आपल्या एकंदर आरोग्यामध्ये चांगल्या दातांचा मोठा वाटा आहे आणि हे वाक्य सर्व वयाच्या व्यक्तींना लागू आहे. दातांची योग्य काळजी घेतल्याने ते आयुष्यभर चांगले राहतात. आपल्या हिरड्या चांगल्या ठेवण्यासाठी स्केलिंगची प्रक्रिया अतिशय उपयोगी आहे. ह्यामध्ये प्लेक, कॅलक्युलस सारख्या सांसर्गिक पदार्थांचे थर दातांवरून काढले जातात तसेच दातांच्या पृष्ठभागावरील डागही काढले जातात. हे थर वेळेवर न काढल्यास हिरड्या ढिल्या पडतात व अखेरीस पायोरिया नावाचा रोग होऊन दात गमावण्याची पाळी येते. स्केलिंगची प्रक्रिया सरळसाधी असते व ह्यामध्ये दातांच्या पृष्ठभागास कोणतीही इजा होत नाही. अर्थात स्केलिंग तज्ञ व्यक्तीनेच करायचे असते.
डेंटल प्लेक हा जीवाणू तसेच अन्नकणांपासून बनलेला मऊ, चिकट आणि रंगहीन थर असतो व तो दातांवर सतत तयार होत असतो. जीवणूंची वस्ती वाढत जाते तसतसे हिरड्यांपर्यंत जंतुसंसर्ग पोहोचून त्यांमधून रक्त येऊ लागते. दर १२-१४ तासांनी हा थर ब्रशने काढून न टाकल्यास त्याचे अधिक कठीण थरामध्ये म्हणजे कॅलक्युलस उर्फ टार्टरमध्ये रूपांतर होते. नंतर मात्र हा थर ब्रशने काढता येत नाही व त्यासाठी दंतवैद्याने स्केलिंग करावे लागते.
नियमित ब्रशिंग व प्लॉसिंग केल्यानंतरही टार्टर उत्पन्न होऊ शकते आणि म्हणूनच दातांच्या डॉक्टरने दात साफ करणे महत्त्वाचे असते. ह्यामध्ये स्केलिंग आणि पॉलिशिंगचा समावेश असतो. स्केलिंग करून दातांवरील थर न काढल्यास पेरिओडोटल रोग होऊ शकतात म्हणजे दात आणि हिरडीमधील फट वाढू लागते. ह्या फटीत ऍनारोबिक प्रकारचे जीवाणू सुखाने वाढतात आणि त्यांचा हिरड्यांवर हल्ला झाल्याने दाताला आधार देणारे हाड झिजू लागते. परिणामी दात हलू लागतो. असा दात वाचवण्यासाठी जास्त गुंतागुंतीचे आणि खर्चिक उपचार करावे लागतात आणि कधीकधी हिरडीवर शस्त्रक्रिया करावी लागते.
दातांवर प्लेकचा थर जमण्याची क्रिया सतत चालूच असते. १० ते १४ तासांत ब्रशिंग न केल्यास त्याचे रूपांतर टार्टरच्या कठीण थरात होते. असे झाल्यास दर ६ महिन्यांनीदेखील स्केलिंग करणे गरजेचे बनते. दर सहा महिन्यांनी दात तपासून घेणे हे उत्तम. त्यावेळी आपला दंतवैद्य आपणांस स्केलिंगची आवश्यकता आहे काय हे सांगू शकतो तसेच घरच्याघरी दातांची काळजी कशी घ्यावी ह्याबाबतही सल्ला देऊ शकतो. स्केलिंगने दातांना कोणतीही इजा पोहोचत नाही उलट हिरड्यांचे आजार टाळता येतात. असे न केल्यास हिरड्यांचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
तोंडाचे आरोग्य चांगले असले की दातांच्या तसेच तोंडाच्या इतर तक्रारींवर उपचार करणे सहज शक्य होते. संपूर्ण शरीराच्या आरोग्याची सुरूवात तोंडाच्या आरोग्यापासून होते असे म्हणता येईल.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/26/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...