অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नविषबाधा


वर्तमानपत्रात आपण ब-याच वेळा अन्नविषबाधेबद्दल वाचतो. अन्नामध्ये काही काही वेळा जंतूंमुळे विष तयार होते, तर काही वेळा अन्नभेसळीमुळे विषारी पदार्थ मिसळले जातात.

या अन्नविषबाधेचे मुख्य लक्षण असे, की दूषित अन्न खाणा-या अनेकांना एकाच वेळेस त्रास होतो. अन्नविषबाधेचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

- अन्न खाल्ल्यानंतर लगेच त्रास होणे (उदा. जुलाब, उलटया, झटके वगैरे).

- विषारी अन्न नेहमी खाल्ल्याने ब-याच काळानंतर (दिवस, महिने, वर्ष) होणारा त्रास हा दुसरा प्रकार आहे. (उदा. भेसळीचे गोडे तेल खाल्ल्याने पायावर येणारी सूज).

या प्रकरणात आपण फक्त लगेच होणारी अन्नविषबाधा पाहू या.

होमिओपथी निवड

 

ऍसिड फॉस, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, सीना, चामोमिला, फेरम मेट, मर्क कॉर,मर्क सॉल, नेट्रम मूर, नक्स मोश्चाटा, पोडोफायलम, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूज

अन्नविषबाधेची कारणे

 

अन्नात अनेक प्रकारचे जिवाणू व बुरशी वाढून विषे निर्माण होतात. या जिवाणूंमुळे किंवा त्यांच्या विषामुळे अनेक दुष्परिणाम होतात. यापैकी काही ठळक प्रकार इथे नमूद केले आहेत.

- तृणधान्याबरोबर येणारा जिवाणू - या जिवाणूंची वाढ काही तृणधान्यांबरोबर होते; विशेषत: तांदळाबरोबर याची शक्यता जास्त असते. भात शिजवल्यानंतर वाढायच्या आधी काही काळ 4-5 तास तसाच ठेवला तर या जंतूंची वाढ होते. जेवणानंतर लगेच उलटया व जुलाब चालू होतात. साधारण 5/6 तासांनी त्रास थांबतो. भात शिजवून जास्त काळ न ठेवणे हाच यावरचा उपाय आहे.

- सालमोनेला जंतू : हे जंतू दूषित हात, माशा, भांडी, पाणी, इ. मार्फत अन्नात येतात. यामुळे 6-72 तासांत जुलाब उलटयांचा आजार चालू होतो. हा आजार काही दिवस किंवा 2-3 आठवडयापर्यंत टिकतो. यातले काही जण बरे होतात पण'जंतुवाहक' बनतात (म्हणजे त्यांच्यापासून जंतूचा प्रसार होत राहतो).

- पूजनक जंतू: हे जंतू अन्नात येतात ते (अ) स्वयंपाक करणा-याच्या किंवा वाढणा-याच्या हातात जखम, गळू, इ. मुळे किंवा, (ब) गाई-म्हशीच्या सडात झालेल्या पू-जखमेमुळे दुधातून येतात. या जंतूंचे विष उकळल्यानंतरही टिकून राहते. संसर्गानंतर 1-6 तासात मळमळ, उलटी, जुलाब, थकवा, पोट-दुखी, इ. त्रास चालू होतो. आजार 1-2 दिवस टिकतो.

- अन्न नासवणारे जंतू : यात मुख्यत: क्लॉस्ट्रिडियम जंतू येतात. यामुळे अन्न काळसर पडते व त्यात बुडबुडे निर्माण  होतात.  यातून उग्र वास येऊ शकतो. हा प्रकार बहुधा मांसाच्या बाबतीत घडतो. यात तयार होणारे विष अत्यंत मारक असून त्यामुळे 8 ते 96 तासात जुलाब व उलटया सुरू होतात. याच्या एका उपप्रकारात डोकेदुखी, एकाऐवजी दोन वस्तू दिसणे, चक्कर, घसा निर्जीव होणे, इ. त्रास आढळतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर मृत्यू ओढवू शकतो. या जातीचे जंतू डबाबंद पदार्थात वर्षानुवर्षे सुप्तावस्थेत राहू शकतात.

- कोलीफॉर्म जंतू : हे जंतू अन्नात असणे म्हणजे अन्नाचा कुठूनतरी विष्ठेशी संबंध आल्याची खूण आहे. सुमारे 12-72 तासात यामुळे पोटदुखी, उलटया, जुलाब,इ. त्रास सुरू होतो. आजार 3-5 दिवस टिकतो. प्रवासात सुरू होणारा जुलाब-उलटयांचा त्रास बहुधा या जंतूंमुळे उद्भवतो.

- अरगट : ही एक बुरशी आहे. ही बहुधा बाजरीवर वाढते. खाल्ल्यानंतर काही तासात झटके येतात. पोटात कळा, गर्भपात, बेशुध्दी, इ. त्रास होऊ शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू येऊ शकतो. ही विषबाधा हल्ली खूपच कमी आढळते.

सामूहिक अन्नविषबाधा : प्रथमोपचार आणि पुढील व्यवस्थापन

 

उलटी होत असली तर होऊ द्यावी म्हणजे दूषित अन्न बाहेर पडेल. मात्र अन्न बाहेर पडून गेल्यावरही उलटी चालू असेल तर उलटी थांबवणारे इंजेक्शन द्यावे लागते.

- अन्नविषबाधेच्या रुग्णाला प्रथमोपचार म्हणून जीवनजल चालू करा.

- आरोग्य केंद्राला व इतर पंचायत सेवकांना कळवा.

- संशयित अन्न तपासणीसाठी राखून ठेवा.

- संशयित अन्न आणखी कोणी खाणार नाही याची काळजी घ्या.

- ब-याच वेळा पटकीची लागण अन्नविषबाधेसारखीच वाटते. म्हणून पिण्याच्या पाण्याची काळजी (शुध्दीकरण) घ्या.

- जुलाबाचा नमुना स्वच्छ बाटलीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. यामुळे नेमके निदान होऊ शकेल.

- जेवणावळी करताना अन्न शिजवून फार काळ जाऊ देऊ नका. यातला धोका त्या कुटुंबप्रमुखांना समजावून सांगा.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate