मेंदूसूज म्हणजे मेंदूचे आवरण किंवा अस्तर सुजणे किंवा मेंदूतच सूज येणे,असा अर्थ इथे सोयीसाठी घेतलेला आहे. हे दोन्ही आजार वेगळे असले तरी परिणाम जवळजवळ सारखेच दिसतात त्यामुळे मेंदूसूज या एकाच नावाखाली दोन्हींचे वर्णन करता येईल.
मेंदूसुजेच्या या दोन्ही प्रकारांपैकी मेंदूच्या आवरणाच्या सुजेचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळतो.
मेंदूच्या आवरणाची किंवा मेंदूतली सूज, जीवाणू किंवा विषाणूंमुळे होते. जीवाणूंपैकी'पू' निर्माण करणारे जीवाणू किंवा क्षयरोगाचे जीवाणू याला कारणीभूत होऊ शकतात. मेंदूचा हिवताप पण याच गटात येतो.
लहान मुलांना ब-याच प्रकारचे जंतुदोष होतात. हे विकार वेळीच आटोक्यात आले नाही तर कधीकधी ते मेंदूपर्यंत पोहोचतात. कान फुटणे, घसासूज, टॉन्सिलसूज, दातात पू होणे, चेह-यावर गळू, पू, फोड, डोक्यास जखम, श्वसनसंस्थेचे जंतुदोष, प्राथमिक क्षयरोग,इत्यादी आजारानंतर मेंदूच्या आवरणाचा किंवा मेंदूचा जंतुदोष होऊ शकतो.
काही प्रकारची मेंदूसूज स्वतंत्रपणे येऊ शकते. उदा. साथीचा मेंदूज्वर. साथीच्या विषाणूंमुळे येणारा मेंदूज्वर एका विशिष्ट डासामार्फत (क्युलेक्स) पसरतो. हा फार घातक आजार आहे.
क्षयरोगामुळे होणारी मेंदूसूज हळूहळू वाढणारी, सौम्य लक्षणांची असते. याउलट इतर जीवाणू व विषाणूंमुळे येणारी मेंदूसूज तीव्र लक्षणांची व वेगाने (2-3 दिवसांत) वाढणारी असते.
मेंदूसूजेमध्ये खूप ताप, डोकेदुखी, उलटया, झटके, अतिझोप, चिडचिडेपणा, वागण्या-बोलण्यात फरक व पुढे बेशुध्दी अशी लक्षणे दिसतात. बाळास मेंदूसूज असल्यास ते न थांबता सतत रडते.
क्षयरोगाच्या मेंदूसूजेच्या प्रकारात ही लक्षणे सौम्य असतात. ताप त्या मानाने कमी असतो. यात डोकेदुखी, उलटया कमी प्रमाणात असतात व वागण्या-बोलण्यातला फरक एक-दोन आठवडयांत दिसायला लागतो.
- बाळाची टाळू अजून भरली नसेल तर मेंदूजलाच्या दाबाने टाळू फुगते व दाब जाणवतो. मेंदूसुजेची ही महत्त्वाची खूण आहे.
- मान ताठरणे ही आणखी एक महत्त्वाची खूण आहे. मेंदू-आवरण सुजेमध्ये रुग्णाची मान ताठरते. मान पुढे वाकवताना वेदना होतात. याचप्रमाणे बसून हाताने पायाचा अंगठा धरताना वेदना होतात व वेदनेमुळे ते शक्य होत नाही.
अशा लक्षणांवरून मेंदूसुजेची शंका घेऊन रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे. एक-दोन दिवसांत योग्य उपचार सुरू झाला तर जीवाणूंमुळे येणारी मेंदूसूज पूर्ण बरी होऊ शकते. त्यासाठी शारीरिक तपासणीबरोबर मेंदूजलपरीक्षा आवश्यक असते. जीवाणू ज्या प्रकारचे (पू तयार करणारे किंवा क्षयरोगाचे) असतील त्यावरून औषधयोजना ठरते. विषाणूंवर औषध नसल्याने विषाणूंची मेंदूसूज एक तर आपोआप थांबते किंवा रोगी दगावतो. मेंदूसूज हा अगदी गंभीर आजार आहे. वेळेवर उपचार न झाल्यास रोगी बहुधा दगावतो किंवा मेंदूवर कायमचे दुष्ट परिणाम राहतात. जंतुविरोधी औषधांमुळे मेंदूसुजेवर काही प्रमाणात तरी नियंत्रण शक्य झाले आहे. म्हणून लवकर रोगनिदान व योग्य उपचार होणे आवश्यक आहे. क्षयरोगामुळे होणारा मेंदूचा विकार आता खूप कमी झाला आहे.
या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. जंतुविरोधी औषधांची इंजेक्शने रोज दिवसातून 3-4 वेळा द्यावी लागतात. क्षयरोगाची मेंदूसूज असेल तर बरे व्हायला कित्येक आठवडे लागू शकतात.
मुख्य म्हणजे लहान मुलांच्या जंतुदोषांवर वेळीच उपाय करून जंतुदोष आटोक्यात आणणे आवश्यक असते. विशेषतः कान फुटल्यानंतर मेंदूसुजेची शक्यता जास्त असते. साथीचा मेंदूज्वर सोडल्यास इतर प्रकारची मेंदूसूज संसर्गजन्य नसते. (म्हणजे घरात एका मुलाकडून दुस-याला लागत नाही.)
साथीचा विषाणुमेंदूज्वर बहुधा डासांमुळे पसरतो. त्यासाठी सार्वत्रिक पातळीवर उपाययोजना करावी लागते. डासांची संख्या कमी करणे हेच अशा वेळी प्रमुख सूत्र असते. हे डास माणूस व डुकरांमध्ये विषाणूंचा प्रसार करतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/7/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...