অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मज्जासंस्था आजार

फिट (मिरगी), फेफरे, अपस्मार

वरवर निरोगी दिसणा-या मुलाला किंवा मोठया माणसाला अचानक झटका येणे,विचित्र हालचाली, क्वचित बेशुध्दी, हा बहुधा फेफ-याचा परिणाम असतो. फेफरे अनेक प्रकारचे असते. अगदी एखाद्या अवयवापुरता झटका येण्यापासून ते सर्वांगाला आकडी येऊन बेशुध्दी येईपर्यंत अनेक प्रकार दिसून येतात. सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे मोठे फेफरे (अचानक सर्वांगाला झटका येणे, तोंडाला फेस येणे, बेशुध्दी, व तेवढयापुरती स्मरणशक्ती जाणे). लहान फेफरे या प्रकारांत स्मरणशक्ती न जाता, बेशुध्दी न येता काही भागापुरताच झटका येतो. फेफ-याच्या काही प्रकारात झटके न येता केवळ अचानक जमिनीवर पडणे व काही काळ गुंगी येणे इतकाच परिणाम दिसतो. भारतात याचे प्रमाण हजारी 5 इतके आहे. फेफ-याचे 40 लहान मोठे प्रकार आढळतात. पण आपण निवडक प्रकारांची माहिती घेऊ या.

मोठे फेफरे

हे फेफरे 5-15 वयोगटात सुरु होते. झटका फक्त 10-30 सेकंदच टिकतो. त्यानंतर बेशुध्दी येते, डोळे फिरतात, आणि श्वसन काही क्षण थांबते. यानंतर कधीकधी हातपाय नळयासारखे आखडतात व कडक होतात, आणि मग सैलावतात. काही रुग्णांना यानंतर एक प्रकारचे 'रडू' येते. श्वसन काही क्षण थांबल्याने शरीर काळे निळे दिसू शकते. त्यानंतर श्वसन सुरु होते. लाळ खूप सुटल्याने तोंडाला फेस येतो. या आजारातला झटका सर्व शरीरात एकदम येतो. यात जबडा, हातपाय आणि इतर सर्व स्नायू सापडतात. कधीकधी आपोआप लघवी होते. हे सर्व संपल्यानंतर रुग्णाला बहुधा गाढ झोप लागते. ही झोप काही मिनिटे किंवा तास-दोन तास पण असू शकते. रुग्ण यानंतर थोडा वेळ गोंधळलेला राहतो. या काळात मेंदूचा विद्युत आलेख काढला तर त्यात जादा कंपने व लाटा दिसतात. या तुलनेत तापाचा झटका वेगळा असतो. हा झटका 15 मिनिटेपर्यंत किंवा जास्त वेळ टिकतो. चक्कर येणे/अंधारी आणि फिट येणे यातही फरक आहे. चक्कर/अंधारी यात सर्व शरीर सैल पडते. फिट म्हणजे विचित्र आणि जोरदार हालचाली असतात. काही तीव्र संवेदना फिट येण्यास निमित्त ठरु शकतात. प्रकाशझोत डोळयावर पडणे,वाचनाची सुरुवात, वेगाने श्वसन करणे, कधीकधी अगदी गरम पाणी डोक्यावर घेतल्याने फेफरे सुरु होऊ शकते. काही स्त्रियांना पाळी येण्याचे निमित्त होऊन झटका येतो. ही कारणे नाहीत केवळ निमित्त आहे हे लक्षात ठेवा. फेफरे या विकाराचे नक्की कारण माहीत नाही. पण मेंदूतल्या विशिष्ट भागातील विद्युतप्रवाहात अचानक बिघाड होणे एवढेच कारण आपल्याला माहीत आहे. यामागे काही प्रमाणात आनुवंशिकता आहे. जन्माच्या वेळी डोक्याला इजा झालेल्या बालकांना पुढे फेफरे येण्याची शक्यता असते. डोक्यात किंवा मेंदूत गाठ असणे, मार लागणे, रक्तप्रवाहात बिघाड, इत्यादी कारणांनीही फेफरे येते. याशिवाय शरीरातल्या इतर भागांतल्या आजारांचे एक लक्षण म्हणूनही झटके येतात. (खूप ताप, मधुमेह, रक्तातले कॅल्शियमचे प्रमाणे कमी होणे, इ.)मात्र याला फेफरे म्हणत नाहीत.

फेफरे हे मृत्यूचे कारण चार प्रकारे होऊ शकते.

न थांबणारी फिट आल्यास श्वसन थांबून मृत्यू येतो. आत्महत्येची प्रवृत्ती, विशेष करून अतिनैराश्यामुळे. फिट येऊन पडल्यामुळे गंभीर मार/अपघात झाला तर फिटमुळे अचानक अनाकलनीय मृत्यू नैराश्य, उदासिनता, अर्धशिशी हे आजार फेफ-याबरोबर येऊ शकतात. ब-याच रुग्णांच्या बाबतीत असे दिसते. अभ्यासात लक्ष न लागणे किंवा चळवळया स्वभाव हाही दोष काही रुग्णांमध्ये दिसून येतो. काही स्त्रियांना वंध्यत्व येते. फेफरे असलेल्या स्त्रीला राहणारा गर्भ सदोष असण्याची 2ते 4% शक्यता असते.

प्राथमिक काळजी

या आजारासाठी निरनिराळी 20 औषधे वापरात आहेत. या आजाराचे रोगनिदान करणे व उपचार ठरवणे हे तज्ज्ञांचेच काम आहे. मात्र काही गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. फेफरे असलेल्या व्यक्तीने स्वतःस किंवा इतरांस इजा होईल असे कोणतेही काम हाती घेऊ नये. उदा. मशीनवर काम करणे, वाहने चालवणे, पोहणे, उंचीवर चढणे,आगीजवळ काम करणे, इत्यादी गोष्टी त्याने टाळल्या पाहिजेत. दुसरे म्हणजे झटका येईल अशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. उदा. काही जणांना एकदम उजेड डोळयावर पडल्यास झटका येतो. तिसरी गोष्ट म्हणजे नियमित उपचार पाहिजेत. उपचार बंद झाल्याझाल्या झटका येण्याचा संभव असतो. उपचार करूनही सुमारे 30% रुग्णात फिट येत राहतात. पूर्ण नियंत्रण अद्याप शक्य झालेले नाही. औषधांमुळे 80% रुग्णांना थोडा मानसिक संथपणा, आणि झोपाळूपणा अनुभवास येतो.

प्रथमोपचार

झटक्यामध्ये जीभ दातात चावली जाण्याचा संभव असतो. पण यासाठी दातामध्ये पट्टी-कपडा सरकवण्याचा प्रयत्न करू नये. असे आता सर्वमान्य आहे. यामुळे इजा होऊ शकते. झटके थांबवण्यासाठी रुग्णाला दाबून धरू नये याचा उपयोग नाही पण अपाय होतो. रुग्णाला कुशीवर झोपवावे व लाळ बाजूने गळू द्यावी. नंतर रुग्णाला धीर द्यावा. लाळ उलट श्वासनलिकेत जायला नको.

औषधोपचार

फेफ-यावर नियमित औषधोपचार झाला तर रुग्णाला सामान्य जीवन जगणे शक्य होते. शिक्षण, व्यवसाय यांत इतरांप्रमाणे प्रगती करता येते. ह्या औषधोपचाराचा खर्च फार नसतो. प्राथमिक आरोग्यकेंद्रावर त्या भागातल्या दोन-चार रुग्णांना पुरेल एवढया औषधांचा पुरवठा होऊ शकतो. या गोळया नातेवाईकांपैकी कोणीतरी रोज ठरावीक प्रमाणात रुग्णाला देणे आवश्यक आहे. रुग्णाच्या ताब्यात सर्व साठा गेला तर अपघाताने एकदम जास्त प्रमाणात खाऊन धोका होण्याची शक्यता असते. चुकून असे झाले तर ताबडतोब रुग्णालयात हलवणे आवश्यक आहे.

आयुर्वेद

चेतासंस्थेच्या काही आजारांच्या बाबतीत आयुर्वेदिक उपचाराने, हळूहळू का होईना, पण चांगला गुण येतो. फेफरे, अपस्मार, पक्षाघात, हातापायांवर मुंग्या वा बधिरता येणे,इत्यादी आजारांवर पंचकर्म, तेल चोळणे, ( अभ्यंग), प्राणायाम व काही औषधांनी सुधारणा होते असा अनुभव आहे. चेतासंस्थेचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात. आजाराची तीव्र अवस्था असेपर्यंतच रुग्णालयात ठेवतात. नंतर रुग्णास घरी सांभाळावे लागते, म्हणून गावपातळीवर प्रशिक्षित कार्यकर्त्याने मनावर घेतल्यास काही आजारांच्या बाबतीत निश्चित मदत होऊ शकेल.

आयुर्वेद आणि फेफरे

अपस्मार-फेफरे-फिट असणा-या रुग्णाचे तज्ज्ञाकडून निश्चित रोगनिदान ठरल्यावरच आयुर्वेदाचा विचार करावा. इतर उपचार चालू असतानाच काही आयुर्वेदिक उपचार करून पाहावेत झटका आला असेल त्यावेळी नाकात उग्र वासाचे चूर्ण (उदा. वेखंड) फुंकावे, पण ते डोळयात उडणार नाही याची काळजी घ्यावी ( यावेळी इतर कोणालातरी रुग्णाचे डोळे बंद करायला सांगावे.) चूर्ण नसल्यास मीठाच्या खारट पाण्याचे एक-दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडूनही उपयोग होतो. सुंठ, शिकेकाईपैकी एखादी वस्तू दगडावर एक-दोन वेढे उगाळून त्याचे चार-पाच थेंब पाणी नाकपुडीत सोडूनही हा परिणाम साधता येतो. चूर्ण किंवा थेंब नाकात टाकल्याने नाकात तीव्र संवेदना होऊन 'जाग' येते किंवा बेशुध्दीकडे कलणारी प्रवृत्ती रोखली जाते. इतर वेळी नियमित उपचारांमध्ये अणुतैल, षड्बिंदूतेल यांचे नस्य, तैलबस्ती (40-50मि.ली. सहचर तेल वापरावे) आणि पोटातून ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा, जटामांसी,मंडूकपर्णी, इत्यादी औषधांचा वापर करतात. या औषधांनी युक्त अशी 'बेंटो' नावाची गोळी किंवा पाकातील द्रव मिळतो. रोज दोन गोळया दोन-तीन वेळेस याप्रमाणे घ्याव्यात. नस्य आणि औषधांनी रुग्ण तल्लख राहण्यास मदत होते. अपस्माराविरुध्द वापरायच्या ऍलोपथिक गोळयांनी येणारी गुंगी या आयुर्वेदिक उपायांनी कमी पडते. हे उपचार एक-दोन वर्षे करावेत. (सहचर तेल हे काटेकोरांटीपासून तयार केलेले तेल असते.) या उपचारांबरोबर रुग्णास मानसिक आधार देणे आवश्यक आहे. रुग्णाचा कल पाहून जप, इत्यादी उपायांनी त्याला मानसिक स्थैर्य मिळत असल्यास प्रोत्साहन द्यावे. मन एकाग्र करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त आहे. यासाठी वज्रासन, पद्मासन, सुखासन,इत्यादी आसने हळूहळू शिकवावीत. प्राणायाम शिकवताना सुरुवातीस केवळ दीर्घ श्वसन शिकवावे (म्हणजे सोसवेल इतके सेकंद श्वास धरून ठेवावा) प्राणायाम शिकवण्यासाठी आपलीही चांगली तयारी पाहिजे. प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासाने असे रुग्ण चांगले सुधारतात. रुग्णाचे औदासीन्य व दीनता घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा फार चांगला उपाय आहे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate