पोलिओ हा एक चेतारज्जूचा आजार आहे. याशिवाय अपघात, मार बसणे, मणका सरकून दाब पडणे, इत्यादींमुळे चेतारज्जूच्या कामकाजात बिघाड होतो. यामुळे निरनिराळी लक्षणे दिसतात. शरीराच्या संबंधित भागावर मुंग्या येणे, बधिरता येणे, शक्ती कमी होणे,संबंधित भाग लुळा पडणे, मूत्राशय, गुदाशय यांवर नियंत्रण न राहणे, इत्यादी परिणाम होतात. बिघाडाच्या जागेवर व कमीअधिक तीव्रतेवर हे परिणाम अवलंबून असतात. दोन मणक्यांच्या मध्ये एक कूर्चेची चकती असते.
ही चकती आत सरकून चेतारज्जूवर दाबते. अशा प्रकारचा बिघाड कमरेत होण्याची शक्यता असते. यात पाय दुखणे, मुंग्या येणे,बधिरता, इत्यादी लक्षणे आढळतात. अशा आजारांसाठी तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे. तपासणी पाठीच्या कण्यात चेतांवर इजा किंवा दबाव असेल तर या तपासणीतून कळेल. यासाठी रुग्णाला पाठीवर झोपू द्या व दोन्ही पाय सरळ ठेवायला सांगा. आता एक पाय वरती सरळ अवस्थेत वर उचलायला सांगा. उचलताना कंबरेत किंवा मांडीत वेदना होते का? वेदना होत असेल तर त्या बाजूच्या नसांवर दाब येत आहे असा अर्थ काढता येतो. दोन्ही बाजूंची तपासणी करावी.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/29/2020