অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पटकी (कॉलरा)

प्रस्तावना

या रोगात पाण्यासारखे जुलाब, उलटया होतात. उपचार झाले नाहीत तर रोगी दगावण्याची शक्यता खूप असते. या आजाराच्या साथी आता पुष्कळ कमी झालेल्या आहेत. हा आजार गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशात जास्त आढळतो.

ग्रामीण भागात, विशेषत: नद्या व झरे यांवर अवलंबून असणा-या भागात हा आजार कधीकधी आढळतो. नवे पाणी आल्यावर (पावसाळा) आणि पाणी आटून दूषित होताना (उन्हाळा) पटकी हा रोग जास्त प्रमाणात होत असे. पुरेसे व स्वच्छ पाणी हाच पटकीविरुध्दचा खरा प्रतिबंधक उपाय आहे. पटकीच्या लसीचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळे ही लस देणे आता बंद झाले आहे.

हा रोग कसा होतो

हा रोग सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हे जंतू रुग्णाच्या उलटीतून, जुलाबातून पाण्यामार्फत,अन्नामार्फत, प्रत्यक्ष संपर्काने किंवा माशीच्या पायांनी पसरतात. शरीरात प्रवेश झाल्यानंतर जंतू दोन - तीन तासांत पचनसंस्थेवर ताबा मिळवतात. त्यामुळे पचनसंस्थेत मोठया प्रमाणावर पाणी पाझरते. हे पाणी उलटी, जुलाबाद्वारे बाहेर टाकले जाते. पाणी बाहेर पडल्यामुळे शरीरातले पाणी आटून शोष पडतो व रक्तपुरवठा कमी होतो. नाडी मात्र वेगाने चालते. योग्य वेळी शरीराला क्षार-पाण्याचा पुरेसा पुरवठा न झाल्यास मृत्यू येऊ शकतो.

रोगनिदान

लक्षणे

कधीकधी यात केवळ पाण्यासारखी उलटी किंवा नुसते जुलाब होऊ शकतात. तहान, उलटी, जुलाब (पाण्यासारखे) हे सुरुवातीचे चित्र असते. काही वेळानंतर पायात पेटके (वांब ) येणे, लघवी बंद होणे, ग्लानी येणे, इत्यादी लक्षणे दिसतात. रुग्ण अतिशोषामुळे बेशुध्द होऊ शकतो.

चिन्हे

जीभ कोरडी दिसते, डोळे खोल व निस्तेज दिसतात. पोटावरची किंवा पायावरची कातडी चिमटीत धरून सोडल्यास सुरकुती राहते आणि हळूहळू नाहीशी होते. निरोगी अवस्थेत अशी सुरकुती लगेच नाहीशी होते. (उतारवयात ही खूण उपयोगी नाही कारण कातडीला सैलपणा असल्याने आपोआप सुरकुत्या पडतात.) सौम्य पटकीचा आजार केवळ अतिसारासारखा असतो.

उपचार

या रुग्णास हॉस्पिटलमध्ये पाठवणे जरुरी असते. पण प्रथमोपचार त्वरित सुरु करावा. प्रथम रोग्याला घरगुती सलाईन जीवनजल (मीठ, साखर मिसळलेले पाणी) पाजा. त्याला हवे तितके जीवनजल पिऊ द्या व पीत नसल्यास आग्रहाने पाजा. उलटी होत असली तरी तोंडावाटे थोडेथोडे जीवनजल देतच रहा. यामुळे शोष आटोक्यात राहील. यासाठी खालीलप्रमाणे घरगुती सलाईन तयार करावे. घरगुती सलाईन द्या- एक लिटर स्वच्छ पाण्यात - 1 मूठ साखर, 2 चिमूट मीठ आणि 1 चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळा. हे जीवनजल म्हणजे घरगुती सलाईनच असते. हे दिल्याने बहुतेक रुग्ण वाचू शकतात. शिरेतून दिल्या जाणा-या सलाईनच्या इंजेक्शनपेक्षा जीवनजल खूपच स्वस्त आहे. याऐवजी नारळाचे पाणी, चहा,कॉफी, सरबत,पेज हेही चालेल. प्रकृती गंभीर असली तरी सलाईन मिळेपर्यंत जीवनजल चालूच ठेवा. जीवनजल किती पाजायचे? जिभेवरचा व कातडीवरचा कोरडेपणा पूर्णपणे जाईपर्यंत पाजत राहावे. मग त्याची लघवी परत चालू होईल. बंद पडलेली लघवी परत चालू होणे याचा अर्थ आता शरीरात पुरेसे पाणी आहे.
  • पटकीच्या जंतूंवर टेट्राच्या औषधाचा चांगला गुण आहे. मात्र लहान मुलांना फ्युराडिन किंवा ऍंपीसिलीनच्या गोळया द्याव्यात.
  • प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा आरोग्य कर्मचा-याला कळवा. ते येऊन पाणी तपासतील, गावाची पाहणी करतील. पाण्यात क्लोरिन/ब्लिचिंग पावडर औषध टाकतील. पाणीशुध्दीकरण तुम्हीही करू शकाल.) रुग्णास सलाईन लावून आरोग्यकेंद्रात नेतील.
  • आजा-याच्या उलटीने, जुलाबाने दूषित झालेली जमीन, कपडे, वस्तू, इत्यादी फिनेलने धुवून घ्या. नाहीतर जंतूंची लागण इतरांनाही होईल. जुलाब, उलटी पाण्यापासून लांब जागी खड्डयात गाडून टाका.
  • आजार कोठून आला याचा आरोग्य केंद्राच्या मदतीने शोध घ्या. विहिरीच्या पाण्यात औषध (ब्लिचिंग पावडर) टाकून घ्या. नदीचे पाणी घरी आणल्यानंतर घागरीत, हंडयात औषध टाका. शक्यतो नदीचे पाणी वापरण्याऐवजी कूपनलिकांचे पाणी वापरा.
  • गावात हॉटेल असल्यास तिथल्या कामगारांनी टेट्राच्या गोळया तीन दिवस तरी घ्यायला पाहिजेत. आपले आरोग्यकेंद्र याबाबत योग्य ती कार्यवाही करते.
  • रुग्णाच्या जुलाबाचा नमुना बाटलीत/प्लास्टिक पिशवीत जमा करून आरोग्य प्रयोगशाळेत पाठवला जातो.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate