कीटक या चारही अवस्थांत निरनिराळे उपाय करता येतात.
एक म्हणजे डासांची निर्मितीच कमी व्हावी यासाठी पाण्याची योग्य व्यवस्था ठेवणे आवश्यक असते. पाणी साचू न देणे हे महत्त्वाचे. ग्रामीण भागात यासाठी शोषखड्डे अगदी अचूक उपाय ठरतील. शहरात अधिक दूरगामी उपाय करावे लागतील. मात्र पावसाळयात डबकी व भातशेती हे दोन पाणी साठे राहतातच.- डासांच्या अळयांविरुध्द अनेक उपाय आहेत. पाण्याच्या पृष्ठभागावर डिझेलसारखे तेल पसरावे. म्हणजे अळयाचे श्वसन बंद पडते. तसेच पॅरिस ग्रीन नावाचे विष पसरवल्याने अळया मरतात.
जलाशयात 'गुप्पी' प्रकारचे मासे सोडणे हा चांगला उपाय आहे. हे मासे डासांच्या अळया खाऊन जगतात. यातील गुप्पी माशांचा वापर हा एक महत्त्वाचा उपाय आहे. यामुळे रासायनिक प्रदूषण न करता डासनिर्मिती रोखता येईल. माशांच्या इतर 1-2 जातीही आहेत. कीटकावस्थेत डासांविरुध्दचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे औषध-फवारणी. औषधफवारणीचे तत्त्व असे, की एकदा फवारलेले औषध चार-सहा महिने भिंतीवर टिकून राहते. डास त्यावर बसला की स्पर्शाद्वारे हे औषध डासांच्या शरीरात जाते. डासांच्या चेतासंस्थेवर त्याचा परिणाम होऊन डास मरतात. डीडीटी या औषधाचे हेच तत्त्व आहे. मात्र डी.डी.टी मुळे पर्यावरणावर घातक परिणाम होतो व ते टिकून राहते. म्हणून हल्ली यासाठी पायरेथ्रम औषधांचा वापर केला जातो.फवारणी करताना घराची प्रत्येक भिंत, गोठे, इत्यादी फवारणे आवश्यक असते. ज्या भागात फवारणी करायची राहून गेली असेल त्यात डास आश्रय घेतात. पण फवारणीनंतर रंग, शेण, इत्यादीने सारवल्यावर औषध फवारणी निरुपयोगी होते.
आणखी एक गोष्ट करता येईल ती म्हणजे डास आणि मनुष्य यांतला संबंध तोडणे- म्हणजे जंतूचे जीवनचक्रच बंद पडेल. यासाठी डास चावू नये अशी उपाययोजना करावी लागेल. यासाठी दारे- खिडक्यांनाजाळया लावणे, मच्छरदाण्या,डासरोधक उपकरणे, मलम, इत्यादी उपाय आहेत. या सर्वात मच्छरदाणी हा तुलनेने स्वस्त आणि परिणामकारक उपाय आहे.
डासरोधक औषधांचा धूर (उदा. कासव छाप), इत्यादी मध्ये सतत सहा-आठ तास वायुरूप डासरोधक औषध सोडण्याचे तत्त्व असते. यामुळे डास लांब राहतात. शरीराला लावण्याच्या मलमात (उदा. ओडोमास) असेच डास-रोधक औषध वापरलेले असते. मोहरीचे तेलही यासाठी उपयुक्त आहे.
केओथ्रिन डासनाशक मच्छरदाण्या हा फार चांगला शोध आहे. केओथ्रिनमुळे त्यावर बसलेले डास मरतात, पण माणसाला काही अपाय होत नाही. हा औषधी परिणाम सहा महिने टिकतो. त्यानंतर परत त्याला केओथ्रिन लावावे. अशा मच्छरदाण्या हिवतापग्रस्त भागात वाटल्या जातात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
हिवतापहा आपल्या देशात फार मोठया प्रमाणावर आढळणारा ...
उष्णकटिबंधी रोग : पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशे...
ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे...
हिवताप हटवण्यासाठी 1955 पासून राष्ट्रीय व आंतरराष्...